नवीन लेखन...

श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व

Shreemant bajrao Peshwe

२८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची २७६ वी जयंती

श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सुत्र अभ्यासण्यासारखे आहे. बाजीराव हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. युद्धातील त्यांचे डावपेच चाकोरीबाह्य होते. त्यांची गुणग्राहकता उल्लेखनीय होती. बालवयापापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांबरोबरच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करुन, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे. २८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची २७६ वी जयंती आहे.

आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळेस दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गनिमी कावा या रणनीतीचा उपयोग झाला. मात्र, बाजीराव पेशवे राज्याचे प्रमुख बनले, त्यावेळेस त्यांनी चपळ घोडदळाचा प्रामुख्याने उपयोग केला. यामागचे कारण म्हणजे, कुठलीही रणनीती निर्माण करण्यासाठी तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे आपला शत्रू आणि त्याची ताकद, दुसरे आपल्याकडे असलेले सैन्य आणि तिसरे म्हणजे ज्या रणभूमीवर आपण लढत आहोत, तिची रचना. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्यावेळेस त्यांना मोगल, आदिलशाह, कुतूबशहा आणि अनेक अंतर्गत शत्रूंचा सामना करावा लागला. बाजीराव पेशवे राजे बनले, तेव्हा इतर राजेशाहीचा अस्त झाला होता आणि मोगल हेच प्रमुख आव्हान होते. मात्र, दोन्ही वेळेस मोगल सैन्याची संख्या ही मराठ्यांपेक्षा खूप जास्त होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री डोंगराचा वापर करुन मोगलांच्या सैन्याला सह्याद्रीच्या दर्याखोर्यात येण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला करुन त्यांना नामोहरम केले. गनीमी कावा म्हणजे शत्रू बेसावध असताना लहान सैन्यांद्वारे हल्ला करणे, त्याची असलेली रसद तोडणे, रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करणे.

युद्धाचे डावपेच परंपरेला सोडून बाजीराव पेशव्यांच्यावेळी परिस्थिती बदलली होती. फक्त मोगल हेच शत्रु राहिला होता. स्वराज्याच्या सीमा वाढल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सपाट भागापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे या भागात गनिमी कावा वापरणे कठीण होते. म्हणून बाजीराव पेशवांनी तेथे घोडदळाचा वापर करुन शत्रूला पराभूत केले. बाजीराव पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. ते परंपरेला सोडून युद्धाचे डावपेच वापरत होते. व्यक्तींमधील गुण हेरण्याचे कौशल्य त्याच्याकडे भरपूर होते. म्हणूनच त्यांनी आपल्या हाताखाली शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि इतर अनेक सरदारांना तयार केले. बाजीरावांनी युद्धाचे पहिले प्रशिक्षण वडिल बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अगदी लहानपणापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांबरोबरच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करुन, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे. कारण जीवन आणि मरणाच्या रेषेवर नेतृत्व करण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे सैनिकांच्या आघाडीवर राहून नेतृत्व करणे होय. ती बाजीराव पेशव्यांनी प्रत्यक्षात आणली होती.

बाजीराव पेशव्यांना भारताच्या इतिहासात योग्य ते महत्व दिले गेले नाही. याचे एक कारण असे मानले जाते की, ब्रिटिशांनी भारताची सत्ता मोगलांकडून जिंकून घेतली असे भारताच्या राजकीय नेतृत्वाला दाखवायचे होते. मात्र, सत्य वेगळे होते. ब्रिटिशांनी भारताची सत्ता मराठा साम्राज्याकडून जिंकलेली होती.

ते स्वतः घोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व करायचे. त्यांचे सैन्य घोडदळावर जास्त प्रमाणात अवलंबून होते. मोगलांचे सैन्य युद्धांच्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य, बायका-मुले घेऊन जायचे. त्यामुळे मोगल सैनिक एका दिवसात १० ते १२ किमीच पुढे जायचे. मोगलांचे सैन्य हे छोट्या शहराप्रमाणे असायचे. प्रत्येक दिवशी हे शहर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असे. त्यामुळे त्याची हालचाल ही अतिशय मंद होती. मात्र, बाजीरावांच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग मोगलांच्या चौपट होता. एक दिवसात ते ४० ते ५० किमी एवढे अंतर पार पाडायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्याबरोबर युद्धसामग्रीव्यतिरिक्त फारसे साहित्य नसायचे. प्रत्येक सैनिकांकडे भाला किंवा तलवार आणि एक-दोन दिवस पुरेल एवढे धान्य असायचे. इतर वेळी आजूबाजूला मिळेल ते धान्य वापरुन सैनिक आपले जीवन जगत असत. त्यामुळे त्यांना गतिमान हालचाली करणे शक्य होत असे.

२० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या

बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि ते एकमेव सेनापती आहेत, ज्यांनी या संपूर्ण लढाया जिंकल्या. त्यामुळेच साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहचले होते. त्यांनी लढलेल्या सर्वच लढायांचे वर्णन करणे शक्य नाही. मात्र, आज युद्धशास्त्राचा अभ्यास करणार्या व्यक्तींनी त्यांच्या लढायांचा, रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माळव्यात मोगलांविरुद्ध केलेली लढाई ही दुसरी महत्वाची लढाई. बुंदेलखंडच्या लढाईत त्यांनी छत्रसालाचे रक्षण केले. गुजरातमध्येही ते उत्कृष्टरित्या लढले होते. तसेच जंजिराच्या सिद्धी विरुद्धही ते उत्कृष्टपणे लढले होते. त्याची अत्यंत महत्वाची लढाई म्हणजे त्यांनी दिल्लीकडे केलेले कुच. त्यावेळी दिल्लीची सत्ता जवळजवळ मराठ्यांच्या हातात आली होती. समुद्र लढायांमध्ये त्यांनी पोर्तुगालविरुद्धही लढाई केली होती. नादिरशहाने मोगलांवर हल्ला करुन भारतात प्रवेश केला. त्यावेळी मोगलांच्या मदतीला जात असताना नर्मदेच्या काठी आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी आजही रावरखेडी या नर्मदेच्या काठावरील गावात आहे.

पालखेडची लढाई महत्त्वाची

त्यांच्या लढायामध्ये निजामाविरुद्ध झालेली पालखेडची लढाई महत्त्वाची मानली जाते.पालखेडच्या लढाईत निजामांनी मराठ्यांमध्ये फूट पाडून शाहू आणि त्यांच्या बंधूंना वेगवेगळे केले आणि शाहू महाराजांची राजधानी सातारा येथे कूच केले. त्यावेळा शाहू महाराज पुरंदरच्या किल्ल्यात गेले. बाजीराव त्यावेळी खानदेशामध्ये लढाईला होते. शाहू महाराजांनी त्यावेळी रक्षण करण्याकरीता बाजीरावांना सातार्याला बोलावले.

त्यावेळेस त्यांनी म्हटले होते, ‘तुम्हाला झाड कापायचे असेल तर त्याच्या फांद्या कापण्यात काही अर्थ नसतो, त्यासाठी झाडांच्या मुळांवर हल्ला करणे गरजेचे असते. यामागे बाजीरावांचा उद्देश होता की, मोगल सत्तेचे मूळ हे दिल्लीकडे होते. ते छाटून या साम्राज्याला धक्का देणे हाच उद्देश त्यांनी पालखेडमध्ये अमलात आणला.

म्हणून त्यांनी आपला पहिला हल्ला मोगल असलेल्या गुजरात भागात केला. त्यानंतर माळव्यात निजामांच्या रसदीचे जे तळ होते, त्यावर हल्ला केला. त्यामुळे निजामाचा दिल्लीशी असणारा संबंध तुटला. त्यानंतर बाजीरावांचे घोडदळ औरंगाबादला येऊन पोहचले. ती निजामाची राजधानी होती. त्यामुळे निजाम याकडे दुर्लक्ष करु शकला नाही. निजामाने पुणे-सातारा आणि पुरंदरच्या भागात असलेली आपली लढाई थांबवून बाजीरावांशी लढाई करण्याचा निर्णय घेतला. बरेच अतंर पार करुन निजामाचे सैन्य गोदावरी नदी पार करुन औरंगाबादला पोहोचले. निजामाला वाटत होते की ते मराठा घोडदळाचा पाठलाग करत आहेत. तिथे लढाई करण्यापेक्षा बाजीरावांनी त्यांना आणखी आत येऊ दिले आणि औरंगाबादपासून काही किलोमीटर अंतरावरील पालखेड या ठिकाणी त्यांना येण्यास भाग पाडले. या ठिकाणी येईपर्यंत निजामाची रसद तुटलेली होती, सैन्य थकलेले होते, अशा वेळी निजामावर बाजीरावांच्या सैन्याने दोन्ही बाजूंनी हल्ला केला. रसद बंद झाल्याने आणि काही हालचाल करता न येऊ शकल्याने निजामाचे खूप नुकसान झाले. ६ मार्चला निजामांनी बाजीराव पेशाव्यांसमोर शरणागती पत्करली.

हीच युद्धनीती माळव्याच्या युद्धात बाजीरावांनी वापरली. त्यांचे सैन्य वेगवेगळ्या दिशेने एका ठिकाणी जमा व्हायचे. त्यामुळे शत्रूला हल्ला करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी बाजीरावांच्या सैन्याचा मोठा तळ दिसत नसे. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणार्या १००-१५० सैनिकांवर हल्ला करुन काय निष्पन्न होईल, असे त्यांना वाटत असे. बाजीरावांचे सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून युद्ध भूमीवर एकत्र यायचे. याला इंग्रजीमध्ये (Concentration at the point of decision) असे म्हटले जाते. शेवटच्या क्षणी एकत्र आल्यामुळे शत्रूला त्याच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य व्हायचे नाही. तसेच शत्रूला आपला पाठलाग करायला लावून बाजीराव त्यांना थकवायचे आणि शेवटी शत्रूला अशा भागात यायला भाग पाडायचे, जिथे शत्रुवर ३-४ ठिकाणाहून हल्ला करणे सोपे व्हायचे.

या पद्धतीमुळे त्यांनी ज्यावेळी दिल्लीवर हल्ला करायचे ठरविले, तेव्हा ते सैन्य घेऊन दिल्ली येथील काल कटोरा येथे जाऊन बसले. तेव्हा मोगल सैन्यांचे रजपुतांचे घोडदळ खुप मोठे होते. पायदळ आणि तोफखानाही मोठा होता. अमीर खान हे मोगल सैन्याचे सेनापती होते. मोगल सैन्यात पठाण, तुर्कस्तान येथील अनेक सैनिक सामिल होते. मोगल सैन्याने काल कटोरा येथे सैन्याची रचना केली आणि मराठ्यांचा सामना करण्यासाठी तयार होऊन बसले. परंतु बाजीरावांनी आपणहून हल्ला करण्यापेक्षा त्यांना आपल्यावर हल्ला करण्यास भाग पाडले. विशिष्ट ठिकाणहून मोगल सैन्यावर धनुष्यबाण आणि हलक्या तोफगोळ्यांचा वापर करुन हल्ला केला गेला. अचानक बाजीरावांच्या सैन्याने मोगल सैन्यावर तलवारी भाल्यांनी हल्ला केला, तेव्हा मोगल सैन्याचा मोठा पराभव झाला. त्यामुळे मोगलांची माळवा प्रातांतील सुभेदारी ही पेशव्यांना मिळाली.

बाजीरावांनी पोर्तुगीजांशीही मोठ्या प्रमाणात लढाई केली. त्यांनी पोर्तुगीज आणि सिद्धी यांना हरविले. वसईची लढाई आणि सिद्धीशी झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. जंजिराच्या सिद्धीला कोकणामध्ये आपले राज्य पसरविण्यात त्यामुळे यश मिळाले नाही. बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याचा भारतातील इतिहासकारांनी फारच कमी अभ्यास केला आहे. जदुनाथ सरकार ग्रॅट डफ यांसारख्या काही इतिहासकारांनी त्यांचा अभ्यास करुन बाजीरावांचे युद्धकौशल्य सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया जिंकणारे ते एकमेव सेनापती होते.

त्यांच्यावर अनेक कादंबर्या, पुस्तके, चित्रपटेही निघाले. ना. सं. इनामदार यांच्या ‘राऊ या कादंबरीमध्ये त्यांच्या युद्धकौशल्यांचे चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. या पुस्तकावर मराठी मालिकाही निघाली होती. बाजीरावांवरची मालिका चांगली लोकप्रिय झाली होती. २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव पेशव्यांवर ‘बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढला. चित्रपटाची कथा ‘बाजीराव मस्तानीला केंद्रस्थानी ठेऊन असली तरी यामुळे लोकांना या महान योद्ध्यांचे गुण आणि योगदान समजण्यास नक्कीच मदत झाले.

