ब्रह्मन्ब्रह्मण्यजिह्मां मतिमपि कुरुषे देव संभावये त्वां
शंभो शक्र त्रिलोकीमवसि किममरैः नारदाद्याः सुखं वः ।
इत्थं सेवावनम्रं सुरमुनिनिकरं वीक्ष्य विष्णोः प्रसन्न-
स्यास्येन्दोरास्रवन्ती वरवचनसुधा ह्लादयेन्मानसं नः ॥३७॥
भगवंताच्या नितांत रमणीय अशा प्रकारच्या दंतपंक्तीचे वैभव वर्णन केल्यानंतर त्या मुखकमलातून प्रकटणाऱ्या दिव्य वाणी चा विचार आचार्य श्री या श्लोकात करीत आहेत.
आपल्या समोर उपस्थित असणाऱ्या विविध देवतांना तथा ऋषीमुनींना भगवान ज्या शब्दात क्षेमकुशल विचारतात त्या शब्दावलीचे वर्णन आचार्यांनी येथे केले आहे. ते म्हणतात,
ब्रह्मन्ब्रह्मण्यजिह्मां मतिमपि कुरुषे देव संभावये त्वां – हे ब्रह्मदेवा ! ब्रह्म विषयक चिंतन केल्याने आपली बुद्धी ब्रह्मज्ञानाला प्राप्त होत आहे ना?
शंभो शक्र त्रिलोकीमवसि – हे भगवान शंकरा ! आपण या संपूर्ण त्रैलोक्याचा सांभाळ व्यवस्थित करीत आहात ना?
किममरैः नारदाद्याः सुखं वः – हे देव-देवतांनो तथा देवर्षी नारद ऋषी मुनींनो आपण सुखात आहात ना?
भगवान ब्रह्मदेवांना ब्रह्मविद्या, भगवान शंकरांना विश्व संचालक शक्ती, देवता आणि ऋषींना सुख अशा गोष्टींची विचारणा केली आहे? एखाद्या गोष्टीची विचारणा करावी त्याच्यामुळे ती गोष्ट प्राप्त होते. या न्यायाने वरील सर्व गोष्टी त्या सगळ्यांना भगवान विष्णूंचा कृपेने प्राप्त होतात असे आचार्य श्री सुचवत आहेत.
इत्थं सेवावनम्रं सुरमुनिनिकरं वीक्ष्य विष्णोः प्रसन्न – अशा पद्धतीनेऋषीमुनींच्या समुदायाला पाहून प्रसन्नपणे प्रगटणारी,
स्यास्येन्दोरास्रवन्ती वरवचनसुधा ह्लादयेन्मानसं नः – अशी चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे आल्हाददायक असणारी, भगवान श्रीविष्णूची वचनरूपी अमृतधारा आम्हा सगळ्यांच्या मनाला आल्हादित करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply