नवीन लेखन...

श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ डॉ. सुनिल काळे ह्यांनी लिहिलेला हा लेख)


आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे. मंत्राचं पहिलं जे अक्षर असतं त्याला मंत्राचं शिर म्हणतात आणि हे शिर बदलले की त्या मंत्राचे गुणधर्म बदलतात. गणेशाच्या मंत्रामधल्या ग या अक्षराचा संबंध त्या हत्तीच्या मुखाशी (गजवदनाशी) आहे. ‘गज’ हा शब्द उलटा केला की ‘जग’ (म्हणजे विश्व) होते. तर विश्वाच्या मुळाशी असणारा तो गजवदन.

गणपति अथर्वशीर्षात गणपतीची स्तुती करताना गणक ऋषी म्हणतात – ‘त्व ज्ञानमयोविज्ञानमयोऽसि।’ गणपती जसा ज्ञानमय आहे तसाच तो विज्ञानमयही आहे. माणसाच्या जडबुद्धिला झेपणारा देव म्हणजे गणपती. शिसं या जड धातूपासून शेंदूर बनतो. शेंदूर फासलेला देव तो गणपती. गणपती या देवतेची खासियतच अशी आहे की त्याची कृपा झाली तर तो तुम्हाला मुलाधारचक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत नेतो. कारण मूळारंभ आरंभ गणपती शून्य अंशापाशी असतो. वर्तुळ ३६० अंशांचं असतं. शून्यापासून विश्वाची सुरूवात होते. गणेशविद्या हेच स्पष्ट करते की कोणत्याही अक्षरावर (गोष्टीवर) चंद्रकोर आणि अनुस्वार देणं म्हणजे वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व त्यात मिसळणं. कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व येण्यासाठी तिथं अनुस्वार यावा लागतो. याचं प्रतिक म्हणजे चंद्रकोर आणि तिच्यावर चांदणी (अनुस्वार) अशी चंद्रकोर फक्त दोनच दैवतांना आहे ती म्हणजे गणपती आणि शंकर. आरंभकर्ता (० अंश) गणपती आणि लयकर्ता (३६० अंश) शंकर हे एकाच ठिकाणी असतात. कारण ० अंश आणि ३६० अंश यांच्यामध्ये एक काल्पनिक अशी अतिशय पातळ रेषा असते. शून्यापासून ३६० अंशापर्यंतचा प्रवास म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि शेवटी लय असा प्रवास.या शून्यावर अधिकार आहे मूळ देवाचा म्हणजे गणपतीचा. मोरगावचा गणपती हा मूळ देव आहे म्हणून आपल्या सर्व संतांनी मोरगावला जाऊन साधना केली आहे आणि त्यांना हवं ते प्राप्त झालं आहे.

मूळ असलेला गजवदन गणपती हा आपल्या शरीरातल्या मूलाधार चक्रापाशी असतो आणि त्याच ठिकाणी शक्ती कुंडलिनीही असते. या गणपतीची कृपा झाल्याशिवाय ही कुंडलिनी वरच्या दिशेनं प्रवास करू शकत नाही.

गजाननाच्या नावातलं ‘ग’ हे अक्षर म्हणजे ‘गं’ हे बीज हे गुरुतत्त्वाशी निगडित आहे. आपण नारायण होतो. आता व नर झालो तर नारायण या मूळ कुळाशी जोडून देणारी शक्ती म्हणजे गुरू. आपल्या कुंडलिनी मातेचं किंवा शिवाचं नातं व आपल्याशी जोडून देतो तो मूलाधारचक्राशी असणारा (त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।) गणेश. म्हणजे प्रत्येकाचा ह खरा गुरू असतो गणेश. म्हणून त्याला ‘गुरुगणेश’ म्हणतात. गणेशाची ताकद असणाऱ्या पदार्थांनाही असंच असामान्य महत्त्व आहे. गूळ हा गणेशाचा आवडता पदार्थ. आलेल्या अतिथीला गूळ पाणी देण्यामागे, अतिथीला देवस्वरूप मानून गूळ देण्यामुळे गुरुतत्त्वाच्या माध्यमातून आपला संबंध परमेश्वराशी जोडला जावा ही भूमिका आहे. गणेशाचं आवडतं सुकं खोबरं म्हणजे खं ब्रह्मांड आहे.

गजाननाचा अजून एक आवडता पदार्थ म्हणजे खडीसाखर. खडीसाखरेला संस्कृतमध्ये स्वस्त्री म्हणतात. स्त्री म्हणजे स्त्री शक्ती. तर प्रत्येकाची ही स्त्री शक्ती कुंडलिनीच्या रूपात मूलाधार चक्रात पडून असते. आपल्या शरीरात इडा, पिंगला आणि सुषुम्ना या ज्या तीन नाड्या आहेत त्या दोन ठिकाणी एकवटलेल्या असतात, मूलाधारचक्रापाशी आणि आज्ञा चक्रापाशी. मूलाधारचक्राचं नियंत्रण गणपतीकडे आहे. तर आज्ञाचक्राचं नियंत्रण मारुतीकडे आहे. त्यामुळे कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्राच्या पुढे गेली की तिला मरुत् शक्ती म्हणतात. पुण्यातल्या त्रिसोंड्या गणपतीमध्ये त्या तीन सोंडा इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्यांच्या द्योतक आहेत. त्यामुळे कुंडलिनी जागृत होण्याची इच्छा बाळगणाऱ्या साधकाला त्याच्या स्थूलातल्या सद्गुरूंनी या गणपतीसमोर तसा भाव ठेवून शक्तिपाताची दीक्षा दिली तर ते कार्य १००% यशस्वी होईल. पण या गणपतीचं हे खास महत्त्व माहीत नसणाऱ्यांसाठी मात्र तो गणपतीची नेहमीचीच भूमिका बजावतो.

अष्टविनायकांचं महत्त्वं वेगळं काय आहे? असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. सर्व मूर्ती त्या त्या गावांना प्रतिष्ठापित करण्यामागचा जो इतिहास, तो फार तर एक जिज्ञासेचा भाग म्हणता येईल. पण या गणपतीचं खरं महत्त्व वेगळंच आहे आणि ते असं आहे की या प्रत्येक गणेशमूर्तीमधून एक ठराविक प्रकारची कंपनं बाहेर पडत असतात. उदा. रांजणगावच्या महागणपतीचा विचार केला तर सत्त्व, रज आणि तम ओलांडून म्हणजे त्रिगुणातीत अवस्थेला जाऊन वायू आणि आकाशतत्त्वाशी येऊन जेव्हा आपली साधना थांबते त्यावेळी त्याच्या पुढची साधना देणारा हा गणपती आहे. त्यामुळे हा भाव ठेवून त्याच्या दर्शनाला गेलं तरच खरं ईप्सित साध्य होणार आहे. मोरगावच्या, ‘मोरया’बद्दल काय सांगावं! प्राचीन हिंदूंची आर्यमा नावाची देवता आहे. सूर्याचं यं बीज आहे, ह्याची प्राप्ती होणं हा या आर्यमा देवतेच्या उपासनेचा उद्देश आहे. यं या बीजाचा संबंध स्वाधिष्ठान चक्राशी आहे. या यं बीजाच्या पोटीच्या संसारातील सर्व माया चालू असते. ‘मोरया’ची सुरुवात मकारापासून, मध्ये रामशक्तीचा रकार आणि शेवटी यकार. तर ही सर्व बीजं सद्गुरूंकडून विशिष्ट पद्धतीनं आपल्या कानात सांगितली गेली तरच हा आपल्याला पावतो. एकंदर, साधनेच्या उच्चपातळीवरचा हा गणपती आहे.

पुण्यात जंगली महाराजांच्या मंदिराजवळ जी गणेशाची सफेद मूर्ती आहे. तिच्या हातात दोन मुळे आहेत. त्यामुळे एखाद्या माणसाच्या आयुष्यात मूळापासून परिवर्तन घडवायचं असेल त्याला त्याचं जातिस्मरण करवायचं असेल, त्या नरामध्ये दडलेला नारायण कार्यान्वित (activate) करायचा असेल तर त्या माणसाला तिथं दोन सद्गुरुंमुळे आदेशाप्रमाणे अर्पण करायला सांगावेत, की त्याला त्याचं मूळ लवकर सापडतं. कलियुगातल्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे तो धूसर किंवा करड्या रंगाचा आहे, शेंदरी किंवा अन्य रंगांचा नाही. तो धुरापासूनच बनलेला आहे आणि धुराचा संबंध वायूतत्त्वाशी आहे. त्याची शक्ती धुराबरोबर वास करते. त्यामुळे ती अमर्याद आहे.

गणपतीची पारंपरिक मूर्ती ही मातीची बनलेली असते. परंतु प्रदूषण टाळण्यासाठी काहीजण चांदीची वा अन्य धातूची मूर्ती बसवून तिची पूजा करतात. परंतु ते चूक आहे. कारण मूळ गणपती ही देवता मळापासून बनलेली आहे. हे तिचं मायेतलं रूप आणि मायेचा संबंध मातीशी असतो. कारण फक्त मातीमध्येच रूपांतर करण्याची क्षमता असते. आपण मातीमध्ये विष्ठा आणि इतर त्याज्य पदार्थ टाकतो आणि माती त्याचं रूपांतर करून सुंदर फुलं आणि रसाळ फळं आपल्याला देते. आपण मातीचा गणपती घरी आणतो. दहा दिवस त्याची पूजा करतो आणि नंतर तो पाण्यात विसर्जित करतो याचा खरा अर्थ असा आहे की मातीमध्ये असलेल्या घाण शोषून घेण्याच्या गुणधर्मामुळे गणेशमूर्ती घरात आणून बसवल्यावर ती घरातली घाण म्हणजे सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेते आणि विसर्जन केलं की त्या नकारात्मक गोष्टींचं रूपांतर चांगल्या गोष्टीमध्ये होऊन आपलं कल्याण होतं म्हणजे प्रत्यक्ष विसर्जनानंतरच आपल्याला खरं फळ मिळतं. यातून गणपती हाही संदेश देत असतो की माणसाचा देह हा मातीचाच बनलेला आहे आणि तो मातीतच जाणार आहे. पण त्याचं चित्र व्हायचं असेल, तर त्यातली घाण मातीतच जायला हवी. कारण मातीतच फक्त वाईटाचं चांगल्यात रूपांतर करण्याची क्षमता आहे.

गजाननाचं वस्तीचं एक गुह्य स्थान म्हणजे नुकतंच उगवलेलं कडुनिंबाचं रोपटं. या रोपट्याच्या नाजूक मुळांवर असलेल्या नत्रवायूच्या गाठींमध्ये गजाननाचा वास असतो. त्यामुळे असं रोपटं घेऊन त्यावर ब्रह्मणस्पती सूक्तातल्या विशिष्ट मंत्रांनी अभिषेक केला तर गणपती हे दैवत आजन्म सिद्ध होतं. गणपतीचं हे स्थानही मातीमधलंच आहे.

गजाननाची सोंड हा आणखी एक कुतुहलाचा विषय. उजवीकडे वळलेली सोंड असेल तर तो सूर्य नाडीचा असतो. डावीकडे वळलेली असेल तर चंद्रनाडीचा असतो आणि सरळ सोंडेचा असेल तो सुषुम्ना नाडीचा असतो. सूर्यनाडीमुळे उजव्या सोंडेचा गणपती उष्णता बाहेर सोडत असतो. एखादी गर्भारशी स्त्री अशा गणपतीच्या जवळ गेली तर ती उष्णता सहन न झाल्यामुळे तिच्या गर्भाला धोका असतो. म्हणून अशा गणपतीपासून ६-७ फूटांच्या आत जाताच येणार नाही अशी योजना देवळात केलेली दिसते. ‘उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं कडक असतं’ असं म्हणण्यामागे त्याच्यापासून दूर राहण्याचीच सूचना आहे. अशा गणपतीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी असल्या की ती उष्णता नियंत्रित होते.

श्रीगजानन हा गावखाते, मानव, ऋषी, मुनी, नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व, प्राणी, जलचर, मुमुक्षु, पक्षी, कृमी, कीटक, विद्याधर, कलाक्षेत्र, देवी, शिव, राक्षस, भूत, मरुत् या २१ गणांचा स्वामी (ईश) आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत २१ आकडा हा महत्त्वाचा. उपासना करताना गणपतीचं जे काही येत असेल, तो मंत्र २१ वेळा म्हणावा. गणपतीच्या उपासनेत काही पथ्ये जरूर लक्षात ठेवावीत. दूर्वा नेहमी पायाशीच वाहाव्यात. डोक्यावर, खांद्यावर किंवा सोंडेमध्ये कधीही वाहू नयेत. गणपतीच्या मूर्तीचा रंग काळा, पांढरा, हिरवा, निळा इ. असू नये. गणेशमूर्ती उभी असू नये. उजव्या सोंडेचा असू नये. असलाच तर त्याच्या दोन्ही ■ बाजूस ऋद्धि-सिद्धी असाव्यात. नैवेद्याला पंचखाद्याचे लाडू असावेत. खडीसाखरही गणपतीला अतिशय प्रिय आहे. याही पलिकडे जाऊन आपल्याला जे आवडतं ते नैवेद्याला द्यावं. तो ■ वेगळा नाहीच हा भाव मनी पक्का असावा.

माणसाला भविष्यकाळ हा त्याच्या पूर्वकर्मांनीच लिहिलेला असतो त्यामुळे उपासना करणाऱ्या लोकांनी भविष्यकाळात कधीही डोकवायचं नसतं.

देवपूजेतील उपचारांमागेही काही शास्त्र आहे. ॐकारातल्या ‘उ’काराचा संबंध पाण्याशी आहे. लक्ष्मी, इंद्राचा ऐरावत पाण्यातूनच आले. ऋषी मुनी शाप देण्यासाठी किंवा वर देण्यासाठी पाण्याचाच वापर करीत. पाणी हे स्थूल देहाशी निगडित असलेली स्पंदनं वाहण्याचं उत्कृष्ट साधन (best conductor) आहे. देवासाठी पाणी ठेवून आपण वरुण देवाची प्रतिष्ठापना करत असतो. देव्हाऱ्यातल्या शंखातलं पाणी आपण प्यावं, आपल्या डोक्यावर शिंपडावं त्यामुळे शरीरातल्या बंद असलेल्या नाड्या उघडतात. उदबत्ती किंवा धूप आपण जेव्हा जाळतो तेव्हा तेज, वायू आणि आकाश तत्त्वांच्या कंपनसंख्येशी आपली कंपनसंख्या (frequency) जुळते.

तर असं हे साऱ्यांचं लाडकं दैवत. बहुरंगी बहुढंगी, पण त्याच्या प्रत्येक रंगामध्ये आणि ढंगामध्ये दडलंय खोल विज्ञान. त्यामुळे ह्या गजाननाची उपासना करताना भक्तीला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळाली तर ती भक्ती जास्त ताकदीची आणि पर्यायानं अधिक फळ देणारी होईल.

-डॉ. सुनील काळे, पुणे

शब्दांकन: माधव उंडे

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०२१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..