द्वन्द्वैकत्वं यञ्च मधुब्राह्मणवाक्यैः
कृत्वा शक्रोपासनमासाद्य विभूत्या।
योऽसौ सोऽहं सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३०।।
अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत.
ते म्हणतात,
द्वन्द्वैकत्वं यञ्च मधुब्राह्मणवाक्यैः – सर्व द्वंद्वांचा मध्ये असणारे ही एकत्व, मधु ब्राह्मण वाक्याच्या आधारे समजून घेऊन.
बृहदारण्यक नावाच्या उपनिषदांमध्ये मधु ब्राह्मण नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या द्वंद्वांमध्ये एकच परमात्मा चैतन्य कसे विलास करते ते सुस्पष्ट सांगितलेले आहे.
त्या कथनाचा आधार घेऊन आपण ही एकात्मता समजून घ्यायला हवी हे सांगत असताना आचार्य श्री आपले कथन कसे उपनिषद प्रतिपादित आहे हेच अधोरेखित करीत आहेत.
कृत्वा शक्रोपासनमासाद्य विभूत्या- असे जाणून घेतल्यानंतर शक्र म्हणजे देवराज इंद्राची उपासना करून जी विभूती म्हणजे ज्ञान प्राप्त होते त्याच्या आधारे.
येथे आरंभी उपनिषदातील ज्ञानाचा विचार केला त्यानंतर इंद्राची उपासना सांगितली. वेगळ्या शब्दात आचार्य श्री ज्ञानोत्तरा भक्ती कडे लक्ष वेधत आहेत. असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर,
योऽसौ सोऽहं सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं – तो जो आहे तो मी आहे. मी जो कोणी आहे तो तोच आहे.
अशा स्वरूपात कोणत्याही बाजूने विचार केला तरी ज्या परमात्म्याशी आपले एकत्व लक्षात येते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply