नवीन लेखन...

श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था

ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. खानदेशामधील म्हसवे या गावात जन्म घेतलेल्या या मुलाने लहान वयात शरीर कमावलेले होते. त्याला पोवाडे, आरत्या म्हणायची अत्यंत आवड होती. तसेच आपल्या आईच्या हाताखाली गावाशेजारच्या जंगलामधील वनौषधींची माहिती देखील होती. तरुणपणी दातांनी मोठा दगड उचलणे, छातीवरून जीप चालवणे अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी करणाऱ्या या महान व्यक्तीच्या आयुष्यात एक ब्रह्मचारी घरी चालत आला व त्याने योगाची दीक्षा दिली व त्यानंतर त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले.

पोलीस खात्यामध्ये असून देखील ते जणू काही करुणेची मूर्ती होते. कैद्याला दिवसा चोप देऊन रात्री त्याच्या पाठीवर हळदीचा लेप देणारी अशी दुसरी व्यक्ती पोलीस खात्याने पाहिलेली नसेल. याचमुळे स्वतःच्या वनौषधीच्या व योगाच्या ज्ञानाचा समाजातील पीडितांसाठी उपयोग करायला त्यांनी १९४९ पासून सुरवात केली. त्यावेळी ते मुंबईमध्ये कामाठीपुरा येथील पोलिसांच्या चाळीमध्ये रहात होते. तेथे त्यांनी पहिले काम केले ते म्हणजे तेथील व्यायामशाळेमध्ये बजरंगबलीची स्थापना. येथून त्यांच्या शक्ती उपासनेच्या कार्याची सुरवात झाली. अर्थात यामागे त्यांचे व्यायामाचे एक तप होते. येथेच त्यांनी धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांच्याकडून सूर्यनमस्काराची दीक्षा घेऊन बारा लक्ष सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण केला. या कार्यक्रमात दोन तासात १२०० म्हणजेच मिनिटाला दहा या वेगाने सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित झाला होता.

त्यांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले होते. त्यामुळे त्यांनी याच कालखंडामध्ये हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेचा अभ्यास केला. त्याचा त्यांना पुढील लोकसंग्रहासाठी तसेच पारमार्थिक वाङमयाच्या अभ्यासासाठी फार उपयोग झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही गुरू न करता गुरुजी स्वतः अनेक योगक्रिया शिकले व त्यात पारंगत झाले. इतके की त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या रामतीर्थ योगाश्रमातील श्री. संभाजी गिरोल्ला सारख्या योगसाधकांनी त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला.

त्यांनी हे जाणले की फक्त हवा आणि पाणी यांचा वापर करून योगाभ्यासाद्वारे स्वास्थ्य रक्षण आणि संवर्धन सहज शक्य आहे व ते साधल्यावर माणसाला अंतर्मुख होणे शक्य होईल व तो आत्मोन्नतीकडे वळेल. ‘नर करनी करे तो नरका नारायण बन सकता है।’ असे ते म्हणत.

कामाठीपुरा, वरळी, गिरगाव अशा मुंबईमधील अनेक ठिकाणी वास्तव्य करीत असताना गुरुजींची स्वतःची योगसाधना तसेच इतरांना योग शिकविण्याचा कम चालू होता. त्यांच्या गिरगाव येथील राहत्या घरी एप्रिल १९६५ मधील गुढीपाडव्याचे दिवशी “श्री अंबिका योग कुटीर” या संस्थेची स्थापना झाली. जागेची अडचण असून देखील त्यावर मात करीत योगशिक्षण चालू राहिले.

पोलीस खात्यामधून गुरुजी १९७५ मध्ये निवृत्त झाले आणि ठाणे येथील श्रीरंग सोसायटीमध्ये सीडी ४६/सी-१ या इमारतीमध्ये ते रहावयास आले. त्यांच्या राहत्या घरी कुटीरचे कामकाज सुरू होते. अल्पावधीतच त्यांची कीर्ती दूरवर पसरली व त्याच्या मार्गदर्शनासाठी लोक गर्दी करू लागले. त्यांनी एक संकल्प केला व तो आपल्या शिष्यांना बोलून दाखविला. तो असा की “कमीत कमी एक लाख लोकांना योगाभ्यासाच्या साधनेचा लाभ स्वतःच्या आयुष्यात व्हावा.” सर्व शिष्यांनी हा संकल्प उचलून धरला, आणि ‘श्री अंबिका योग कुटीर’ची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून १९८२ साली कायदेशीर नोंदणी झाली. पहिल्याच सभेत गुरुजींसहित सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः वर्गणी देऊन सुरवात केली व निधी संकलनाचे काम सुरू झाले.

यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे १९८५ साली श्रीरंग सोसायटीमध्ये सीडी ५१/ सी-१ हा बंगला संस्थेने विकत घेतला व संस्थेचे कार्य अधिक उत्साहाने सुरू झाले. सर्व कार्यकर्ते भावसमर्पणाद्वारे संस्थेचा दैनंदिन खर्चाचा भार उचलत होते. गुरुजींकडे शिकलेले ज्येष्ठ कार्यकर्ते शिक्षक म्हणून गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिकविण्याचे कार्य करू लागले. त्यामुळे कामाठीपुरा, मुलुंड, दहिसर, वांद्रा, बोरीवली अशा शाखांची सुरवात झाली. रिझर्व बँक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉकसारख्या आस्थापनांमध्ये योगवर्ग सुरू झाले.

‘मी कोणत्याही प्रकारची फी न घेता तळागाळातील जनतेपर्यंत योग पोहोचविणार’ असे व्रत गुरुजींनी घेतले. संस्था सुरू झाल्यावर दैनंद्रिन खर्चासाठी तरी नाममात्र फी घ्यावी असा सल्ला देणाऱ्यांना त्यांनी सक्त विरोध केला. ते म्हणत की तुम्हाला पैसा मिळणार नाही पण मोत्यासारखी माणसे मिळतील. या व्रताला कुटीर पूर्णपणे बांधील असून गेल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात कुटीर व त्याच्या आता असलेल्या ८७ शाखा निःशुल्क योगशिक्षणाचे काम निष्काम सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर चालू आहेत.

कुटीरच्या कामाचा व्याप वाढत चालला तसे सेवाभावी कार्यकर्त्यांचे मोहोळच तयार होत गेले. १९९२ साली मुलुंड येथील कालिदास सभागृहामध्ये समाजकारण, राजकारण, धर्मकारण इत्यादी क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य गुरुजींचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना जनता जनार्दनाचे वतीने मानपत्र देण्यात आले. यावेळी गुरुजींनी स्वतः पोवाडे गाऊन आणि अनेक कठीण आसनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याच वर्षी ठाणे येथील बी. के. मिल कंपाउंड येथील सध्याच्या वास्तुमध्ये कुटीरचे कार्य स्थलांतरित झाले. वास्तू विकत घेण्यासाठी त्यावेळी योग्य ते आर्थिक बळ नव्हते. परंतु सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे जोरावर कुटीरने १८ महिन्यात पैसे देण्याचा वायदा १४ महिन्यातच पूर्ण केला. गुरुजींचा जनता जनार्दनावरील विश्वास व कुटीरने केलेल्या जनसेवेची ही एक ह्रद्य पावतीच होती.

डिसेंबर १९९५ मध्ये भरलेल्या ‘बोर्ड ऑफ आंतरराष्ट्रीय ऑल्टरनेटीव्ह मेडिसिन’ च्या संमेलनामध्ये पू. गुरुजींना वैद्यकरत्न (Gem of Alternative Medicines) हा मानाचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. कुटीरच्या कार्याचा सुगंध दरवळू लागला. अनेक सन्मान मिळत गेले, रेडियो, दूरदर्शनवर अनेक योग कार्यक्रम होऊ लागले. महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून योग जागृती शिबिरांसाठी आमंत्रणे येऊ लागली व त्यातूनच कुटीरच्या एक एक शाखेचा जन्म होऊ लागला. नांदेड, गोवा, सातारा, वाई, अलिबाग, कारवार, बार्शी अशा दूरवरच्या गावामधून कुटीरच्या शाखा चालवल्या जाऊ लागल्या. एवढेच नव्हे तर कॅनडा, मॉरिशस, दुबई, ऑस्ट्रेलियासारख्या परदेशात देखील शाखा सुरू झाल्या. कुटीरच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले परदेशात आहेत. त्यांच्याकडे हे कार्यकर्ते ज्या ज्या वेळी जातात त्यावेळी तेथे ते योगवर्ग घेतात. त्यामुळे इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर यासारख्या देशात देखील कुटीरने शिकविलेले योगसाधक आहेत.

कुटीरकडे येणारे लोक अनेक व्याधी घेऊन येतात. साध्या अँसिडिटीपासून ते ह्रदयविकारापर्यंत किंवा डिप्रेशनसारख्या विकाराने ग्रस्त लोक योगसाधनेने बरे होण्यासाठी येतात. पू. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या शिक्षकांचे सहाय्याने अनेक योग कियांद्वारे या लोकांची बऱ्याच प्रमाणात त्या विकारापासून सुटका होते. केवळ आठवड्यात एक दिवस असे तीन महिने त्यांना यासाठी यावे लागते. परंतु कोणतीही फी न घेता आपण बरे झालो या उपकाराच्या भावनेतून यापैकी अनेक जण मग कुटीरचेच होतात. ते आपली सेवा देऊ लागतात. कुटीर हे एक त्यांना दुसरे माहेरच बनते. कोणताही अर्ज नाही, मुलाखत नाही, निवड नाही पण आज एका दिव्याने दुसरा दिवा लावावा त्याप्रमाणे कुटीरच्या ८७ शाखामधील १५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची फौज तयार झाली आहे.

कुटीरच्या कार्यकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांच्यामध्ये गुणात्मक वाढ व्हावी, ते उत्तम योगसाधक बनावे असा पू. गुरुजींचा कटाक्ष असे. त्यासाठी त्यांनी आठवड्याचा एकच दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांने कुटीरमध्ये किंवा शाखेत योग शिकविण्यासाठी यावे व इतर दिवशी घरी साधना करावी असा दंडकच घातला. हा दंडक आतादेखील पाळला जातो. त्याशिवाय त्या साधकांमधून उत्तम योग शिक्षक तयार व्हावे म्हणून दोन वर्षांचा प्राणायामाचा अभ्यासाम कुटीरमध्ये सुरू करण्यात आला. व या अभ्यासामामधील गुणवत्ता कमी होऊ नये म्हणून त्याचे शिक्षण फक्त कुटीरमध्येच स्वतः गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांच्या सहाय्याने सुरु झाले. असे कार्यकर्ते आता स्वतंत्रपणे आपापल्या शाखांमधून त्रैमासिक वर्ग चालवितात.

या कार्यकर्त्यांची जबाबदारी कुटीरने घेतल्यानंतर त्यांच्या योगज्ञानामधील गुणात्मक वाढीसाठी कुटीरने त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले. शिक्षक प्रशिक्षण तंत्र, शरीरविज्ञान व त्याच्याशी संबंधित किया व आसने, पारमार्थिक विकासासाठी स्वाध्याय असे कार्यक्रम सुरू करण्यात आले व आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

कुटीरच्या स्थापनेला २०१५च्या गुढीपाडव्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने २०१४ – १५ या संपूर्ण वर्षात सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कुटीरचा वाढलेला व्याप लक्षात घेता सात विभाग तयार केले व प्रत्येक विभागामध्ये कुटीरच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरे करण्यात आले. २ जानेवारी ते ४ जानेवारी २०१५ या कालावधीत कुटीरमध्ये एक भव्य योग संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनामध्ये योग तसेच पारमार्थिक क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. तसेच व्याधीनिवारण, योग प्रशिक्षण या विषयाशी संबंधित अशी चर्चासत्रे आयोजित करून योग प्रसार व प्रचाराचे काम करण्यात आले. त्यामुळे कुटीरच्या कार्यकर्त्यांना पुढील कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

कुटीरच्या आजच्या कार्याचे स्वरूप थोडक्यात सांगावयाचे झाले तर असे सांगता येईल की कुटीर तसेच शाखामधून त्रैमासिक अभ्यासक्रम, प्राणायाम अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. तसेच विविध शाळा, कार्यालये, औद्योगिक आस्थापना येथे योग जागृती शिबिरे कुटीरतर्फे सातत्याने घेतली जातात. तथापि लोकसंखेच्या प्रमाणात हे सर्व प्रयत्न तुटपुंजे आहेत याची कुटीरला जाणीव आहे. यासाठी योगक्षेत्रात काम करीत असलेल्या इतर संस्थांबरोबर संपर्क साधून एकत्रितपणे योगाचा हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कुटीर प्रयत्नशील आहे.

योगाचे शिक्षण लहान वयातच दिले तर भारताला भविष्यकाळामध्ये निकोप शरीर व मनाचे नागरिक मिळू शकतील. भारत हा जगातील जास्तीत जास्त युवक असलेला देश आहे. या युवकांमध्ये असलेल्या ऊर्जेला योगासारख्या विद्येने एक वळण दिले तर ती ऊर्जा देश घडविण्यासाठी उपयोगी पडेल. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य या दृष्टीने खूप मोठे आहे. योगाला आता या निमित्ताने राजाश्रय मिळाला तर एक फार मोठे परिवर्तन घडू शकते. त्या महान कामामध्ये आपला यथायोग्य वाटा उचलण्यास कुटीर कटिबद्ध आहे.

महानगरी वार्ताहर या वृत्तपत्रात जागतिक योग दिनानिमित्ताने श्री भास्कर पटवर्धन यांनी लिहिलेला एक जुना लेख.
९६१९५९००२६

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..