भारतीय संस्कृती खूप दूरवर पसरलेली आढळते. असे असताना आपल्या शेजारी असलेले राष्ट्र तिबेटात तिची पाळेमुळे न आढळणे अशक्यच. अशा आपल्या शेजारी असलेल्या तिबेट राष्ट्रात प्राचीन काळी वैदिक संस्कृती प्रचलित होती. परंतू दुसर्या किंवा तिसर्या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरु झाला व वैदिक संस्कृतीचे वर्चस्व हळू हळू कमी होत गेले त्यामुळे विनायकाला दुय्यम स्थान प्राप्त झाले असावे. नेपाळ चीन मार्गे गणेशाचा प्रवास तिबेटात झाला असावा.
भव्य आणि दिव्य स्वरुपात असलेली हे गणेश मूर्ती दर्शन घेताच आपलं मन मोहून टाकते. आपली दृष्टी खिळवून ठेवते. अशी ही मूर्ती आपलं आगळं-वेगळं वैशिष्ट्य ठेवून स्थानापन्न झालेली आढळते. दोशोदेशीचे गणेश दर्शन घेत असताना उंदरावर विराजमान झालेला गणपती कुठेही आढळत नाही. परंतू तिबेटातील ‘श्री गणेश’ मात्र मूषकावर आरूढ झालेले आढळतात. व्याघ्र चर्मांवर आसनस्थ झालेल्या ‘श्री गणेशाला’ चार भुजा आहेत. उजव्या हातात लाडू व वरच्या हातात मुळा दिसतो, तसेच डाव्या हातात मोदक खात असलेला उंदीर व वरील हातात परशू दाखविण्यात आलेला आहे. गळ्यात रुद्राक्ष माळा व गळ्याभोवती सर्पाचे वेटोळे, शंकरासारख्या जटा असलेली ही मूर्ती शिवपुत्र म्हणूनच तिथे मानली जात असावी असे ठामपणे सांगता येते. ह्या सार्या दृश्यात गणपती प्रिय मोदकाचे स्थान गणेशाजवळ आढळते. ह्या गणेशाचे निरीक्षण केल्यावर आढळणारे खास वैशिष्टय म्हणजे त्याने परिधान केलेले अलंकार दंडात नसून शरीराच्या सांध्यात आढळतात. तसेच त्याचे पद्मही अलंकार भूषित आढळतात. खमेर (कंपोचीया) येथील गणेशाच्या कानाभोवती आढळणारी कलाकृती येथेही आढळते. तसेच कानाभोवती केसही दिसून येतात. श्री मूर्तीच्या शरीराच्या मानाने सोंड व तोंड फारच लहान वाटते, डोळेही हत्तीसारखे लहान व तेजस्वी आहेत.
तिबेटच्या भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीत अनेक स्थित्यंतरे घडून आली तरीही बुद्ध-स्तुपावर विराजमान झालेला हा श्री ‘गणेश’ आजही आढळतो आणि तो अढळ आहे. अशा आगळ्या-वेगळ्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी वरील श्री गणेश ल्हाकांगचे वर्णन आपणास तिबेटात घेऊन जाते व त्याच्या दर्शनाने आपण सुखावतो आणि नतमस्तक होतो.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply