तावत्सर्वं सत्यमिवाभाति यदेत
द्यावत्सोऽस्मीत्यात्मनि यो ज्ञो न हि दृष्टः।
दृष्टे यस्मिन्सर्वमसत्यं भवतीदं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४०।।
शास्त्र सांगत आहे की अणूरेणूत सर्वत्र केवळ आणि केवळ परमात्माच भरलेला आहे. मात्र आपला अनुभव तसा नाही.
आपल्याला परमात्म्याशिवाय अन्य सर्व जाणवत राहते.
या दोन विपरीत बाबींचा समन्वय साधायचा कसा? शास्त्रा समोरची सगळ्यात मोठी कसरत असते.
त्यासाठीच शास्त्राने या जगाला स्वप्नवत म्हटले आहे. हे कथन मोठे अद्भुत आहे. हे शांतपणे समजून घ्यावे लागते.
समजा मी आपल्याला प्रश्न विचारला की स्वप्न खरे की खोटे? तर आपण क्षणात म्हणाल, खोटे. पण मग प्रश्न हा आहे की जर स्वप्न खोटे आहे, तर खोट्या स्वप्नातला खोटा साप पाहिल्यावर आलेला घाम खरा का आहे?
स्वप्न खोटे आहे हे आपण तेव्हा म्हणतो जेव्हा आपण जागृतीत असतो. स्वप्नात असेपर्यंत स्वप्न सत्यच वाटते. उठल्यावर त्याची असत्यता जाणवते.
जगाची नेमकी हीच अवस्था सांगताना आचार्य श्री म्हणतात,
तावत्सर्वं सत्यमिवाभाति यदेत – हे सर्व भासमान जग तोपर्यंतच सत्य वाटते.
द्यावत्सोऽस्मीत्यात्मनि यो ज्ञो न हि दृष्टः – जोपर्यंत अंतरंगात त्या सर्व जाणणाऱ्या जाणले जात नाही.
दृष्टे यस्मिन्सर्वमसत्यं भवतीदं –
एकदा त्याला पाहिल्यावर हे सर्व असत्य आहे हे कळते. जसे उठल्यावर स्वप्न असत्य होते याची सहज जाणीव होते.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply