प्राणानायम्योमिति चित्तं हृदि रुध्वा
नान्यत्स्मृत्वा तत्पुनरत्रैव विलाप्य।
क्षीणे चित्ते भादृशिरस्मीति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।६।।
भगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.
याच श्रुंखलेत ते पुढे म्हणतात,
प्राणानायम् – प्राणांचे आयमन अर्थात नियंत्रण करून, अर्थात प्राणायाम करून.
प्राणांच्या द्वारेच वृत्ती कार्य करीत असल्याने प्राणांचा अवरोध केला म्हणजे आपोआपच वृत्ती स्थिर होतात.
त्यासाठी प्राणायाम हा महत्त्वाचा उपाय आहे.
अर्थात या शास्त्रातील सुयोग्य जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनातच प्राणायाम करावा हे महत्त्वाचे. कारण प्राणायाम योग्य प्रकारे केल्यानंतर जसे फायदे मिळतात तसा मर्यादेच्या पलीकडे ताण देत प्राणायाम केला तर त्याद्वारे नुकसान देखील होऊ शकते.
ओमिति चित्तं हृदि रुध्वा – ओमकाराचे चिंतन करीत त्या प्राण्यांना हृदयात धरून ठेवावे. अर्थात स्थिर करावे.
त्यासाठी ओंकाराचे चिंतन हा सगळ्यात सुलभ मार्ग सांगितलेला आहे.
भगवंताच्या निर्गुण-निराकार स्वरुपाचेच ओंकार हे वर्णन असल्याने त्या स्वरूपाकडे जातांना त्या ओंकार नादाचा आधार साधकाला प्राप्त होतो.
नान्यत्स्मृत्वा – दुसऱ्या कशाचेही स्मरण न करता, अर्थात यावेळी भगवंता शिवाय कशाचेही चिंतन नसावे.
तत्पुनरत्रैव विलाप्य- त्या वृत्तीला प्राणांना तिथेच पुनरपि विलीन करावे.
अर्थात भगवंताचे चिंतन करीत असे चित्त एकाग्र केले की ते त्या अवस्थेत फार काळ रहात नसल्याने ते त्या भगवंताच्या स्वरूपातच विलीन होते.
क्षीणे चित्ते – अशा स्वरूपात चित्त क्षीण झाले, विलय पावले,
भादृशिरस्मीति विदुर्यं – की मी तेज स्वरूप आहे अशा स्वरुपात ज्यांना जाणता येते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंध:काराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply