नवीन लेखन...

श्री गणेशमूर्तीचे २१ प्रकार व नावे

महाराष्ट्रात गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप देऊन लोकजागृतीचे तसेच लोकशिक्षणाचे कार्य सुरू करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना आहे ही गोष्ट सर्वांस सुपरिचित आहे. गणेशोत्सव साजरा करण्याच्या या नव्या स्वरूपामुळे शिल्पकरांना गणेशमूर्ती बनविण्यास उत्तेजन मिळाले. अनेक प्रकारच्या गणेशमूर्ती या उत्सवातून लोकांच्या नजरेस पडू लागल्या. शिल्पकारांच्या कल्पनेला व शिल्पकौशल्याला त्यामुळे खूपच वाव मिळाला.

प्राचीन काळातही श्रीगणेशाच्या अनेक मूर्ती होत्या असे आढळते. प्राचीन वाङ्मयात या मूर्ती कशा तयार कराव्यात, त्यांच्या हातात काय काय वस्तू असाव्यात, त्यांना कोणता रंग असावा, किती हात असावेत इत्यादी तपशील आढळतो. तद्नुसार श्रीगणेशाची निरनिराळी नांवेही ठेवलेली आढळतात. गणेशजन्माच्या कथाही अनेक आहेत.

या लेखात या प्राचीन मूर्तीची नावे व त्यांच्या शिल्पासंबंधी माहिती देत आहे.

श्रीगजाननाच्या मूर्ती एकूण २१ प्रकारच्या आहेत व त्यांची नांवेही तितकीच आहेत. ती अशी – १) बाल गणपती २) तरुण गणपती ३) भक्ति विघ्नेश्वर ४) वीर विघ्नेश ५) शक्ति गणेश ६) लक्ष्मी – गणपती ७) उच्छिष्ट गणपती ८) महागणपती ९) उर्ध्व गणपती १०) पिंगळा गणपती ११) हेरंब गणपती १२) प्रसन्न गणपती १३) ध्वज गणपती १४) उन्मत्त-उच्छिष्ट गणपती १५) विघ्नराज गणपती १६) भुवनेश गणपती १७) नृत्य गणपती १८) हरिद्रा गणपती १९) भालचंद्र २०) शूर्पकर्ण २१) एकदन्त.

या मूर्तीचे वर्णन प्राचीन ग्रंथात पुढीलप्रमाणे आढळते: –

१) बालगणपती – या मूर्तीचे स्वरूप बालकाप्रमाणे असावे. ही मूर्ती चतुर्भुज असते. आंबा, केळे, फणस व ऊस या चार वस्तू चार हातात असतात. शुंडेमधे कवठ धरलेले असते. या मूर्तीचा रंग उगवत्या सूर्याप्रमाणे असावा असे सांगितले आहे.

२) तरुण गणपती – या मूर्तीचे स्वरूप तरुण असते. हातात पाश, अंकुश, कवठ आणि जांभूळ, तीळ आणि बांबूची काठी अशा वस्तू असतात. त्याला सहा हात असतात आणि शरीराचा रंग तांबडा असावा लागतो.

३) भक्ति विघ्नेश्वर – या मूर्तीलाही चार हात असतात. चार हातात नारळ, आंबा, साखरेचा खडा व खिरीची वाटी या वस्तू असतात. याचा रंग चंद्राप्रमाणे पांढरा असतो.

४) वीर विघ्नेश – या प्रकारच्या मूर्तीला सोळा हात कोरायचे असतात. हातात वेताळ आणि शस्त्रे, धनुष्य बाण, शक्ती, ढाल, तलवार, हातोडा, गदा, अंकुश, पाश, शूल, कुंड, परशू आणि ध्वज या वस्तू असतात. या मूर्तीचा रंग लाल असावा लागतो.

५) शक्ति गणेश – हे नाव गणेशमूर्तीच्या एका प्रकारास दिलेले आहे. या प्रकारात लक्ष्मी-गणपती, उच्छिष्ट गणपती, महागणपती, उर्ध्व गणपती आणि पिंगळा गणपती या मूर्ती येतात.

६) लक्ष्मी-गणपती – या गणेशमूर्तीस आठ हात असतात. त्यात पोपट, डाळिंब, कमळ, पाण्याखाली माणिकांनी मढवलेले सुवर्ण पात्र, अंकुश व पाश, कल्पकता आणि बाण नावाच्या वनस्पतीची कळी या वस्तू असतात. तसेच शुंडेतून पाणी उडत असले पाहिजे. या मूर्तीचा रंग श्वेत असावा लागतो.

७) उच्छिष्ट गणपती – या मूर्तीची पूजा करणारे आजही अनेक आहेत. कारण हा प्रसंन्न झाल्यास अनेक प्रकारे भक्ताचे ईप्सित पुरे करतो. अशी त्यांची श्रद्धा आहे. क्रिया कर्मज्योति या ग्रंथात या मूर्तीच्या हातात कमळ, डाळिंब, वीणा, भाताची रोपे आणि रुद्राक्षांची माळ असावी असे वर्णन आहे.

८) महागणपती – महागणपतीच्या मूर्तीला दहा हात असतात. त्याच्या हातात कमळ, डाळिंब, रत्नजडित जलपात्र, गदा, स्वतःचा मोडलेला दात, ऊस, पाश, आणि भाताच्या लोंब्या अशा वस्तू असतात. या मूर्तीचा रंग लाल असतो. शक्ति देवीची मूर्ती महागणपतीच्या मांडीवर बसलेली असते. व तिचा रंग श्वेत असतो. तिच्या एका हातात कमळ असते.

९) उर्ध्व गणपती – या मूर्तीला सहा हात असतात. कल्हर पुष्प, भाताच्या लोंब्या, ऊसाचे धनुष्य आणि बाण व मोडका दात अशा पाच वस्तू पाच हातात आणि सहावा हात मांडीवर बसलेल्या शक्तीदेवीच्या भोवती असतो. या गणपतीचा रंग सुवर्ण पीत असावा व शक्तीदेवतेचा रंग विद्युल्लतेसारखा असावा.

१०) पिंगळा गणपती – या मूर्तीलाही सहा हात असतात. आंबा, कल्पवृक्षाची फुले, ऊस, तीळ, मोदक आणि परशू अशा सहा वस्तू सहा हातात असतात. या गणपतीच्या बाजूस लक्ष्मीची मूर्ती असते. विघ्नेश्वर प्रतिष्ठा विधी या ग्रंथात शक्ती गणपतीची सामान्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ती अशी – मूर्ती पद्मासनाधिष्ठित असावी. तिच्या बाजूस हिरवा रंग असलेली शक्ति असावी. मूर्तीचा रंग मावळत्या सूर्यासारखा असावा.पाश आणि नम्र ही आगुधे त्याच्या हातात असावी. मुद्रा भयप्रद वाटावी. मंत्र-महार्णव ग्रंथानुसार मूर्तीच्या हातात अंकुश, पाश, दन्त आणि अक्षमाला ही असावीत. गणपतीच्या सोंडेत मोदक असावा. सर्वालंकारयुक्त आणि भरजरी वस्त्रान्वित शक्तीदेवी बाजूस बसलेली असावी.

११) हेरंब गणपती – विघ्नेश्वराच्या इतर मूर्तीपेक्षा हेरंबाची मूर्ती फारच निराळी असते. तिला पांच गजशीर्षे असतात. त्यापैकी चार तोंडे चार दिशांना आणि पाचवे या चार तोंडांच्या वरती ऊर्ध्वदिशेकडे पहात आहे असे असते. त्याचे वाहन सिंह असते. एका हातात मोदक असतो. या गणपतीला आठ हात असतात. याचा रंग सुवर्ण कांति असतो. हेरंब या शब्दातील हे म्हणजे दुर्बल व रंब म्हणजे संरक्षक. हेरंब म्हणजे दुर्बलांचा संरक्षक.

१२) प्रसन्न गणपती – ही गणेश मूर्ती सरळ उभी असते किंवा काही ठिकाणी शरीरास वक्रता आलेली असावी. काहींच्या मते ती सरळ असावी तर काही तज्ज्ञांच्या मते ही तीन ठिकाणी वाकलेली असावी. ज्या स्थानावर मूर्ती उभी करायची ते आसन पद्मासन असावे. या मूर्तीचा रंग उगवत्या सूर्यासारखा शेंदरी असावा. अंगावर रक्तवर्णी वस्त्रे असावीत. दोन हातात पाश व अंकुश असावेत व उरलेल्या दोन हातांपैकी एक वरद आणि दुसरा अभय देणारा अशा अवस्थेत असावेत.

१३) ध्वज गणपती – याला चार हात असतात. एका हातात ग्रंथ, दुसऱ्यात अक्षमाला, तिसऱ्यात दंड व चौथ्यात कमंडलु अशा वस्तू असतात. चेहरा रागीट असतो.

१४) उन्मत्त गणपती – या मूर्तीला तीन नेत्र असतात. ही चतुर्भुज, रक्तवर्णी असते. पाश, अंकुश, मोदकांनी भरलेले ताट आणि दन्त या चार वस्तू चार हातात असतात. ही मूर्ती पद्मासनारूढ असते. माज आलेल्या हत्तीसारखे गजमुख असते.

१५) विघ्नराज गणपती – या मूर्तीच्या एका हातात पाश, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्या हातात असलेले आम्रफल तो कात आहे. अशी मूर्ती असते. ही मूर्ती मूषकारूढ असते. रंग सूर्याचा ॐpp लाल शेंदरी असतो.

१६) मुवनेश गणपती – ही मूर्ती अष्टभुजा असते. शेख, इक्षुदंडाचे धनुष्य, पुष्पबाण, तुटलेला दात, पाश आणि अंकुश, [ भाताच्या लोंब्या या वस्तू हातात असतात. या मूर्तीच्या शरीराचा रंग गोरा असतो. या मूर्तीच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इशुदंडधनु व पुष्पबाण ही कामदेवाच्या हातातील आयुधे या मूर्तीच्या हातात आहेत.

१७) नृत्य गणपती –ही मूर्ती नृत्य करत असलेल्या अवस्थेत कोरलेली असते. ती अष्टभुजा असून तिच्या हातात पाश, अंकुश, मोदक, कुठार, दात, वलय आणि अंगुलीय या वस्तू असतात. मूर्तीचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो. गणेश नृत्य करीत आहे असे दाखविण्यासाठी मूर्तीचा डावा पाय किंचित वक्र व पद्मासनावर स्थिर केलेला व उजवा पायही हवेत उचलून वाकवलेला दाखवावा लागतो.

१८) हरिद्रा गणपती – या गजानन मूर्तीचे दुसरे नाव रात्रि गणपती. या मूर्तीला चार हात असतात. हातात पाश, अंकुश, मोदक व दन्त या वस्तू असतात. ही मूर्ती त्रिनयन असते आणि रंग हळदीसारखा पिवळा असतो. अंगावर पीत वस्त्रे असतात.

१९) भालचंद्र – असे म्हणतात की दर्भीने दिलेल्या शापामुळे चंद्र निस्तेज होऊ लागला तेव्हा श्री गजाननाने त्याला उचलून आपल्या कपाळी तिलक म्हणून धारण केले. तेव्हापासून गणपतीला भालचंद्र हे नाव पडले.

२०) शूर्पकर्ण – या संबंधीची आख्यायिका अशी की, एकदा ऋषींनी अग्निला शाप दिला की तू विझून जाशील व नष्ट होशील. त्यामुळे अग्नी अगदीच निःसत्व झाला. तो गजाननाकडे गेला. तेव्हा त्याच्यावर कृपा करण्यासाठी गजाननाने आपल्या कानाने त्याला वारा घालून प्रज्वलित केले. गजाननाचे कान सूर्प म्हणजे सूपासारखे मोठे असतात. त्यामुळे वारा घालण्यासाठी त्यांचा उपयोग झाला. यावरून गणपतीला शूर्पकर्ण हे नाव पडले.

२१) एकदन्त – या संबंधीची कथा ब्रह्मांडपुराणात सांगितली आहे. परशुरामाने शंकरानी दिलेल्या परशूच्या सहाय्याने पृथ्वी निःक्षत्रीय केल्यावर आपल्या हितकर्त्याला भेटण्यासाठी तो कैलास पर्वतावर गेला. त्यावेळी कैलासावर शिव व पार्वती बोलत बसले होते. द्वारावर श्री गजानन होते. त्यांनी परशुरामाला अडविले व सांगितले की शंकरा पार्वती आत बोलत बसले आहेत तेथे कोणालाही जाण्यास मनाई आहे. हे ऐकून परशुरामाला राग आला. त्याने गणपतीला आपला परशू फेकून मारला. तो निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य गजाननात होते पण आपल्या पित्याने दिलेले अस्त्र विफल होऊ नये म्हणून त्याने आपला डावा दात पुढे केला. त्यामुळे तो मोडला व गणपती तेव्हापासून गणपती एकदंत झाला.

-संकलन

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..