वेदान्तैश्चाध्यात्मिकशास्त्रैश्च पुराणैः
शास्त्रैश्चान्यैः सात्त्वततन्त्रैश्च यमीशम्।
दृष्ट्वाथान्तश्चेतसि बुद्ध्वा विविशुर्यं
तं संसारध्वान्तविनासं हरिमीडे।।२३।।
भगवंताच्या आणि जगाच्या स्वरूपाला साधकांच्या समोर स्पष्ट करणाऱ्या शास्त्र ग्रंथांना आपल्याकडे तत्त्वज्ञान ग्रंथ असे म्हणतात.
अशाप्रकारची अफाट ग्रंथरचना भारतीय संस्कृतीत विद्यमान आहे.
आचार्य श्री येथे सांगताहेत की जरी असे अनेक प्रकारचे ग्रंथ उपलब्ध असले तरी शेवटी सगळ्यांचे अंतिम कथन एकच आहे.
साधकाच्या वेगवेगळ्या मानसिकतेचा, भावावस्थेचा, परिपक्वतेचा, अधिकार संपन्नतेचा विचार करीत त्या-त्या पातळीवर जाऊन हे ग्रंथ निरुपण करीत असल्याने त्यांचे स्वरूप असे अफाट झाले आहे. मात्र असे असले तरी अंतिम तत्त्व एकच असल्याने या सर्व ग्रंथातील अंतिम सिद्धांत देखील एकच आहे.
तेच सांगताना प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री म्हणतात,
वेदान्तैश्चाध्यात्मिकशास्त्रैश्च पुराणैः – वेदांता मध्ये अर्थात उपनिषदांमध्ये, अध्यात्मिक ग्रंथांमध्ये – शास्त्रांमध्ये अर्थात दर्शन ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये उप पुराणांमध्ये,
शास्त्रैश्चान्यैः – अन्य शास्त्रांमध्ये या सगळ्याची निरूपण करणाऱ्या विविध शास्त्रीय ग्रंथांमध्ये,
सात्त्वततन्त्रैश्च – सात्वत तंत्रामध्ये.
वेद उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या निर्गुण निराकार परब्रह्माला साधकांच्या साधनेसाठी सगुण साकार स्वरूपात कल्पिल्यानंतर या तत्त्वाचे निरूपण करणाऱ्या तंत्रग्रंथ असे म्हणतात. आगम ग्रंथ असे म्हणतात.
आगम किंवा तंत्र म्हटल्यानंतर सामान्यतः शैव ग्रंथांचाच विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. मात्र गाणपत्य, शाक्त, सौर अशा सर्वच संप्रदायांचे स्वतःचे आगम ग्रंथ आहेत. यापैकी वैष्णव संप्रदायाचे जे आगम ग्रंथ त्यांना सात्वत ग्रंथ किंवा पांचरात्र ग्रंथ असे म्हणतात. त्याचा उल्लेख आचार्य श्री येथे करीत आहेत.
यमीशम् दृष्ट्वाथान्तश्चेतसि बुद्ध्वा विविशुर्यं – ह्या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून च्या भगवंताला जाणून घेऊन, स्वतःच्या बुद्धीत स्थिर करून, साधक ज्या स्वरूपात लीन होतात,
तं संसारध्वान्तविनासं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply