अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात.
भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात यातूनच तिचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
श्रीक्षेत्र मोरगाव येथे ज्या देवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत त्यापैकी श्री मयुरेश्वरांच्या सर्वात जवळ असलेले मंदिर आहे भगवती बुद्धीचे.
वेगळ्या शब्दात भगवान देवी बुद्धीला सर्व शक्तींमध्ये उजवी म्हणतात. तसेच सगळ्यात जवळ स्थान देतात.
तिथे विराजमान असलेल्या बुद्धीच्या मूर्तीच्या उजव्या हातात एक दीपक तर डाव्या हातात कमळ असते.
कमळ हे आत्मोन्नतीचे प्रतीक असते. कमळ चिखलात जन्माला येते. त्यानंतर ते उन्नत होत पाण्यात येते. पाण्यातून बाहेर येत सूर्यमुखी होत तेजाच्या दिशेने विकसित होते. हवेच्या झुळकी वर लहरत राहते.
वेगळ्या शब्दात पृथ्वी, आप, तेज, वायु असा हा विकास असतो.
आपल्या ही व्यक्तिमत्त्वाचा असाच विकास व्हायला हवा. तो विकास शेवटी बुद्धीच्या हातात आहे. हे सुचविण्यासाठी बुद्धीच्या हातात कमळ असते.
तिच्या दुसऱ्या हातात आहे दीपक. दीपकाचे प्रमुख कार्य आहे यथार्थ दर्शन. दीपकाच्या प्रकाशातच चराचर विश्वाचे यथार्थ ज्ञान होत असते. बुद्धीचा द्वारे ही आपल्याला असेच यथार्थज्ञान घडत असल्याने देवी बुद्धीच्या हातात दीपक आहे.
दीपक हाती असला की मार्गदर्शन मिळते. योग्य रस्ता दिसतो. देवी बुद्धी मोरयाचा सर्वाधिक जवळ आहे. तिच्या प्रकाशानेच माणूस भगवान गणेशां पर्यंत पोहोचू शकतो.
त्या बुद्धिपती पर्यंत पोहोचवणाऱ्या देवी बुद्धीचा हा उत्सव.
देवी बुद्धीचा आवडता रंग आहे पांढरा. पांढरा शुद्धतेचे, पावित्र्याचे ,मांगल्याचे प्रतीक आहे. त्याच सोबत तो शांतीचेही प्रतीक आहे. जीवाला ही शुद्धता आणि शांती देवी बुद्धीच्या कृपेनेच मिळत असते. या आत्मशुद्धी साठी आणि आत्मिक शांतीसाठी देवी बुद्धीची आराधना करावी.
अश्विनी शुद्ध नवमीला सूर्यास्त समयी महागाणपत्य महर्षी मुद्गल मुनींचे पिताश्री महर्षी अंगिरा तथा माता देवी श्रुती यांच्या आश्रमात देवी बुद्धी अवतरित झाली. त्या आवरणाच्या आधारे अश्विन शुद्ध नवमी ला सायंकाळी बुद्धी जन्मोत्सव साजरा केला जातो.
याची पूर्वपीठिका म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात बुद्धी नवरात्र साजरे केले जाते.
या काळात बुद्धीची विशेष उपासना करून संसाराचे यथार्थ ज्ञान करून देऊन, शुद्धता आणि शांती प्रदान करण्यासाठी तथा श्री मयुरेश्वर चरणा प्रती जाण्याचा मार्ग उजळवण्यासाठी तिची प्रार्थना करावी.
जय श्री बुद्धिमाते !
— विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply