श्रद्धाभक्तिध्यानशमाद्यैर्यतमानै
र्ज्ञातुं शक्यो देव इहैवाशु य ईशः।
दुर्विज्ञेयो जन्मशतैश्चापि विना तै
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२४।।
भगवत् प्राप्ती भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी विविध मार्गांची निरूपण भारतीय संस्कृतीत केलेले आहे. साधकाची जशीजशी मनो अवस्था असेल, जशीजशी पात्रता म्हणजे अधिकार असेल त्यानुसार त्याला वेगवेगळी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अशा शास्त्र प्रतिपादित साधनांचा द्वारेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते हे विशद करीत आचार्य श्री येथे म्हणतात,
श्रद्धाभक्तिध्यानशमाद्यै: – श्रद्धा, भक्ती, ज्ञान, शम इत्यादी, साधनांच्या द्वारे.
भगवंताच्या भक्तीचे जे मार्ग वर्णन केलेली आहेत त्यांचे सामान्यतः चार स्वरूपात वर्णन केले जाते. कृषिप्रधान असणाऱ्या साधकांसाठी कर्ममार्ग. भावनाप्रधान असणाऱ्या साधकांसाठी भक्तिमार्ग. चिंतन प्रधान असणाऱ्या साधकांसाठी ज्ञानमार्ग. जितेंद्रिय साधकांसाठी योगमार्ग अशा स्वरूपात ही स्थूल विभागणी आहे.
येथे श्रद्धा, भक्ती, ज्ञान ,शम असा उल्लेख आचार्यश्री करतात. त्यातील शम हा योगमार्गा करिता आलेला आहे.
इत्यादी असा शब्द वापरून गुरुकृपा इत्यादी अन्य मार्ग देखील आहेत असे आचार्य सुचवत आहेत.
यतमानै – या मार्गांनी जे प्रयत्न करतात.
र्ज्ञातुं शक्यो देव – ते भगवंताला जाणू शकतात.
इहैवाशु – इथेच तत्काल. यात इथेच म्हणताना याच जन्मात, याच जगात, हा अर्थ आहे. तसेच भगवंताची प्राप्ती तत्काळ होऊ शकते. फक्त त्या मार्गाची तीव्रता तितकी हवी हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत.
य ईशः- अशा साधकांना जो भगवान भेटतो,तोच माझा उपास्य श्रीहरी आहे.
दुर्विज्ञेयो जन्मशतैश्चापि विना तै – या साधनांच्या शिवाय मात्र शेकडो जन्म प्रयत्न करून देखील भगवंताची प्राप्ती अशक्य आहे हे सांगताना आचार्य श्री शास्त्रशुद्ध प्रयत्नांचे महत्त्व सांगत आहेत.
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – संसार रुपी सागराचा विनाश करणाऱ्या अशा त्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply