नवीन लेखन...

श्रीमंत सासर

रोपांना पाणी देणाऱ्या त्यांच्या पत्नी आनंदीबाईना रघुनाथरावांनी हाक मारली आणि म्हणाले… अगं ऐकतेस का, मी तुला रात्री एक लाख रुपये दिले होते ते दे, मी आता काही कामानिमित्‍त बाजारात जात आहे, जवळच बँक आहे. जाताजाता पैसे जमा करुन येतो.

आनंदीबाईंनी रोपांना पाणी देणे थांबवले आणि पटकन रघुनाथरावकडे आल्या आणि म्हणाल्या… २ मिनिटे थांबा, मी आत्‍ता पैसे घेऊन येते. असे म्हणत आनंदीबाई त्‍यांच्या खोलीत गेल्या आणि कपाट उघडून पैसे काढू लागल्‍या. ज्‍या जागी त्‍यांनी पैसे ठेवले होते.. तिथे पैसे नव्हते. त्‍यांनी घाईघाईने कपाटात ठेवलेले सर्व सामान व कपडे इकडे तिकडे विखुरून पैशाचा शोध सुरू केला. मात्र कपाटात पैसे नव्हते.

आनंदीबाईंनी त्‍यांचा पलंग उचकला, चादर ओढली, गादी आणि उशीच्या खाली पुन्हा पुन्हा पाहिलं, पण त्‍यांना पैसे मिळाले नाहीत.

तेवढ्यात रघुनाथराव खोलीत आले काय झाले आनंदी अजून पैसे आणुन दिले नाहीस… रघुनाथरावनी खोलीची दुरावस्था बघितली आणि म्हणाले, अरे आनंदी, दोन मिनिटात खोलीची ही काय अवस्‍था करुन ठेवली आहेस?

खोलीतील फर्निचरचे सर्व ड्रॉवर्स उघडत आनंदीबाई म्हणाल्या आता तुम्‍हाला काय सांगू,…. मला पक्के आठवते की मी पैसे कपाटातच ठेवले होते…. पण आता पाहते तर पैसे नाहीत, मी सगळी खोली पालथी घातलीय, तरीही पैसे सापडत नाहीयेत…

रघुनाथराव म्हणाले तुला पक्के आठवते का की तू कपाटात पैसे ठेवले होते… हो मी कपाटातच पैसे ठेवले होते हे नक्की आठवते. आनंदीबाई म्‍हणाल्‍या.

रघुनाथराव आश्चर्याने म्हणाले… मग पैसे कुठे गायब झाले. घरातला आवाज ऐकुन, दोन्ही मुलं आणि सूना त्‍यांच्या खोलीत आले तेही खोलीत सर्वत्र शोधु लागले… धाकटी सून स्वयंपाकघरात भाजी करता करता इकडे आली होती, म्हणून ती भाजी करण्‍यासाठी परत स्वयंपाकघरात गेली.

मोठी सून आनंदीबाई ना म्हणाली, आहो आई, तुम्‍हांला नीट आठवतं ना, कपाटात पैसे ठेवल्‍याचे. आता ही गोष्ट वारंवार विचारून माझे डोकं खराब करू नकोस, घरातून पैसे कसे गायब होतात हेच समजत नाही आनंदीबाई म्‍हणाल्‍या…

आनंदीबाई थोडावेळ गप्प बसल्या.. मग अचानक त्‍यांच्या मनात काही विचार आला, त्‍यांनी मोठ्या सुनेला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाल्‍या…. तु काल धाकट्या सूनबाईला माझ्या खोलीकडे येताना पाहिलं होतं का?

हो आई काल रात्री जाऊबाई तुमच्‍या खोलीत दूध घेऊन आल्‍या होत्‍या. पण तूम्‍ही बाबांसोबत बाहेर झोपाळयावर बसलेल्‍या होता, म्हणून ती खोलीत दूध ठेऊन आली होती. आणि जाताना माझी मुलगी सिध्‍दीला सांगितले की, आजी-आजोबांना निरोप दे, तुमचं दूध खोलीत ठेवलं आहे, नंतर ते पिऊन घ्‍या म्‍हणुन..

मोठ्या सुनेचे बोलणं ऐकून… आनंदीबाई मोठ्या सुनेशी बोलल्या.. थोरल्‍या सुनबाई, माझ्यावर विश्वास ठेव अगर ठेऊ नको, पण आता हे पैसे धाकट्या सुनेनेच चोरले आहेत. अगं फक्त २ दिवसांपूर्वी तिच्‍या भावाचा फोन आला होता… त्याची नोकरी गेली आहे म्हणून, आणि तो स्वतःचा नविन व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलत होता. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती.

आनंदीबाई रघुनाथरावांकडे गेल्‍या आणि म्हणाल्‍या… मी खात्रीपुर्वक सांगते. तुम्‍हाला या गरीब घरातल्‍या मुलीची दया आली, आणि तूम्‍ही तिला आपल्या घरची सून बनवलंत, पण पहा एक दिवस ही गरीबा घरची मुलगी तुमची लाखोंची फसवणूक करून फरार होईल.

आनंदीबाईना फटकारत रघुनाथराव म्हणाले.. आनंदी आपल्या घरची सुन आहे ती, सुनेबद्दल असं कोण बोलतं का? गरीबा घरची मुलगी असणं म्हणजे चोर असणं नव्हे. इथेच कुठेतरी ठेवलं असेल… नीट बघा घरातून कुठे जातील…

आनंदीबाईंसाठी धाकट्या सुनेने पाणी आणले होते… आणि दरवाज्‍यातुन येताना तिने सर्व ऐकले होते… तिने आनंदीबाईंना पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली.. हे खरे आहे की २ दिवसांपूर्वी माझ्या भावाचा फोन आला होता, त्याला पैशांची गरज होती. पण त्याने मला पैशांची गरज आहे म्‍हणुन फोन केला नव्‍हता… त्याने मला फोन केला की त्याने कर्ज घेऊन नवीन व्यवसायाची सुरवात केली आहे. आणि त्याने माझ्याकडे पैसे मागितले असते तरी मी त्याला थेट तुमच्‍याशी अथवा बाबांशी बोलायला लावले असते.

समजा मी गरीब घरातली, माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तेवढी ठीक नाही… पण याचा अर्थ असा नाही की इथं घरात थोडं जरी इकडे तिकडे काही झाले तर सर्व दोष तुम्‍ही मला देऊन टाकणार. आई मी या घराची सुन आहे आहे, चोर नाही.

काही दिवसांपूर्वीच तुमचा सोन्याचा हार गहाळ झाला होता. त्यामुळे काहीही विचार न करता तूम्‍ही लगेच माझ्यावर संशय घेतला आणि जाऊबाईंना सांगितले की तिच्या बहिणीचे लग्न आहे, तिनेच चोरला असेल हार, त्‍यातुन तिच्या बहिणीचे दागिने तयार करणार असतील…. पण थोड्या वेळाने तुम्‍हाला तो हार तुमच्‍याच कपाटात साडीत अडकलेला दिसला… मला वाटलं हे सगळं बघून तुम्‍हांला आता तरी वास्‍तवाची जाणीव झाली असेल…. म्हणूनच मी तुम्‍हांला काही बोलले नाही.

मी माझ्या माहेरी जात असतांनाही तुम्ही माझी साड्यांनी भरलेली बॅग तपासता, की मी इथल्‍या काही किमंती वस्‍तु माझ्या माहेरी घेऊन तर जात नाहीये ना मला सगळे माहित आहे, तूम्‍ही माझ्याकडे या घरच्या सूनेपेक्षा कमी आणि चोराच्या नजरेने जास्त पाहता……

माझ्या सासर्‍यांचा चांगला स्वभाव पाहून माझ्या बाबांनी त्यांना मुलगी द्यायला होकार दिला होता, मोठ्या घरी मुलगी सुन म्‍हणुन गेली, पोरीनं नशीब काढलं असं भाऊबंदानां अत्‍यंत्‍य अभिमानाने सांगायचे. पण माझ्या बाबांना हे माहीत नव्हते की, मुलींची माहेरची गरीबी ही श्रीमंत सासरी अभिशाप ठरते. गरीब घरातून आलेल्या मुलीला श्रीमंत सासरचे लोक नेहमीच दुय्यम दर्जा देतात. नाहीतर या घरात मोठ्या जाऊबाई सुद्धा राहतात, माझ्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्यावर कधीच संशय घेतला नाही कारण त्या श्रीमंत घरच्‍या आहेत आणि मी गरीब घरची आहे.

इतक्‍यात, धाकट्या सुनेचा नवरा सतिष जोरात ओरडत खोलीत आला आणि म्हणाला, आई, तुझे पैसे मिळाले आहेत, सिध्‍दीला झोपेतुन उठवायला गेलो हाते. तिच्या खोलीत तिचा ऑनलाइन क्लास सुरू होणार होता. तिथ मी पाहिलं तर पैसे तिच्या पलंगावर विखुरलेले होते… मी सिध्‍दीला विचारले, तिने सांगितले की काल ती आजीच्या खोलीत गेली होती, आजीचे कपाट उघडे होते, त्यात इतक्या नोटा पाहून तिने त्या उचलल्या आणि तिच्या खोलीत आली.

शॉपिंग शॉपिंग खेळ खेळायला सुरुवात केली. तिला वाटले खेळून झाल्यावर आजीचे पैसे पुन्‍हा कपाटात नेऊन ठेवता येतिल…. पण खेळता खेळता तिला झोप लागली आणि ती नुकतीच उठली.

धाकट्या सुनेला पाहून आनंदीबाईंचा चेहरा फिका पडला. आणि स्वत:च्या स्वाभिमानावरचा खोटा आरोप पाहून धाकट्या सुनेचा चेहरा अभिमानाने उजळला. धाकट्या सुनेच्या चेहऱ्यावरचे तेज तिच्या माहेरच्या घरातील संस्कारही उजळून निघाले होते.

सतीष बायकोला म्हणाला, जा चहा बनव, इतक्या वेळ आईच्या अशा विचित्र वागण्‍याने माझे डोके दुखत आहे…

धाकटी सून चहा करायला स्वयंपाकघरात गेली…धाकट्या सुनेने पाण्याचे भांडे गॅसवर ठेवताच मागून सतीष आला आणि बायकोला मिठीत घेत म्हणाला…मी पण आईचे संपूर्ण बोलणं ऐकले होते… मला खरंच अंदाज नव्‍हता आई असा विचारही करू शकते…… पण आईच्या तुझ्याबद्दलच्या चुकीच्या विचाराचा आज सपशेल पराभव झाला. मला नाही वाटत आता आई तुला असं काही बोलेल आणि तुझ्यावर संशय घेईल… आईने पुन्हा असं केलं तर सगळयात आधी मी तुझ्या स्वाभिमानाचं रक्षण करीन. मी तुला घेऊन दुसरीकडे जाईन… जिथे तुला तुझ्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची पुन्हा पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार नाही… आकाश हात जोडून बायकोसमोर उभा राहिला आणि म्हणाला… मला आणि बाबांना ही शेवटची संधी दे. यापुढे तुझा स्वाभिमान दुखावणार नाही याची मी काळजी घेईल.

धाकट्या सुनेने पाहिले की तिचे सासरेही किचनच्या बाहेर आनंदीबाईच्या वागण्याबद्दल तिची माफी मागत आहेत. सास-याचे आणि नवऱ्याचे प्रेम पाहून धाकट्या सुनेचे डोळे पाणावले.

गरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्‍या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्‍या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्‍ट प्रकर्षाने जाणवत राहते.

© शरद कुसारे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..