येभ्योऽसूयद्भिरुच्चैः सपदि पदमुरु त्यज्यते दैत्यवर्गैः
येभ्यो धर्तुं च मूर्ध्ना स्पृहयति सततं सर्वगीर्वाणवर्गः ।
नित्यं निर्मूलयेयुर्निशिततरममी भक्तिनिघ्नात्मनां नः
पद्माक्षस्यांघ्रिपद्मद्वयतलनिलयाः पांसवः पापपङ्कम् ॥१०॥
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज, भगवान श्रीविष्णूच्या चरण कमला वरील धुळीचे वर्णन करीत आहेत. त्या चरणावर समर्पित केलेल्या पुष्पांचा परागकणांनाच येथे धूली म्हटलेले आहे.
त्या धूलीचा तीन वर्गांवर वेगवेगळे कसे तीन परिणाम होतात हे स्पष्ट करताना आचार्य श्री म्हणतात,
येभ्योऽसूयद्भिरुच्चैः सपदि पदमुरु त्यज्यते दैत्यवर्गैः –
ऊरुपद म्हणजे सर्वश्रेष्ठ जागा. अर्थात स्वर्ग. येथे भगवान विष्णूच्या चरण धूलीची केवळ जाणीव झाली तरी दैत्य ते स्थान सोडून देतात. अर्थात भगवंताच्या येण्याच्या आधीच दैत्य निघून जातात हा भाव.
येभ्यो धर्तुं च मूर्ध्ना स्पृहयति सततं सर्वगीर्वाणवर्गः – गीर्वाण वर्ग म्हणजे देवता. त्या सगळ्या या धूलीला आपल्या मूर्घा म्हणजे डोक्यावर घेण्याची इच्छा बाळगत असतात. अर्थात भगवंताच्या चरणी वंदनेची त्यांना सदैव लालसा असते.
नित्यं निर्मूलयेयुर्निशिततरममी भक्तिनिघ्नात्मनां नः – आम्हा भक्तांच्या हृदयातील सर्व दोष नष्ट करणारी ही चरणरज,
पद्माक्षस्यांघ्रिपद्मद्वयतलनिलयाः पांसवः पापपङ्कम् – भगवान विष्णूच्या चरणकमल द्वयावर अर्थात जोडीवर राहणारी ही चरण धूली आमच्या पाप रुपी चिखलाला नष्ट करो.
ज्याप्रमाणे माती टाकल्यानंतर चिखल नष्ट होतो तशी भगवंतांची चरण धूली लागल्यावर भक्तांची सर्व पापे नष्ट होतात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply