नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय


अर्जुन उवाच ।
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १

अर्जुन म्हणाला‚
कर्म, ब्रह्म, अध्यात्म कशाला म्हणती नारायणा?
कुणा म्हणावे अधिभूत? तसे अधिदैवही कोणा? १

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २

अधियज्ञ कसा? अन् या देही कोणाचा वास?
कसे जाणता अंतिम् क्षणि कुणी स्मरतो तुम्हास? २

श्रीभगवानुवाच ।
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ३

श्री भगवान म्हणाले‚
जे अविनाशी तेच ब्रह्म, अन् स्वभाव अध्यात्म
चराचरांच्या उत्पत्तीचे कार्य हेच कर्म ३

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४

नाशवंत अधिभूत, तसा अधिदैव पुरुष चेतन
देहामध्ये वास करी जो तो मी अधियज्ञ ४

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५

अंत:काली स्मरत मला जो त्यागी देहाला
सत्य हेच तू जाण, मिळे तो येउनिया मजला ५

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६

करतो संतत ध्यान जयाचे तेच अंति आठवतो
कौंतेया, नर ऐसा नंतर त्या तत्वाला मिळतो ६

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७

तेव्हा पार्था, युध्द करी तू मज स्मरता स्मरता
मिळशिल येउनि तूहि मला मनबुध्दी स्थिर धरता ७

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८

दिव्य श्रेष्ठ पुरूषोत्तमास जो नर भक्तीने भजतो,
योगबलाने निश्र्चयपूर्वक मनास स्थिर करतो
तो नर, पार्था, येउनी मिळतो त्या परमेशाला
ज्याच्या भक्तीवाचुन दुसरा विषयहि ना सुचला ८

कविं पुराणमनुशासितारम्
अणोरणीयंसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपम्
आदित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९

शासनकर्ता, ज्ञानि, पुरातन, कर्ता अन् धर्ता
सूक्ष्म अणूहुन, अंधारामधि तेजपुंज सविता
अशा अलौकिक रूपाचे जो नित्य स्मरण करी
(एकाग्रमने ध्यानधारणा भक्तीपूर्वक करी) ९

प्रयाणकाले मनसाऽचलेन
भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्
स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १०

दो भुवयांच्यामध्ये आणुनि केंद्रित करी प्राण
अंत:काली करी दिव्य त्या पुरूषाचे स्मरण
ऐसा नर मग कुंतिनंदना त्या पुरुषाठायी
नि:संशय रे अंतानंतर विलीन होउन जाई १०

यदक्षरं वेदविदो वदन्ति
विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति
तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११

ज्ञानी ज्या म्हणती अविनाशी, यती प्रवेशति ज्यात
-ब्रह्मचर्यपालन इच्छुन- ते सांगिन तुज संक्षिप्त ११

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२

कायाविवरे आवरून मन हृदयांतरि बांधती
प्राण मस्तकी आणुन नर जे योगहि आचरिती १२

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३

ॐ काराच्या उच्चरणासह स्मरण मला करिती
आणि त्यागिती देह, तयांना मिळते उत्तम गती १३

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४

अनन्यभावे सदासर्वदा स्मरतो नित्य मला
सुलभ होतसे माझी प्राप्ती ऐशा योग्याला १४

मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५

अशा प्रकारे मजप्रत येउनि जो योगी मिळतो
दु:खालय जो पुनर्जन्म, त्या घ्यावा ना लागतो १५

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६

स्वर्गस्थाना देखील असते येथे येणे मागे
मजप्रत आल्यावर, कौंतेया पुनर्जन्म ना लागे १६

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७

युगे हजारो मिळता हो ब्रह्माचा एक दिन
रात्रही तशी हजारो युगे असे जाणिती जन १७

अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८

दिवस असा सुरू होता येती सारे जन्माला
आणिक होता सुरू रात्र ते जाती विलयाला १८

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९

सर्व चराचर जन्मोजन्मी असे विवश असती
विलयानंतरच्या दिवशी मग पुन्हा जन्म घेती १९

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०

या तत्वाच्या पलीकडे पण असे एक गोष्ट
भूतमात्र जाती विलया पण जी न होई नष्ट २०

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१

या गोष्टीला ‘अक्षर’ संज्ञा जी अति परम गति
ती म्हणजे मम धाम, मिळे ज्या, त्या मिळते मुक्ती २१

पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२

ज्याच्या ठायी सर्व जीव, जो सर्व व्यापुनी राहे
परम पुरूष तो अनन्य भक्तीनेच लाभताहे २२

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३

योगी केव्हां मरण पावुनी घेती पुनरपि जन्म
आणिक केव्हा मरता होती मुक्त, सांगतो मर्म २३

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४

उत्तरायनातिल षण्मासी, दिवसा, ज्वालेत,
शुक्ल पक्ष, यामध्ये मरता योगि होति मुक्त २४

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५

दक्षिणायनातिल षण्मासी, रात्री, धूम्रात,
कृष्णपक्षामधिल मृतात्मा जन्म घेई परत
मृत्यूनंतर प्रथम जाई तो चंद्रलोकाला
पुण्य संपता पुनर्जन्म त्या लागे घ्यायाला २५

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६

अशा प्रकारे शुक्ल, कृष्ण या शाश्वत गति जगती
एकीमध्ये पुनर्जन्म अन् दुसरीने मुक्ती २६

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७

दोन्हीना जाणी जो योगी, होई मोहमुक्त
म्हणुनी, अर्जुना, सर्वकाल तू राहि योगयुक्त २७

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव
दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा
योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८

सांगितलेल्या ह्या तत्वाना जाणुन घेऊन
कर्मयोग आचरि जो योगी, हे कुंतीनंदन,
वेद, यज्ञ, तप, दान यातल्या पुण्यापलिकडचे
असे आद्य अन् परमस्थान जे, त्या जाउन पोचे २८

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..