बाजीराव पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती

युरोपमधल्या युद्धकुशल सैन्य अधिकार्यांनी बाजीरावांच्या कौशल्याचे कौतुक केलेले आहे. फिल्ड मार्शल मॉण्टगोमरी हे ब्रिटिश सैन्याचे सरसेनापती होते. दुसर्या महायुद्धात ब्रिटिश सैन्य जिंकले त्याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला दिले जाते. त्यांनी म्हटले आहे की, बाजीराव पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती होते. असेच कौतुक व्हिएतनाम सैन्यामध्येही केले गेले आहे. थोडक्यात बाजीराव पेशव्यांनी त्या काळाला योग्य ठरेल अशी युद्धनिती वापरुन त्यावेळचे निजाम, मोगल व ईतर शत्रूचा पराभव केला. त्यामुळेच त्यांचे इतिहासामधील स्थान आढळ आहे. भारताच्या शत्रूंनी बाजीरावांची घोडदौड थांबविण्याकरीता नादिरशहाला इराणमधून भारतात हल्ला करण्यासाठी बोलावले. बाजीराव त्यांच्याशी लढण्यासाठी जात असतां आजारी पडले आणि नर्मदेच्या काठावर त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव दिल्लीला पोहोचून नादिरशहाशी लढले असते, तर युरोपात गेलेला भारताचा कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन हे भारतातच राहिले असते. त्याचवेळी भारतात मराठ्यांचे साम्राज्य तयार झाले असते आणि कदाचित ब्रिटिशांनाही भारतभूमीमध्ये येणे आणि इथे राज्य करणे कठीण झाले असते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजानंतर बाजीराव पेशवे हे अतिशय सर्वोतकृष्ट रणनीती सेनापती होते.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

2 Comments on श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व

  1. नमस्कार.
    ही एक further कमेंट.
    #माझ्या वाचनात आलेलें आहे त्याप्रमाणे –
    १. फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी बाजीरावाच्या पालखेडच्या लढाँचा अभ्यास केलेला होता, व त्याची प्रशंसा केली होती.
    २. UK ( की USA ?) मधील मिलिटरी ट्रेनिंगमध्यील अभ्यासात, पालखेडच्या लढाईचा समावेश आहे.
    स्नेाहदरपूर्वक,
    सुभाष नाईक

  2. नमस्कार.
    पहिल्या बाजीरावावरील लेख उपयुक्त आहे. होय, बाजीराव एकही लढाई हरला नाहीं. पण, बाजीराव हा छत्रपतींचा पेशवा होता, आणि शाहू तर ‘बेभंडारा उचलून, आण घेऊन’, मुघलांचा मन्सबदार झाला होता, ‘मी मुघलिया सल्तनतीचें रक्षण करेन’ असें ववन त्यानें दिल्लीश्वराला दिले होतें, व तें त्यानें ‘इमानइतबारें’ त्याच्या १७४९ मधील मृत्यूपर्यंत पाळलें. ( त्याच्या आधीच १७४० मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला).
    – दुसरें म्हणजे, शाहू हा त्याला ताराबाईविरुद्ध सपोर्ट करून राज्यावर आणणार्‍यांच्या उपकारांखाली दबलेला होता. जसें, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव, पंरप्रतिनिधी, नंतरच्या काळात आंग्रे, इ. तो आपल्या सरदारांवर नियंत्रण ठेवूं शकला नाहीं. त्यातूनच, सेनापती दाभाडे व पेशवा बाजीराव यंच्यात लढाई झाली व तिच्यात दाभाडे मारला गेला.
    – निझामाला बाजीरावानें केव्हांच पूर्णपणें नमवलें असतें, युद्धात त्याला हरवलें होतेंच. पण , एक तर शाहूमुळे तें होऊं शकलें नाहीं ; आणि दुसरें म्हणजे, सातारा-कोल्हापुर या दुहीचा निझामानें फायदा घेतला.
    – युद्धात जिंकलेली रक्कम बाजीरावाला सरकारात, म्हणजे सातारा दरबारीं, जमा करावी लागत असे ; पण स्वार्‍यांचा खर्च तर त्याला स्वत:ला भागवावा लागत होता. त्यामुळे तो बिचारा कर्जबाजारी झाला .
    – जंजिर्‍यावरील स्वारी असफल होण्याचें मुख्य कारण म्हणजे, पंतप्रतिनिधी.
    – नागपुरकर भोसले, हे एक अन्य प्रकरण होते. त्यांना बागालकडील दिशा शाहूनें दिल्यामुळे, बाझीराव त्या rich प्रदेशात जाऊं शकला नाहीं, व त्याला उत्तरेकडील ‘सर्वांनी लुटलेल्या’ प्रदेेशातच स्वार्‍या कराव्या लागल्या.
    – अशा सर्व बाबींमुळे, बाजीराव अजेय सेनापती असूनही, राजजकारणाच्या दृष्टीनें , ‘हात बांधलेला ’ राहिला.
    मात्र, त्याचें महत्व राजपुतान्यातील राजांना कळलें होतें, म्हणूनच त्यांनी बाजीरावाला सन्मान दिला.
    – कदाचित, तें सर्व पाहूनच, त्याचा पुत्र नानासाहेब यानें सर्व सत्ता स्वत:च्या हाता घेण्याचें ठरवलें असावें.
    ( पण, नानासाहेबाच्या अनेक actions, strategically चुकल्या. अर्थात्, तो एक वेगळाच विषय आहे).
    – बाजीरावाच्या अकाली मृत्यूचा सर्वात अधिक दोष द्यावा लागेल तो त्याची आई, आणि त्याचा बंधू चिमाजी यांना; तसेंच पुण्याच्या तत्कालीन सनातनी ब्हाह्मणांना. मस्तानीला अंगवस्त्र म्हणून ठेवण्यास त्यांची हरकत नव्हती, पण लग्न करून तिचा पत्नी म्हणून बाजीरावानें स्वीकार करणें , हें त्यांना पसंत नव्हतें. ( बाजीरावाचे विचार काळाच्या किती पुढे होते, हें आपण समजून घ्यावे. Kudos to him for that ! ). आईनें तर विरोघ केलाच , पण जेव्हां प्रिय अनुज चिमाजीनें विरोध केला तेव्हां बाजीराव मनांत नक्कीच, ज्यूलियस सीझरप्रामाणें, ‘यू टू ब्रूते ! देन फॉल सीझर’ असें कांहीं म्हणाला असेल. बाजीराव आधीच पुणें सोडून कांहीं मैलांवरील हवेलीत मस्तानीसह जाऊन राहिलाच होता. त्यानें या मंडळींपासून दूर रहायचें ठरविलें होते. तो तिथूनच निझामा विरुद्ध लढण्यास गेला. ( शाहूनें त्याला ठेचूं दिलें नाहीं, म्हणून या निझामाशी पुन्हापुन्हा लाढाया !) . तेव्हां चिमाजीनें मस्तानीला कैदेत टाकले.
    – या सर्व गोष्ष्टींचा बाजीरावाला अत्यंत मनस्ताप झाला. निझामाकडून नेमाड भाग त्याला मिळाल्यानंतर, त्यानें तिकडेच, पुण्यापासून दूर मस्तानीसह रहायचें ठरविलें होतें. पण, त्यानें सांगूनही चिमाजीनें मस्तानीला कैदेतून सोडलें नाहीं. त्या तिरीमिरीतच, बाजीरावानें अंगात ताप अशतांना नदीत आंघोळ केली, व त्यामुळे त्याचा ज्वर वाढून , त्यावें रावेरखेडी येथें अकाली निधन झालें. तो आाजारी असतांना, विनंती करूनही, चिमाजीनें मस्तानीला धाडलेंच नाहीं. बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानी सुटली खरी, पण तिनें आत्महत्या केली.
    – यावरून त्या काळातील पेशव्यांच्या खानदानातील कर्मठपणा दिसून यावा.
    – बाजीरावाच्या मृत्यूचें मुख्य कारण म्हणजे, त्यालोा आलेलें acute depression , व कौटुंबिक आणि सामाजिक front वर अपयाशी ठरल्याची सल. Alas ! एक महान सेनापती ‘दकियानूसी’ला बळी पडला.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..