सर्वत्रास्ते सर्वशरीरी न च सर्वः
सर्वं वेत्त्येवेह न यं वेत्ति च सर्वः।
सर्वत्रान्तर्यामितयेत्थं यमयन्य
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१२।।
त्या परमात्म तत्त्वाच्या लोकविलक्षण स्वरूपाचे अधिक विस्तृत वर्णन करताना आचार्य श्री शब्द वापरतात,
सर्वत्रास्ते – ते एकच परमात्म तत्व सर्वत्र व्यापलेले आहे.
ज्याचा ज्याचा म्हणून आपल्याला भास होतो, जाणीव होते, त्या सर्व स्वरूपात मुळात तेच नटलेले आहे.
सर्वशरीरी – सर्व शरीरामध्ये तेच व्यापलेले आहे. येथे शरीर शब्द आकार या अर्थाने घेतला की संपूर्ण चराचर सृष्टीला लागू पडतो. त्या सगळ्यांमध्ये तेच तत्त्व भरलेले आहे.
न च सर्वः – मात्र या सगळ्यांपेक्षा ते पुन्हा वेगळेच आहे. या सगळ्यात असून सुद्धा यापैकी कशाचाही लेप त्याला लागत नाही.
सर्वं वेत्त्येवेह – जे सर्व काही जाणते. अर्थात परमज्ञान हेच त्या तत्वाचे स्वरूप असल्याने त्याला अज्ञात असे या अनंत कोटी ब्रह्मांडात काहीही नाही.
प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांचेच चैतन्य असल्याने, शेवटी सर्व गोष्टी त्यांच्याच इच्छेने चालत असल्याने, ते सर्व काही जागतात
न यं वेत्ति च सर्वः- मात्र सगळे त्यांना जाणू शकत नाहीत. अर्थात बाकी सर्वत्र चैतन्य मर्यादित स्वरूपात असल्याने कोणीही त्यांना या मर्यादांच्या सह पूर्णपणे जाऊ शकत नाही.
सर्वत्रान्तर्यामितयेत्थं यमयन्य – सर्वांच्या अंतर्यामी त्यांच्याशिवाय दुसरे काहीही नाही अशा स्वरूपात भक्त ज्यांना जाणतात
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा नाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply