आहुर्यस्य स्वरूपं क्षणमुखमखिलं सूरयः कालमेतं
ध्वान्तस्यैकान्तमन्तं यदपि च परमं सर्वधाम्नां च धाम ।
चक्रं तच्चक्रपाणेर्दितिजतनुगलद्रक्तधाराक्तधारं
शश्वन्नो विश्ववन्द्यं वितरतु विपुलं शर्म घर्मांशु शोभम् ॥२॥
भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
आहुर्यस्य स्वरूपं क्षणमुखमखिलं सूरयः कालमेतं
– क्षणापासून देवतांच्या काळापर्यंत अर्थात प्रलया पर्यंत संपूर्ण काळ हेच ज्याचे स्वरूप म्हटलेले आहे, अर्थात कालचक्र हेच ज्याचे स्वरूप आहे.
भगवंताच्या हातातील आयुधाचे नाव चक्र आहे. तर काळालाही कालचक्र असे म्हणतात. जणू सर्व काळाला संचालित करण्याची शक्ती म्हणूनच भगवंताच्या हातात सुदर्शन आहे ही आचार्यांची भूमिका अत्यंत रम्य आहे.
अर्थात या सर्व गोष्टींवर भगवंताचे नियंत्रण आहे, हे चक्र भगवंताच्या हातात आहे तोपर्यंत सु-दर्शन असते. एकदा ते भगवंताच्या हातातून सुटले की विश्व विनाशकारी असते. मात्र भगवंताच्या हातात असली तर अज्ञानाचा नाश करते. ते सांगताना आचार्य म्हणतात,
ध्वान्तस्यैकान्तमन्तं – जे सर्व प्रकारच्या अज्ञानरुपी अंधकाराचा विनाश करते.
यदपि च परमं सर्वधाम्नां च धाम – याच स्वरूपात जे सर्व प्रकारच्या तेजांचे तेज आहे. अर्थात ज्याच्यामुळे इतरांना तेज प्राप्त होते.
चक्रं तच्चक्रपाणे: – भगवान चक्रपाणिंच्या हातातील ते चक्र.
दितिजतनुगलद्रक्तधाराक्तधारं – त्यांच्या शरीरातील रक्तांच्या धारांनी या चक्राची धार भिजलेली आहे.
शश्वन्नो विश्ववन्द्यं वितरतु विपुलं शर्म घर्मांशु शोभम् – ते विश्ववंद्य असणारे सुदर्शन चक्र आम्हाला विपुल प्रमाणात शुभ आणि धर्माला शोभून दिसणार्या गोष्टी प्रदान करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply