यं ब्रह्माख्यं देवमनन्यं परिपूर्णं
हृत्स्थं भक्तैर्लभ्यमजं सूक्ष्ममतर्क्यम्।
ध्यात्वात्मस्थं ब्रह्मविदो यं विदुरीशं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।७।।
भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात,
यं ब्रह्माख्यं – ज्यांना ब्रह्म म्हटले जाते. अर्थात वेदात शास्त्रांत उपनिषदांमध्ये परब्रम्ह शब्दाचे वर्णन केल्या जाते त्याच तत्वाला येथे श्री विष्णू असे म्हटले आहे.
देवमनन्यं – ज्यांना अनन्य देव म्हटल्या जाते. अनन्य शब्दाचा अर्थ त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. ज्या एकमेवाद्वितीय तत्वालाच येथे श्री विष्णू असे म्हटलेले आहे.
परिपूर्णं – त्यात तत्वाला परिपूर्ण असे म्हणतात. त्यांना काहीही मिळवायचे नसते. ते स्वतःतच परिपूर्ण असतात. स्वयंपूर्ण असतात.
हृत्स्थं – त्याच तत्वाला हृदयस्थ परमात्मा असे म्हणतात.
भक्तैर्लभ्यम् – ते भगवत तत्त्व भक्तीने प्राप्त होते. भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याच्या हृदयात प्रगट होते.
अजं – जे कधीही जन्माला आलेले नाही. त्यामुळे त्याच्या विनाशाचा प्रश्नच येत नाही.
सूक्ष्ममतर्क्यम् – अत्यंत सूक्ष्म असल्याने तर्का द्वारे त्याला जाणता येत नाही. आपण तर्क कोणत्याच गोष्टींचा करू शकतो ज्या गोष्टीचा आपल्याला पूर्वी अनुभव आलेला असतो. भगवान तर्काच्या पलीकडे आहे.
ध्यात्वात्मस्थं – अंतरंगी ध्यान करून
ब्रह्मविदो यं विदुरीशं – ब्रह्मज्ञानी ज्याला अंतरंगी जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply