जीमूतश्यामभासा मुहुरपि भगवद्बाहुना मोहयन्ती
युद्धेषूद्धूयमाना झटिति तटिदिवालक्ष्यते यस्य मूर्तिः ।
सोऽसिस्त्रासाकुलाक्षत्रिदशरिपुवपुश्शोणितास्वाददृप्तो
नित्यानन्दाय भूयान्मधुमथनमनोनन्दको नन्दको नः ॥४॥
भगवंताच्या प्रत्येक आयुधाला एक स्वतंत्र आणि सुंदर नाव आहे. पहिल्या श्लोकात पांचजन्य नावाच्या शंखाचे, दुसऱ्या श्लोकात सुदर्शन नावाच्या चक्राचे, तिसऱ्या श्लोकात शार्ङ् नावाच्या धनुष्याचे वर्णन केल्यानंतर इथे भगवंताच्या नंदक नावाच्या खड्ग म्हणजे तलवारीचे वर्णन करीत आहेत.
त्याचे गुण वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
जीमूतश्यामभासा – जीमूत म्हणजे मेघ. त्याप्रमाणे या तलवारीचा रंग आहे. वास्तविक तलवारीचा रंग चमकदार पांढरा स्वच्छ असतो. पण भगवान स्वतः मेघश्याम असल्याने तलवारीच्या पात्यावर त्यांचे प्रतिबिंब पडल्याने तलवार त्या रंगाची दिसत आहे. आचार्य आणि त्यासाठी भासा असा शब्द वापरला आहे.
मुहुरपि भगवद्बाहुना मोहयन्ती- जी भगवंताच्या हातात अत्यंत शोभून दिसत आहे.
युद्धेषूद्धूयमाना झटिति तटिदिवालक्ष्यते यस्य मूर्तिः – युद्धामध्ये अत्यंत त्वरित गतीने उपसल्यामुळे ती एखाद्या विजेप्रमाणे लखलखत आहे.
सोऽसिस्त्रासाकुलाक्षत्रिदशरिपुवपुश्शोणितास्वाददृप्तो – दैवतांचे शत्रू असणाऱ्या राक्षसांच्या कुळातील वीरांचा आघाताने होणाऱ्या वेदनांमुळे रडणाऱ्या, शरीरातील रक्ताचा स्वाद घेऊन जी तृप्त होते, अशी ती ,
नित्यानन्दाय भूयान्मधुमथनमनोनन्दको नन्दको नः – मधु नावाच्या राक्षसाचा विनाश करणाऱ्या भगवंताला आनंद देणारी तलवार आम्हाला नित्य आनंद प्रदान करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply