नवीन लेखन...

श्री क्षेत्र औदंबर

श्री नृसिंह सरस्वती कारंजा या आपल्या जन्म स्थानावर मातेला वचन दिल्याप्रमाणे आले व. इ. स. १४१६ या वर्षी आपल्या उत्तर यात्रेस निघाले काशी येथे त्यानी मुक्काम केला. इ. स. १३८८ या वर्षी त्यानी वृध्द कृष्ण सरस्वती यांच्या कडुन संन्यास दीक्षा घेतली व आपली नवखंड यात्रा पूर्ण केली.

क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गौतमी तथा गोदावरी तटाक यात्रा करीत ते वासर ब्रह्मेश्वर या ठिकाणी आले. सरस्वती गंगाधर यांचे वंशज सायंदेव या आपल्या निजि शिष्याची त्यांची भेट झाली. त्याना १५ वर्षानी गाणगापुरास भेटेन असे सांगून नृसिंह सरस्वती परळी वैद्यनाथ या क्षेत्रावर एक वर्ष गुप्त रूपानी राहीले. त्या वेळी त्यांचे निजि शिष्य सिध्द हेच त्यांच्या जवळ होते. आणि त्या नंतर त्यानी आपली कृष्णा तटाक यात्रा प्रारंभ केली. इ. स. १४२५ या वर्षी ते क्षेत्र परळी वैद्यनाथ या ठिकाणी होते तर इ. स. १४२६ या वर्षी नृसिंहसरस्वती औदुंबर या क्षेत्रामध्ये भुवनेश्वरीच्या सानिध्यात आले.

क्षेत्र औदुंबर म्हणून या क्षेत्राचे नाव नंतर पडले पूर्वी भिल्लवडी म्हणुन हा परिसर ओळखला जात होता. घनदाट आरण्य व त्यातून वाहणारी कृष्णानदी झाडीतूनच वहात होती. करहाटक म्हणजे कऱ्हाडला कोयना नदीशी कृष्णेचा संगम झाला उगमापासून प्रवास करीत कृष्णा दक्षिण वाहिनी तर कोयना उत्तर वाहीनी होती. संगम झाल्यावर दोनही नद्या पश्चिम वाहीनी झाल्या पुढे त्या पुन्हा दक्षिण वाहीनी होवून नरसिंगपूर (शेणोली) या ठिकाणी बहे बेटाशी आल्या या बहे बेटावर रामायण काळात रामचंद्र नित्य कर्म करीत असताना व्यत्यय नको म्हणुन हनुमंतानी कृष्णेचा प्रवाह रोखून धरला ते हनुमंताचे मंदीर बेटावर आहे. पराशर ऋषीच्या ध्यानातील नृसिंह मूर्ती नरसिंगपूर या ठिकाणी जमीनी खाली भुयारात विराजमान आहे. पुढे कृष्णा औदुंबर तथा भिल्लवडी या गावाच्या दिशेने वाहू लागली खरेतर दंडकारण्याचा हा भाग होता. माता भुवनेश्वरी मात्र या जंगलात एकांत स्थानी भिल्लवडीस येवून राहिली होती.

शिवपुराणा नुसार भगवान शिवाचे दहाअवतार सांगितले आहेत. प्रत्येक अवतारात महाशक्ती सती पार्वती पण शिवा बरोबर प्रकट होत होती. शिवाचा तिसरा अवतार भुवनेश म्हणुन होता. त्या वेळी भुवनेश्वरी म्हणुन पार्वतीने अवतार धारण केला ती ही माता भुवनेश्वरी प्राचीनकाला पासुन कृष्णा तटाकी वास करून होती नृसिह सरस्वती येण्या पूर्वी भिल्ल वडी क्षेत्र भुवनेश्वरी देवीचे क्षेत्र म्हणून होते.

भिल्लवडी कृष्णा तीरी । शक्ती असे भुवनेश्वरी ।
तेथे तप करीती जरी । ते चि इश्वरी ऐक्यता ।। गु.च.अ. १५

शक्ती पीठ असा उल्लेख भुवनेश्वरी देवीचा गुरु चरित्रात आला आहे. त्या मुळे ही एक पवित्र तपोभूमी आहे. या क्षेत्राचे माहात्म्य वृद्धिगंत करावे या हेतूने व इश्वरी कार्य म्हणून नृसिंह सरस्वतीनी या ठिकाणी आपला मुक्काम चार महीन्यासाठी ठेवला ते भुवनेश्वरी मंदीराच्या समोरील कृष्णा काठावर औदुंबर वृक्षाखाली त्यांनी साधना केली त्या पवित्र दत्त पादुका ज्याला “विमल पादुका” असे म्हणतात. त्या औदुंबर वृक्षाखाली आहेत त्या मुळे भिल्लवडी या क्षेत्राचे नाव पुढे क्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध झाले. कृष्णा काठावरील अत्यंत पवित्र असे हे क्षेत्र आहे. या ठिकाणी कृष्णा नदीचा डोह असून त्यात मगरीचा वावर होता आता वर्दळ वाढल्याने त्या कमी झाल्या पण औदुंबर व अन्य वृक्षाची छाया या कृष्णेच्या पात्रात पडते एक शांत पवित्र व सिद्ध असे हे क्षेत्र आहे. अनुपम अनुभव आहे.

ब्रह्मानंद स्वामी या नावाचे एक सिद्ध पुरूष इ.स. १८२६ च्या सुमारास गिरनार हून या ठिकाणी आले व नृसिंहसरस्वतीनी पावन केलेली ही तपोभूमी त्यानी साधने साठी निवडली. एक मठी उभी करून त्यानी तपसाधना केली व योग साधना केली. अखेरीस त्यानी आपली शेवटची यात्रा याच क्षेत्रात संपवून समाधी घेतली. ब्रह्मानंदस्वामी यांचे बरोबर “मेरूशास्त्री’ या नावाचे एक विद्वान व्यक्ती होती. ते ब्रह्मानंद स्वामीचे शिष्य होते व त्यांच्या सहवासात होते. त्यानी हटयोग प्रदीपिका या योगशास्त्रावरील संस्कृत ग्रंथावर ज्योत्स्ना या नावाची टीका लिहली.

ब्रह्मानंद स्वामीचे एक शिष्य सहजानंद स्वामी म्हणुन होते. त्यानी औदुंबर येथील प्रशस्त घाटाचे बांधकाम केले. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यानी पण औदुंबरला भेट दिली होती.

ब्रह्मानंद स्वामीच्या मठात पुढे श्रीनारायणानंद तीर्थ या नावाचे एक सतपुरूष वास्तव्याला होते. त्यांची खूप प्रसिध्दी होती व प. पु. टेंबे स्वामीनी त्यांचे दर्शन घेतले होते. त्यांची कृपा प्राप्त करुन घेतली होती. स्वामी नारायणानंद तीर्थ सेवा ट्रस्ट म्हणून एक संस्था कार्यरत आहे.

गुरुचरित्रातील १७ वे आध्यायात आलेली कथा प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील एका विज्ञान विप्राचा पुत्र मूढ होता त्याने उपवास करून आपली जिव्हा भुवनेश्वरी देवीच्या चरणी वाहिली. मातेने त्याला नृसिंह सरस्वतीच्या कडे पाठविले. नृसिंहसरस्वतीनी त्याला जिव्हा परत करून वेदविद असा विद्वान ब्राह्मण होशील असा आशिर्वाद दिला. ते हे क्षेत्र औदुंबर आहे. स्थान माहात्म्य म्हणुन गुरु चरित्रात ही कथा सविस्तर पणे आली आहे. दत्तात्रेयाचा हा अवतार नृसिंहसरस्वती म्हणून कारंजा, नृसिंह वाडी व गाणगापूर या ठिकाणी असला तरी त्याचे प्रीय स्थान म्हणून क्षेत्र औदुंबर आहे व त्यांचा नित्य वास या ठिकाणी असतो. त्या मुळे मंदीर परीसरातील ओवऱ्या मध्ये गुरुचरित्राची पारायणे करण्यासाठी दत्तभक्तांची मांदीयाळी असते.

दत्तपादुकावर चंदन लेपन करणे हे औदुंबर क्षेत्रातील दत्त पादुकांचे विशेष असे स्वरूप आहे. शिवाय चैत्र महीन्यात कृष्णाबाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती जन्मोत्सव दत्त जयंती असे अनेक कार्यक्रम असतात. नित्य आरती पूजा अन्नदान या गोष्टी असतात.

संत जनार्दन स्वामी व संत एकनाथ याना या ठिकाणी दत्त दर्शन झाले होते. याच ठिकाणी नृसिंह सरस्वतीनी औदुंबर वृक्षाचा महीमा सांगितला होता. माझा नित्य वास या वृक्षामध्ये आहे. या वृक्षाची नित्य पूजा व वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करेल अशा भक्ताला निश्चीत पणे अनुभूती येईल व शतगुणानी फल प्राप्त होईल.

अशा या औंदुंबर क्षेत्रात चारमहीने राहून नृसिंह सरस्वती वारणासंगम या ठिकाणी आले सांगली जवळ हरीपूर या ठिकाणी वारणा तथा वारूणी नदी व कृष्णा नदीचा संगम आहे संगमेश्वर महादेवाचे स्थान व अश्वत्य वृक्ष आहे. काही काळ वास्तव्य करू नृसिंहसरस्वती पुढे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे गेले. भुवनेश्वरी व दत्तात्रेय यांचे पवित्र व सिद्ध असे हे स्थान तपोभूमी म्हणजे क्षेत्र औदुंबर होय.

कृष्णानदीच्या पात्रात पवित्र तीर्थे आहेत. प्रत्यक्ष भुवनेश्वरी माता तसेच अनेक सिध्दानी या ठिकाणी वास्तव्य करून तीर्थ क्षेत्रे निर्माण केली आहेत. दुधामधाचा हा प्रदेश आहे या परिसरात ताकारी, दुधारी, दह्यारी अशी गावे आहेत गोधन व कृष्णा नदीचे पवित्र जल असा हा प्रदेश म्हणजे औदुंबर क्षेत्र होय. औदुंबर वृक्ष वन म्हणवे इतकी औदुंबराची झाडे या ठिकाणी आहेत.

— श्री गणेश हरी कुलकर्णी, (डोंबिवली)

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १० वा, (अंक ३४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..