नमस्तॆ जगन्नाथ विष्णॊ नमस्तॆ
नमस्तॆ गदाचक्रपाणॆ नमस्तॆ ।
नमस्तॆ प्रपन्नार्तिहारिन् नमस्तॆ
समस्तापराधं क्षमस्वाखिलॆश ॥ १५ ॥
भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना विविध स्वरूपात आळवत असताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
नमस्तॆ जगन्नाथ विष्णॊ नमस्तॆ- हे जगन्नाथ भगवान श्री विष्णू ! आपल्याला वंदन असो.
आपण सगळ्या जगाचे पालक आहात. मी ज्या जगातील एक अत्यंत क्षुद्र घटक आहे. सगळ्या जगाची संकटे निवारण करणार्या आपल्याला माझ्या संकटांच्या निवारणात काय अडचण आहे? सगळ्या जगाचा उद्धार करणाऱे आपण माझा उद्धार का करीत नाही? असा भक्ताचा भोळा प्रश्न या जगन्नाथ शब्दांमध्ये अंतर्हित आहे.
नमस्तॆ गदाचक्रपाणॆ नमस्तॆ – आपल्या हातामध्ये गदा आणि चक्र आहे. माझ्या सर्व शत्रूंचा आपण विनाश करू शकता. शत्रुच्या विनाशासाठीच आपण ही शस्त्रे धारण केली आहेत.
येथील शत्रू शब्दाचा अर्थ केवळ बाहेरील कोणी व्यक्ती इतका सामान्य नाही. त्यासाठी स्वतः भगवंतांनी यावे इतकी आपली योग्यता नाही.
येथे आपल्याच आत असणारे कामक्रोधादी विकार, अहंकार इ. विकृतींनाच शत्रू म्हंटले आहे.
त्यांचा विनाश करण्याची प्रार्थना आचार्य श्री करीत आहेत.
मी आपल्याला ही विनंती का करतो ? तर –
नमस्तॆ प्रपन्नार्तिहारिन् नमस्तॆ – आपण प्रपन्नार्तिहारिन् आहात.प्रपन्न म्हणजे परिपूर्ण रीतीने शरण आले आहेत त्यांच्या आर्ति – म्हणजे सर्व प्रकारच्या दुखा:चे हारिन् – निर्मूलन करणारे आपण आहात.
त्यामुळे आपल्याला नमस्कार असो. आपण माझ्याही दुःखाचे निवारण करा.
समस्तापराधं क्षमस्वाखिलॆश – हे अखिल विश्वाच्या स्वामी माझे सर्व अपराध क्षमा करा.
मला जवळ करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply