नवीन लेखन...

श्री महाकवि वाल्मिकी

नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।।
प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।।

रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।।
अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।।

महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।।
प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।।

सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।।
महान काव्य रचना झाली  ।  वाल्मीकीकडून ।।४।।

कमळ उपजे चिखलांत । तैसा हिरा कोळशात ।।
अज्ञानासी ज्ञानी बनवित हिच लिला प्रभूची ।।५।।

वाल्याचा वाल्मिकी झाला । अज्ञानाचा ज्ञानी बनला ।।
विश्वामध्ये महाकवी ठरला । कथा त्याची ऐकावी ।।६।।

वाल्या कोळ्याची कथा । बनत असे जीवन गाथा ।।
आदर्श त्याचा चित्तीं ठेवता । सर्व जनांनी ।।७।।

वाल्याकोळी होता क्रूर । छंद त्याचा लूटमार ।।
चालवित असे परिवार । दुसऱ्याच्या धनावरी ।।८।।

चोरी लबाडी हा धंदा । खून करी तो अनेकदा ।।
पर धनावरी नजर सदा । वाल्याची असे ।।९।।

त्राही करूनी सोडिले । सर्वासी दु:ख दिले ।।
निर्दयतेनें दुसऱ्यांसी छळले । वाल्या कोळ्याने ।।१०।।

नारद मुनींची स्वारी । जात असता रस्त्यावरी ।।
वाट तयांची रोखूनी धरी । वाल्या कोळी ।।११।।

मागू लागला खंडणी । वाट त्याची अडवूनी ।।
चकीत झाले नारदमुनी । वाल्याकडे बघती ।।१२।।

नारायण नाम मुखी । होत आसे सदा सुखी ।।
थांबविता हरीनाम एकाएकी । नारद विचारी ।।१३।।

असूनी गरीब ब्राह्मण । नसे मजजवळी धन ।।
टाळ चिपळ्या नि नारायण । हीच माझी संपत्ती ।। १४ ।।

प्रभूची भक्ती । हीच माझी शक्ती ।।
कसे देवू धनाती । नारद बोलले ।। १५।।

वाल्यासी हवे धन । काय त्यासी जाण ।।
कसे ओळखी ते महान । तत्त्वज्ञान जिवनाचे ।।१६।।

नारद पुसतां वाल्याला । कां ठेविसी लोभ धनाचा ।।
करित असे पाप कर्माला । मिळविण्या ते धन ।। १७ ।।

धनामाजी सुख समजसी । लुटूनी ते स्वकीयांस वाटसी ।।
आनंदी तयांनी करिसी । पर धनाने ।।१८।।

सुखाचे सारे सोबती । परि पाप तूंच भोगती ।।
कुणी न देई संगती । तुझ्या कुकर्मात ।।१९।।

धनाजवळी सारे जमती । दु:खामध्ये साथ न देती ।।
सर्व स्वार्थी आसती । सगे सोयरे ।।२०।।

पुण्याचे असती वाटेकरी । पाप पडते तुझ्याच पदरीं ।।
हीच असे रीत खरी । जीवनाची ।।२१।।

तुझ्या कर्माचे फळ । भोगसी येतां वेळ ।।
दु:खमय वाटे तो काळ । विचार करावा मनीं ।। २२।।

कुणी न असती नाते गोते ।  मित्रमंडळीहि दूर जाती ।।
वाटेकरी नसती पापा तें । तुझ्या कर्माच्या ।। २३ ।।

मानव जन्म मिळाला । कां दवडिसी आयुष्याला ।।
सोडूनी घ्यावे लोभाला । प्रभूसी शरण जावे ।। २४।।

धनी न व्हावे पापाचे  । सार्थक करावे जीवनाचे ।।
स्मरण ठेवावे प्रभूचे । अविरत ।। २५।।

विवेक जागृत ठेवावा । अज्ञानाचा पडदा फाडावा ।।
ज्ञानाग्री प्रज्वलित करावा । हेच सार्थक जीवनाचे ।। २६।।

अंतर्यांमी करावा विचार । उघडावे ज्ञान भांडार ।।
विचारांना द्यावा आकार । स्मरण करूनी प्रभूचे ।। २७ ।।

विवेकाच्या गोष्टी चार । वाल्याच्या बिंबती मनावर ।।
नारदासी करी नमस्कार । गुरू समजूनी ।।२८ ।।

पश्चाताप झाला मनी । आयुधे दिली टाकूनी ।।
शरण जाई वाकूनी । नारदा समोरी ।।

अंधकार नष्ट झाला । अंतर्यामी प्रकाश पडला ।।
जागृती झाली मनाला । वाल्याच्या ।। ३० ।।

नारदासी वंदन केले । गूरुमंत्र देण्या विनविले ।।
आशीर्वाद तयाचे मागितले । वाल्या कोळ्यांनी ।। ३१।।

रामनाम मुखे घ्यावे । चिंतन त्याचे करावे ।।
अंतर्मनी भक्ती ठेवावे । श्री रामाची ।।३२ ।।

वाल्यास उपदेश देवूनी । नारद गेले निघूनी ।।
ज्ञानाचा अग्नी पेटूनी । वाल्याचे चित्ती ।। ३३।।

राम नामाचा जप  ।  घेऊन करावे तप  ।।
पेटवावा ज्ञानदीप  ।  हाच उपदेश नारदाचा  ।।३४ ।।

तपश्चर्या करण्यासी । बैसला झाडापासी ।।
जपे राम नामासी । मनोभावे ।। ३५।।

राम नामाचा जप सतत । देहाचे भान जात ।।
पाला-पाचोळा जमत । शरीराभोवती ।।३६।।

पाला पाचोळा वर । मातीचे पडती थर ।।
वारूळाचा मिळे आकार । वाल्या देहा भोवती ।।३७।।

मातीचे ढीग जमूनी । देह जाय झाकूनी ।।
परी नाम मुखे घेवूनी । भक्ती केली प्रभूची ।।३८।।

परत नारद जात असता । स्तब्ध झाले राम नाम ऐकता ।।
वारूळातूनी राम नाम येतां  । चकीत झाले ।।३९।।

दूर सारतां माती । आंत वाल्यासी बघती ।।
आश्चर्य चकीत होती  ।  नारदमुनी ।।४०।।

वाल्यासी बघती ध्यानस्त । डोळे नी मुख बंदीस्त ।।
झाला देह रामनामस्थ । रोम रोम हुंकार देयी ।।४१।।

रामनामाचा हुंकार । देवू लागले शरीर ।।
कवच राम नामाचे वर । रक्षण करी देहाचे ।।४२।।

झाला वाल्या राममय । तपसामर्थ्य महान होय ।।
आशिर्वादूनी नारद जाय  ।  वाल्यासी ।।४३।।

अपूर्व इच्छाशक्ती । जागृत झाली प्रभू भक्ती।।
रात्र-दिनी नाम घेती । मनोभावे ।। ४४।।

नामाचा महिमा आगाळा । भक्तीची साथ मिळता त्याला ।।
पाशानही लागती तरंगण्याला । पाण्यावरी ।। ४५।।

प्रभू नामाचे मोठेपण । तपोबल त्यासी मिळोन ।।
जात असे उद्धरून । आपल्या जीवनी ।। ४६।।

पाहूनी त्याची भक्ती । राम नामाची शक्ती ।।
प्रभू आशीर्वाद देती । वाल्या कोळ्यास ।। ४७।।

सत्य आणि तप । प्रज्वलित करी ज्ञानदिप ।।
अज्ञानाचा होई लोप । ज्ञानाग्री पेटतां ।। ४८।।

प्रसन्न झाली सरस्वती । त्याचे चित्ती ज्ञान देती ।।
अंतर्मयी प्रकाश पाडती । वाल्याच्या ।। ४९।।

करविता धनी । आसे तो कुणी ।।
घ्यावे तुम्ही जाणोनी । हीच प्रभूची लिला ।। ५०।।

***

ऐके दिनी सकाळी । जात वाल्मीकी अंघोळी ।।
क्रौंच पक्षाची जोडगोळी । बघे झाडावरी ।। ५१।।

रास क्रीडा बघून । आनंदले मन ।।
जात असे विसरून । स्वत:सी ।।५२।।

क्रौंच पक्षावर । मारीला तो तीर ।।
समजोनी शिकार । एका पारध्याने ।।५३।।

लागता तीर माथी । तत् क्षणी पडला धरतीं  ।।
गतप्राण होवून जाती । एक क्रोंच पक्षी ।।५४।।

आनंदी पक्षी होते । एक गमवी प्राणाते ।।
विरह मिळे दुसऱ्याते । विचित्र झाली घटना ।।५५।।

सारे अघटित घडले । दु:खाश्रू नयनी आले ।।
चित्त भावनावश झाले । वाल्मीकीचे ।।५६।।

शब्द पडले मुखातूनी । भावनेस आकार देवूनी ।।
काव्यमय वाक्य होवूनी । प्रथम कविता जन्मली ।।५७।।

शारदा अवतरली काव्यातून । वाल्मीकेच्या वाणीतून ।।
आद्य कवी त्यास बनवून । मान मिळे ।।५८।।

( कवी वाल्मीकीचे प्रथम शब्द मा निषाद प्रतिष्ठां त्वमगत: शाश्वती समा: ।। यत्क्रौंच मिथुनादेकमवधी : काम मोहितम ।।
अर्थ – निर्दय पारध्या । त्या सुखी क्रौंच पक्षाला मारून त्याच्या स्त्रिला विपत्तीत लोटलेस, या पातकाबद्दल तू शंभर वर्षे नरक यातना भोगशील .)

चेतना जागृत झाल्या । विचार लहरी उमटल्या ।।
लेखणीतून वाहू लागल्या । वाल्याच्या ।।५९।।

विचारांचा धबधबा । झेप घेता नभा ।।
बनूनी एक प्रतीभा । महाकाव्य झाले  ।।६०।।

ज्ञानाची गंगोत्री । पावन करी धरत्री ।।
सागर त्याचा बनती । रामायण रूपे ।।६१।।

महाकाव्य रामायण । वाल्मीकीचे अपूर्व देण ।।
हेच खरे त्याचे धन । मिळविले असे ।। ६२ ।।

वाल्याचा वाल्मीकी झाला । महाकवी मान मिळविला ।।
लोखंडाचे सोने बनला । परिसामुळे ।।६३।।

शुद्र आणि लहान । तोही मिळवितो मोठेपण ।।
इच्छा शक्ती महान ।  पाहीजे तेथे ।।६४।।

मार्ग सदाचे असती । परी अज्ञानाने न दिसती ।।
विवेक ज्ञानाची संगती । ध्येय देयी गाठूनी ।।६५।।

तुमचा गुरू अंतरमनी । त्यास घ्यावे समजोनी ।।
का शोधता बाहेरूनी । वाया जाई आयुष्य ।।६६।।

वाल्मीकी ऋषींचे काव्य । रामायण ग्रंथ दिव्य ।।
प्रतीभा ती भव्य । स्फूर्ती देयी सर्वांना ।।६७।।

रामायण ग्रंथ थोर । आदर्श जीवनाचे सार ।।
सार्थकी आयुष्याचे द्वार । तुम्ही उघडावे ।।६८।।

।। शुभं-भवतु ।।

डॉ. भगवान नागापूरकर
१०- ३११०८३

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..