क्षेत्रज्ञत्वं प्राप्य विभुः पञ्चमुखैर्यो
भुङ्क्तेऽजस्रं भोग्यपदार्थान्प्रकृतिस्थः।
क्षेत्रे क्षेत्रेऽप्स्विन्दुवदेको बहुधास्ते
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२७।।
एकमेवाद्वितीय असणाऱ्या परमात्मतत्त्वाच्या जीव स्वरूपात अनेक रूपांत प्रगट होणार्या लीलेचे वर्णन करताना आचार्यश्री येथे त्यामागील रहस्य उलगडून दाखवत आहेत.
ते म्हणतात,
क्षेत्रज्ञत्वं प्राप्य विभुः- ते परम व्यापक तत्व, परमात्मा जीव स्वरूपामध्ये देहात मर्यादित होतो. त्यावेळी असे मर्यादित स्वरूप धारण करून,
पञ्चमुखैर्यो भुङ्क्ते – पंचज्ञानेंद्रिय रूपी मुखांनी मिळणाऱ्या सर्व संवेदना रुपी अन्नाला,
अजस्रं – सातत्याने मिळत राहणाऱ्या अखंड संवेदनांना, भोग्यपदार्थान्प्रकृतिस्थः – योग्य पदार्थांना प्रकृतीमध्ये म्हणजे देहा मध्ये निवास करून उपभोगत राहतो.
क्षेत्रे क्षेत्रेऽप्स्विन्दुवदेको बहुधास्ते – जसा एकच चंद्र असला तरी अनेक भांड्यांमध्ये प्रतिबिंब स्वरूपात तो अनेक रूपे धारण करतो, तसा परमात्मा एकच असला तरी अनेक देह रूपात प्रतिबिंबित झाल्याने अनेक जीव स्वरूपात कार्य करतो.
यामध्ये प्रतिबिंब म्हटले असल्याने त्या भांड्यात असलेल्या पाण्याचा कोणताही दोष किंवा गुण जसा चन्द्राला लागत नाही तसा देहातील चैतन्याने केलेल्या कोणत्याही कर्माचा लेप और
परमात्म्याला लागत नाही.
तसेच प्रत्येक प्रतिबिंब वेगळे असल्याने एकाच्या मुक्ती मुळे बाकीच्यांची मुक्ती होते असे नाही.
अशा स्वरूपात सर्व जीवस्वरूपात जो लीला करतो
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply