एका गुरुंच्या कडे अनेक शिष्य मंडळी होती. ती आपापल्या परीने श्री गुरुंची सेवा करत असत. त्यामध्ये एक आवड्या नावाचा शिष्य होता, तो दररोज दूर जंगलात जाऊन सुवासिक फुले आणून ती श्री गुरुच्या चरणांवर वहात असे..!!
एके दिवशी त्याने आणलेल्या फुलातले, एका फुलाचा सुवास गुरुंना भारी आवडला, त्यांनी त्याचं भरभरून कौतुक केले. आणि त्याला आपल्या जवळ बसवून घेतले…!!
दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी पहाटे पहाटे उठून ती फुल शोधायला निघाले, प्रत्येक जण धावत होता, आधी मला मिळावी आधी मला मिळावी. सगळ्यांना भरपूर फुलं मिळाली…!!
त्या सर्वांनी सगळी फुले एकत्रित करून गुरु ज्या मार्गावरून आसनांवर बसण्यास येतात, तिथे फुलांचा गालिचा तय्यार केला..!!
परंतु श्रीगुरुंनी तो मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने येऊन ते आसनस्थ झाले. आवड्याने वाहीलेल्या फुलांचा सुगंध घेऊन, आनंदभरीत होऊन त्यांनी ती फुले शेजारी असलेल्या श्री विष्णुच्या मूर्तीवर तिथूनच फेकली आणि आवड्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. .!!
एका सेवेकऱ्याने न राहवून श्रीगुरुंना विचारले, आपण आम्ही तय्यार केलेल्या गालीचा वरुन का नाही चाललात..?
श्री गुरु म्हणाले, त्यां गालिच्यावरील फुलातून मला हेव्यादाव्याचा, चढाओढीचा सुवासच अधिक येत होता. आणि आवड्याने वाहीलेल्या फुलातून मला भक्ती भावाचा सुवास येत होता.
त्याला माझ्या ध्यासाशिवाय काही सुचतच नाही, केवळ गुरुचरणावर आपली सेवा घडावी इतकाच त्याचा उद्देश. म्हणून मला त्याने आणलेली फुलचं अधिक आवडली.
फुलं जशी, मोगरा सुगंधी, गुलाब पाहून चित्त आकर्षित होत, सगळी फुलं एकापेक्षा एक. …तसेच गुरु जवळ सेवेकरीही….!!
गुलाबाची जागा मोगरा घेत नाही, तो त्याच्या जागेवर, तसेच श्री गुरुचरणी आपापल्या जशा भावना, कल्पना असतात आणि त्या भक्ती भावाने तो गुरुना भजत असतो.
प्रत्येक जण गुरुला प्रियच असतो, फक्त एकमेकांत चढाओढ न करता आपण आपली सेवा करीत रहावी. अशी सेवा मला फार फार आवडते….!!
Leave a Reply