सर्वं दृष्ट्वा स्वात्मनि युक्त्या जगदेत
द्दृष्ट्वात्मानं चैवमजं सर्वजनेषु।
सर्वात्मैकोऽस्मीति विदुर्यं जनहृत्स्थं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१३।।
भगवान वैकुंठानाथ श्रीहरीच्या भक्ताची, उपासकाची अवस्था कशी असते? हे सांगण्याच्या निमित्ताने वेदांत शास्त्रातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आचारी आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.
तशाच एका विवेचनात ते म्हणतात,
सर्वं दृष्ट्वा स्वात्मनि युक्त्या जगदेत – भगवंताचा हा भक्त युक्तीने या संपूर्ण जगाला आपल्याच आत पहात असतो.
वेदांत शास्त्रात ज्या महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. अर्थात या आनंद कोटी ब्रह्मांडांमध्ये जे जे काही विद्यमान आहे ते आपल्या या शरीरातही विद्यमान आहे.
आपले हे मानवी शरीर म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाचे खूप छोटे प्रतिरुप आहे.
याच साठी विज्ञानाला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा ते मोठ्या दुर्बिणी किंवा साधने घेऊन बाहेर पाहतात. उलट भारतीय ज्ञानी व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ते डोळे मिटून साधनेद्वारे आत पाहतात.
भगवंताचा भक्त असेच आत पाहून संपूर्ण जगाचे ज्ञान आपल्या आतच घेत असतो.
त्याच्या त्या अंतर्मुख वृत्तीनेच त्याला सर्व ज्ञान होत असते.
द्दृष्ट्वात्मानं चैवमजं सर्वजनेषु – तो सर्व लोकांमध्ये स्वतःलाच पाहतो.
ही दुसरी अवस्था अधिक महत्त्वाची आहे. आपल्या आत मध्ये संपूर्ण चैतन्याचा अनुभव घेतल्यानंतर तेच चैतन्य सर्वत्र व्यापलेले आहे, याचे दर्शन येथे अपेक्षित आहे.
चराचर सृष्टीत सर्वत्र मीच व्यापलेला आहे. याचे ज्ञान झाल्या नंतर कोणाकडूनही काहीही अपेक्षा उरत नाही आणि कोणाशीही वैर देखील उरत नाही.
त्यामुळे कशाचेच दुःख नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही.
सर्वात्मैकोऽस्मीति विदुर्यं जनहृत्स्थं -मी सर्वत्र व्यापलेला सर्वात्मक आहे असे जो मनुष्य हृदयात जाणतो,ती जाणीव ज्यांच्या कृपेने साकार होते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्री विष्णूंचे मी स्मरण करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply