सर्वत्रैकः पश्यति जिघ्रत्यथ भुङ्क्ते
स्प्रष्टा श्रोता बुध्यति चेत्याहुरिमं यम्।
साक्षी चास्ते कर्तुषु पश्यन्निति चान्ये
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१४।।
या ब्रह्मज्ञानी साधकाची अवस्था कशी असते? ते विशद करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
सर्वत्रैकः पश्यति – तो साधक सर्वत्र एकच पाहतो. अर्थात त्याला सर्वत्र केवळ आणि केवळ परमात्माच दिसतो. सर्वत्र त्याच चैतन्याचा सुरु असलेला चिद्विलास जाणवतो.
केवळ पाण्याच्याच नव्हे तर अन्य सर्व क्रियांमध्ये त्याला हीच चैतन्याची एकमेव जाणीव होत असते, हे सांगण्यासाठी आचार्य श्री पुढील काही क्रियांचे वर्णन करीत आहेत.
जिघ्रत्यथ – श्वास घेत असताना,
सुगंध घेत असताना.
भुङ्क्ते – भोजन करीत असताना.
स्प्रष्टा – विचारत असताना. बोलत असताना.
श्रोता – ऐकत असताना .श्रवण करीत असताना.
बुध्यति – समजत असते. जाणीव होत असते.
चेत्याहुरिमं यम् – मी तेच चैतन्य आहे अशी.
अर्थात अशा सर्व क्रिया करत असतांना त्या साधकाला केवळ सर्वत्र तेच चैतन्य दिसते. त्याचाच अनुभव येतो. ते चैतन्य हेच माझे स्वरूप आहे. याचीही त्याला जाणीव होत असते.
साक्षी चास्ते – अशावेळी तो केवळ साक्षी म्हणून राहतो.
प्रत्येक गोष्टीकडे केवळ पाहतो. त्यामुळे त्याच्या अंतःकरणात स्वीकारला त्यागाची कोणतीच भूमिका जागृत होत नसल्याने त्याला ना सुख होते ना दुःख.
कर्तुषु पश्यन्निति चान्ये – आपल्या कार्याकडे पाहत असताना किंवा इतरांच्या कृतीकडे पाहत असतांना त्याच्या अंतरंगात हे विचार कायम स्थिर असतात.
अशी अवस्था ज्या परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्री विष्णूंचे मी स्तवन करतो .
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply