भुजन्ङ्गप्रयातं पठॆद्यस्तु भक्त्या
समाधाय चित्तॆ भवन्तं मुरारॆ ।
स मॊहं विहायाशु युष्मत्प्रसादात्
समाश्रित्य यॊगं व्रजत्यच्युतं त्वाम् ॥ १७ ॥
या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्राचे समापन करतांना फलश्रुती स्वरूपात भगवान आदि शंकराचार्य प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत.
इतरवेळी फलश्रुतीत सामान्यतः ज्या गोष्टींचा उल्लेख असतो तो न करता, आचार्य श्री येथे अत्यंत व्यापक भूमिका मांडत आहेत.
ते म्हणतात,
भुजन्ङ्गप्रयातं पठॆद्यस्तु भक्त्या – जो कोणी भक्तीने या भुजंगप्रयात स्तोत्राचा पाठ करेल, तोही कशाप्रकारे ? तर –
समाधाय चित्तॆ भवन्तं मुरारॆ – आपल्या चित्ताला म्हणजे मनाला भगवंताच्या ठिकाणी समाधाय म्हणजे एकत्रित करून. अर्थात भगवंताच्या ठिकाणी परिपूर्ण शरणागत एकाग्रता साधून.
स मॊहं विहायाशु युष्मत्प्रसादात् – हे भगवंता आपल्या प्रसादाने तो ताबडतोब मोहातून दूर होईल.
समाश्रित्य यॊगं व्रजत्यच्युतं त्वाम् – योगाचा आधार करीत मार्गक्रमण केल्याने हे भगवान अच्युता ! तो आपल्याला प्राप्त होईल.
यात मोह दूर होणे आणि योग साधने अशा दोन महान फलांचा विचार केला आहे. जेव्हा इतकी मोठी फळे प्राप्त होतात तेव्हा लहान सहान गोष्टी सहज मिळतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
शेवटी भगवंताचे नाव घेताना अच्युत शब्द वापरला आहे. प्रत्येक जागी आचार्यश्रींनी वापरलेले नामाभिधान व्यवस्थित समजून घ्यायला हवे.
अच्युत म्हणजे अविचल, अढळ, स्थिर, शाश्वत. भगवान तसे असल्याने आपल्यालाही तसा आनंद देतात हा त्यातील भाव.
व्यवहारात देखील आनंद म्हणजे सुखाच्या अनुभूती येतात. मात्र त्या टिकाऊ नसतात. कारण जगाचे स्वरूपच नाशवंत आहे. त्यात मिळणारी प्रत्येक गोष्ट नाशवंतच असणार आहे.
भगवान अच्युत असल्याने त्यांच्या चरणाशी मिळणारा आनंद ही तसाच आहे. तो शाश्वत चिरंतन आनंद , मोह दूर झाल्यावर, योगाच्या द्वारे मिळतो हेच आचार्य येथे स्पष्ट करीत आहेत.
असा आनंद प्राप्त होणे ही सगळ्यात मोठी फलश्रुती आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply