नवीन लेखन...

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे.

ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन संपूर्ण समाजाच्या डोळ्यात स्त्री सम्मानाचे प्रखर अंजनच घातले. ह्यावरुनच समर्थांचा स्त्रीयांकडे बघण्याचा स्वच्छ व अत्यंतिक आदराचा दृष्टीकोन ध्यानात येण्यासाठी दुसरा कुठलाही दाखला देण्याची गरज उरतच नाही.

ज्या काळात स्त्रीयांना अत्यंतिक तुच्छ मानले जायचे त्या काळात समर्थांनी स्त्रीयांना महंत करून मठाधिपती केले. तत्कालिन जेष्ठ व श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या धर्म मारतंडाचा विरोध पत्करुन त्यांनी वेणास्वामींना किर्तन करण्याचा अधिकार तर दिला व अनेक स्त्रीयांना मठाधीपती नेमले हे महान कार्य करण्याच्या समर्थांनीच हिंदवीस्वराज्याचे स्वप्न पाहून ते उभे करण्यासाठी शिवरायाचे गुरुत्व पत्करुन ते स्थापनेचे शिवधनुष्य पेलावे यात काही शंकाच नाही.

कार्याला वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी स्वतंत्र विचार, सर्वकष सांस्कृतिक नेतृत्वाचे तत्वज्ञान आपल्या आचारविचारांनी निर्माण करण्याचा प्रयत्न श्री समर्थांनी केला. त्यासाठी जे जे करणे, लिहीणे क्रमप्राप्त होते ते ते केले. आधुनिक काळातील एखादा जागृत समाजदक्ष विचारवंत जे जसे कार्य करतो तसेच कार्य त्यांनी पार पाडले. समाज केवळ भाकरी व स्वातंत्र्य यावर जगत नाही. आपली स्वप्ने हरवून कसे चालेल? मरगळलेल्या मनातून नवे मंत्र निर्माण होऊ लागतात. व्यक्तिगत क्षुद्रस्वार्थाची कवाडे उघडून बाहेरच्या व्यापक जगाकडे शोधक नजरेने पाहिले. जीवनविषयक व समाजविषयक जाणीवा धारदार होत्या. घरातून निघून गेलेल्या कुटुंबी आयुष्याशी फारशी ओळख नसलेल्या या बाल ब्रह्मचाऱ्याने जीवनाचे बारिक सारिक हजारो तपशील फोडून मिळविले याचे आश्चर्य वाटते.

तीर्थयात्रेच्या निमित्ताने साऱ्या भारतात भ्रमण करीत असता देवांबरोबर दानवही पाहिला. विकारांनी बेभान झालेली माणसे कोणत्या नीचतम पातळीवर उतरू शकतात याची अनेक दृष्ये त्यांना हलवून गेली. पोटाची भूक भागविण्यासाठी लाखमोलाचे आपले शरीर कवडीमोलाने सहज विकतो हे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या अर्तमनाला अनेक जखमा झाल्या असल्या पाहिजेत. जीवीताताचे चमत्कारीक खेळ त्यांच्या डोळ्यासमोर घडत होते.

श्रीसमर्थ या देशाच्या काळ्याकुट्ट अपमानास्पद आणि लाजिरवाण्या प्रकरणावर प्रकाश टाकतात. स्त्रियांची अब्रू लूटणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना पळवून नेणं हा परकी आक्रमकांचा अनेक शतकांचा व्यवसाय होता. या देशातील लोक नामर्द व असंघटीत असल्यामुळे हा लाजिरवाणा प्रकार शतका नुशतक चालू राहिला आहे. ते म्हणतात “किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या। शामुखी किती जादजी फाकविल्या । किती एक ते देशांतरी त्या विकील्या । किती सुंदरा हाल होऊनी मेल्या।” देशातील किती लोक दुबळे, लाचार, अभिमान शून्य झाले होते याची खंत समर्थांच्या अंत:करणाला जाळीत होती.

समर्थांच्या नजरेला देशाची भयानक स्थिती रोज अधिकाधिक भीषण भासत होती. आरंभिले लग्न आणिली नोवरी । रिणे घरोघरी मागतसे. श्रीमद दसबोधातही सासुर वाशीणींना होणाऱ्या जचाचे श्रीसमर्थांनी वर्णन केले आहे. ते वाचून अंगावर अक्षरश: काटा येतो. खेळीजीराजे भोसल्यांच्या पत्नी रामराजाची कन्या ज्येष्ठापल्ली उर्फ जेठाई यांसारख्या कितीतरी स्त्रीयांच्या आयुष्याचे धिंडवडे निघाले. एकेका सुलतानाच्या जनानखान्यात हजारो हिंदू स्त्रीया स्क्तीने बंद करण्यात आल्या होत्या. उन्मत्त सुतलान मीनाबाजार भरवित असत.

“लोक निलंड निलंड काढूनि नेति पोरी न्याय बुडाला बुडाला जाहली शिर्जोरी ।” श्री समर्थांच्या तीर्थाटणाच्या खुणा सांप्रदायिकांनी लिहून ठेवल्या आहेत. परंतू त्यांची दृष्टी प्रामुख्याने पारमार्थिकच आहे. समर्थांच्या सामाजिक चिंतनाकडे संप्रदायातील ग्रंथकर्त्यांनी पुरेसे लक्ष दिलेले नाही. औरंगजेबाचे हस्तलिखित व मूलधार नष्ट झाले असण्याची शक्ता नाकारता येत नाही.

अगदी अल्पवयात वैधण्याची कुऱ्हाड कोसळल्या मुळे विस्कटीत झालेली ही ब्राह्मणकन्या भागवतादी ग्रंथाचे नित्यनेमाने पठण करीत असे. एकादा भिक्षेला आलेल्या समर्थांनी विचारले, “मुली वाचतेस पण अर्थ ध्यानात येतो का?” वेणाबाई उत्तरली, “तसा मार्ग दाखवणारे कोणी अजून भेटलेच नाही.” साहजीकच समर्थांनी तिच्यावर अनुग्रह केला. तिची प्रतिभा आणि निष्ठा पाहून तिला कीर्तनाचा अधिकार दिला. वेणाबई ही समर्थांची सर्वात लाडकी कन्या. तिला समर्थांनी स्वत:च मिरजेस मठ स्थापून दिला.

तिच्या व्यतीरिक्त बयाबाई. रामदासी अंबाबाई रामदासी कवित्वर रचना करीत असत. अंबाबाई ही कोल्हापूर नजिक राशीवड्याच्या मळ्यात असे. किर्तनोपयोगी पदे रचण्यात तिचा हातखंडा दिसतो.

अनेक स्त्री शिष्यांना श्री समर्थांनी मठपती बनविले. सतीबाई (शहापूर) अक्काबाई, चिमणाबाई (सज्जनगड ) अंबिका (विजयपूर) द्वारकाबाई (चाफळ) नवाबाई (तापीतीरी) मनाबाई (चाफळ) आवाबाई (चाफळ) अन्नपूर्णाबाई म्हणजे उद्धव माता आणि सखाबाई (चाफळ) गंगाबाई गोदाबाई, अंताबाई, कृष्णाबाई, (चाफळ) वेणाबाई (मिरज) अक्काबाई, मुधाबाई, बकुबाई, भिमाबाई (गुरुचरणी)

या सर्व जणींचा भक्तीचा उगम एहीक आपत्तीत झाला आहे. “देव भक्ती लागी करु नेदी सवसार। अंगे वारावार करून ठेवी” या तुकाराम महाराजांच्या उक्ती नुसार त्याची यथार्थता श्री समर्थांच्या चरित्रावरून सहज सिद्ध आपत्तीच्या ऐन भरातही परमेश्वराचे सर्वसासित्व लक्षात घेऊन आपल्या जीवन मूल्यांविषयी तिळभरही तडजोड करण्याचे त्यांनी नाकारले.

चुकीच्या परंपरा, अंधश्रद्धेतून परंपरा पालन यांचा मर्मभेद हा समर्थांनी केलेला आढळतो. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान देण्याचे प्रबोधन घडविण्या चे ऐतिहासीक यार्य त्यांनी केले. आढळते. यावरून श्री समर्थांचा स्त्रियांकडे पाहण्याचा उदार दृष्टीकोन दिसून येतो.

१) श्री समर्थ शिष्या वेणाबाई:- मिरजेच्या मठाधिपती वेणाबाई ! येवढेच ठाऊक, इतिहासकारांनाही तिच्या विषयी फारशी माहिती नाही. इतिहासही वेणूत लपला आहे. गिरिधर स्वामींच्या समर्थ प्रतापात जी काही माहिती वाचायला मिळते तेवढीच!

अभ्यास आणि साधनेने माणसाचे आयुष्य कसे बदलते याचा तो भावपट आहे. त्या काळात स्त्रीयांना ओसरीवर उभे राहण्याची ही प्राज्ञा नव्हती त्या काळात एक बाल विधवा मठाचे महंतपण स्वीकारून चोख कारभार चालविते ही सोपी गोष्ट नाही.

तिचे वडिल गोपीनाथ पंत व आजोबा काशिराज पंत दोघांनाही समर्थांचा अनुग्रह होता. त्यांनी वेणीला “अ” काढायला शिकविला. त्या “अ” तून अभ्यासाचा आणि अगतिकतेचा ही जन्म झाला. हा “अ” किती अथांग होता साधारण १६२८ ते ३० च्या सुमारास वेणाबाई चा जन्म झाला. त्यांच्या बालपणीच समर्थांची दोन वेळा भेट झाली. भिक्षेच्या निमित्याने समर्थ आले होते. या भेटीनंतर तिचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले. मिरजेला समर्थांची किर्तने ऐकून ती प्रभावित झाली. श्री समर्थांच्या पायापाशी जाऊन समर्थांना म्हणाली मला तुमच्या बरोबर पर्यटनाला यावसं वाटतं. समर्थ म्हणाले, “ती वेळ अजून आली नाही.” काही गावातल्या लोकांनी तिच्या वडिलांजवळ तिची निंदा केली. जन निंदेला तोंड देता देता दशा झाली. एकच मार्ग! तिला सक्तीने मिरवणे. वीष पिऊन वेणा तडफडायला लगली. तवढ्यात समर्थ वाणी दुमदुमली. “जय जय रघुवीर समर्थ.” समर्थ म्हणाले हलाहल पचवलेस! आता तुझी पर्यटनाला यायची वेळ झाली. तुझ्या नातलगांनीच तुझी वाट मोकळी करून दिली. श्री समर्थांच्या सहवासात तिचे देवत्व उजळून निघाले.

भागवत, उपनिषदे, समर्थांच्या वाणीतून ऐकली. दासबोध नित्यातला झाला. काही शंका आल्यास समर्थ होतेच. पदापदाला भावार्थ सुस्पष्ट झाला. आत्मसाधनेला आकार झाला. अधिक अंतर्मुख बनल्या. रामनाम स्मरणास, आत्मसाधनेला आकार आला. सोबत हरिकथा हरिभजन होते. मुळात आवाज मधुर होता. समर्थांनी गायनाचे पाठ दिले. समर्थांची वाणी मनात आठवावी. निरूपणाचे दृष्टांत, पदाचा अन्वय, अभंगाची चाल विवेचनाचा मार्ग समजून घ्यावा. कीर्तन अभ्यासामुळे वर्तनास लागणारा भाव होता. समर्थानी कीर्तन करण्याची आज्ञा केली. मिरजेत सासरी किर्तनाला उभी राहिली. समोर प्रभु श्रीराम, पाठीमागे मारुती उजविकडे समर्थ डावीकडे कल्याण बाकी कुणीही नाही. मंदिर ओस. एक विधवा स्त्री नारदांच्या गादीवर उभी राहते. हीच क्रांती ठरली. वेणास्वामीची रसाळ वाणी गावागावात पसरली. दुरून ऐकणार पायापाशी बसू लागले. मंदिर ओसंडले. वाळवंट अपुरा पडला. प्रचंड जनसमुदाय येऊ लागला. अभ्यास आणि साधना बरोबर समर्थ कृपा होती. श्लोकाचार्य वामनपंडितानी वीणा गळ्यात घेऊन किर्तनाला साथ केली. नाम – भक्ती भक्ती – अभ्यास यांचे प्रयोग म्हणजे त्यांचे कीर्तन गागाभट्टांनीही कीर्तन ऐकले. तिच्या पायी डोई ठेवली त्या उत्तम स्वयंपाकही करीत. त्यांना सर्व अन्नस्वामी म्हणत. श्री समर्थांनी लिहण्याची आज्ञा केली त्यांची काव्यरचना १) सीता स्वयंवर २) रामायण ३) सिंहासन ४) उपदेशरहस्य ५) कौल रघुनाथाचा ६) श्रीराम गुहक संवाद ७) अभंग ८) आरत्या ९) श्रीकृष्ण स्तुती मंगलरामायण, छंदोरामायण, संकेत रामायण लवकुश रामायण, सुंदर रामायण, अष्टरामायण, हेही ग्रंथ समर्थानी वेणीबाईस वरदान देऊन तिच्या कडून लिहून घेतले. हे ग्रंथ उपलब्द नाहीत. रामायण ५ कांड ओवीसंख्या ५३६ उपलब्द आहेत. मूळ वाल्मीकी रामायणात राम ह मनुष्य आहे देव नव्हे असे स्पष्ट सांगितले आहे. पण वेणाबाई रामाला अथपासून ईथपर्यंत देवच मानले आहे. वेदांतात मुलभूत प्रश्न एक अभंगात सहज गुंफले आहेत.

बारा चौदा वर्षाची बालविधवा हे २५ प्रश्न विचारते. वलयासी पुसे। जीव हा कणव । शिवाचे लक्षण। सांगा सवामी। सांगा ब्रम्ह खुण। सगुण निर्गुण। पंचवीस प्रश्न । ऐसे कोठे. १० ओव्यात २५ प्रश्न रामदासांच्या लक्षात आले की वेणीची वाटचाल आशादाई आहे. म्हणून एक मंगल रामप्रहरी श्रीसमर्थांनी श्रीराम जयराम जय जय राम ह्या त्रयोदशासरी राममंत्राचा नामानुग्रह केला कपाळी बुक्का लावला. गळयात तुळशीची माळ घातली अंगात पायघोळ कफनी घातलेली, हातात चपळी घेतलेली, रामनामस्मरण, कीर्तनात दंग झाली. निरुपण करती झाली. धान्याची निवड करताना समर्थ कल्याण,
अक्काबाई यांच्याशी अध्यात्मचर्चा चाले. मठापेक्षा त्यांना अभ्यास व गुरुसाधनेत रस होता. मठाचे महंतपण मिळायला १६५५ साल अजाडले. श्री समर्थांचा अनुग्रह १६४४/४५ सालात मिळाला. श्री समर्थांचा सत्संग सलग १० वर्षे वेणाईला लाभला. त्यामुळे व्यक्तीमत्त्वात बहुश्रुतता आणि दांडग्या व्यासंगावर लौकीक सांभाळला. वेदांत वाड्:मय परमार्थ यांत असामान्यत्त्व प्राप्त केले. “समर्थ प्रताप” ग्रंथाचे लेखक गिरीधरस्वामी बीडकर त्यांचे प्रशिष्य होते.

श्री समर्थांकडे साधक, सन्यासी, परमहंस येत. विविध विषयांची चर्चा चाले. त्यांच्या काही प्रश्नांना वेणाबाईच उत्तरे देत. वेणास्वामींची प्रकृती तोळामासा होती. समर्थ त्यांना सांगत उपवासाचे तप मन: शुद्धीसाठी असते. तुमचं मन अखंड शुद्ध आहे. तुम्ही उपवास करु नका. अभ्यास हाच तुमचा उपवास. रामनाम मुद्रा उपवासाचे तप तुम्ही शरीर सांभाळा म्हणजे रामरायांना आपोआपच सांभाळणे होईल. १६५४ च्या सुमारास रामनवमी उत्सवाच्या वेळी त्यांना हिवताप आला तो अंथरुन सोडीना. त्यांना तळमळ लागली. मी काहीच करु शकत नाही. रामरायाला गाऱ्हाणे घालायला गेल्या तेव्हा तोल जात होता. स्वतःला खांबाला आवळुन बांधून रामरायाला गाणे घालायला गेल्या तेव्हा निरपेक्ष साध्या भोळ्या परिचारीकेच्या रूपात रामाई म्हणून श्रीरामरायांनीच सेवा केली. ते वेणीसाठी रामाई झाले. पुढे त्या बऱ्या झाल्या. ज्या मिरजेने वेणाबाईचे अतोनात हाल केले होते. त्याच मिरजेत मठपती त्या महंत झाल्या. वेणाबाईचा श्रीरामचंद्रावर व समर्थांवर नितांत भक्ती होती. वेणास्वामीचे अवघे आयुष्य रामभक्तीत रंगले राम हाच प्रपंच. सद्गुरु हेच घर साधना धरतील भांडी, नामस्मरण, उपासना होत. अशा घरात समर्थांनी तिचा संसार थाटून दिला, तोच तिचे माहेर झाला. त्यामुळे संसारातील दु:खे त्सा विसरल्या.

गीता भागवत, दासबोध यांचा अभ्यास व नामस्मरणातून संत पदापर्यंत पोहचल्या. त्यांच्या स्पुररचना कीर्तनातून आहेत. त्यांची हिंदी पदे, आरत्या, भजने, उपख्याने पंचीकरणासारखी वंदांतनिष्ठा प्रकरणे, श्री राम गुहक संवाद, कैल रघुनाथचा, कृष्णस्तुती कथा, रामायणी विचित्र ही स्पुर काव्ये कीर्तन वाड्मय प्रसिद्ध आहेत. निज गुजरूपक, सीतास्वयंवर १४ समास १५४६ ओव्या लक्षणीय आरत्यानकाव्य रामायण, महाभारत, भागवताचा उत्तम अभ्यास होता. विशाचा परिणाम शरीरावर होतो त्यामुळे कायमची पोटाची व्यथा जडली. सर्व प्रकारची प्रकृतीची पथ्ये सांभाळून सतत कुरबुर असे.
प्रतिवर्षी सज्जनगडावर रामनवमीसाठी होम तिन महिने उत्सवाच्या आगे मागे येत असत. श्रीरामचंद्राच्या व श्री समर्थांच्या सहवासात घालवीत असत. त्यावेळी गुरुभक्ती व नामभक्तीस उधाण येई. वेणास्वामींना विदेही होण्याची विद्या अवगत होती. रामनामाचे परम सहाय्य होते. श्री समर्थांच्या सहवासात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. नामसाधना ही सेवा घडली गडावरचा सोहळा अनुभवता आला.

श्री रामनवमीचा २ रा उत्सव गडावर झाला. वेणा स्वामींचे कीर्तन झाले सगळ्यांना दंडवत करून श्री गुरुंच्या पायांवर डोके ठेवले. श्री समर्थांच्या हाथी वीणा दिली पायावर डोके ठेवताच प्राण ज्योत गुरु ज्योतीत तिथून राम ज्योतीत गेली. तिथून योग मार्गाने गेली.

२) बयाबाई ऊर्फ बाईयाबाई:- गिरिधरांनी आपल्या समर्थ प्रतापात अकराव्या समासात दिलेल्या माहितीनुसार मिरजेच्या मठाचे अधिकार हिच्याकडे असावेत असे म्हणता येते. (शके १६०० ते १७२०) परमार्थ करून कित्येक लोकांचा उद्धार केला. श्री समर्थांना गुरु मानित. असे ८५ वर्षाचे दीर्घायुष्य तिला लाभले. तिने केलेले बरेच लेखन आहे. पण उपलब्ध नाही. योगशास्त्रीय शब्दरचना आहे. दासबयाने शृंगाराच्या भाषेतही एका पदात वर्णन केले आहे. (मधुराभक्ती) काही पदात गोपीकृष्ण लीला वर्णील्या आहेत.

३) प्रेमाबाई:- अनेक पदे रचली आहेत. श्रीकृष्णाच्या जीवनातील नाट्यपूर्ण, खळबळजनक, करुणारसपूर्ण प्रसंग रेखाटले आहेत. त्यात आर्तता हा स्थायी भाव आहे.

४) आवका स्वामी: – आवका स्वामींचे तीर्थरूप व श्री समर्थांची प्रथमभेट कृष्णाकोयनेच्या संगमावरील कऱ्हाड गावी झाली. तपस्याचा प्रभाव पाहून घरी बोलावले. आईवेगळी पोर. बालविधवा लग्न झाल्यावर एकदाच माहेरपणाला आली. आणि इकडे तापाच्या निमित्ताने पतीचा मृत्यु होऊन वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. बालवयात तिचे केशवपन, नेसलेले आलपण पाहुन समर्थ तीव्र शब्दात म्हणाले पती निधनानंतर मुलीची अशी विटंबना करणे खरोखर रानटी माणुसकीहीन प्रथा आहे, यात मुलीचा काय दोष? समर्थ म्हणाले कदाचित रामायणाचीच तशी इच्छा असावी. ह्या वैधव्याच्या स्थितीतच रामराय परमार्थाचा मार्ग दाखवतील. आवकांचही तशीच इच्छा पाहून तिने समर्थांचा आशिर्वाद मागितला. वडिलांनीही सांगितले माझ्या कन्येला अनुग्रह देऊन आपल्या कृपाछायेत ठेवावे. श्री समर्थांनी विनंती मान्य करीत अनुग्रह दिला म्हणाले आजपासून तुम्ही रामदासी संप्रदायाचा सदस्या व आमच्या शिष्या आहात. आजपासून तुमचे नाव आवका” (आधीचे नाव चिमणा) याच नावाने सांप्रदायी तुम्हाला ओळखतील आवकांना बरोबर घेऊन समर्थ निघाले. श्री समर्थांचा जिथे मुक्काम असेल तिथली स्वच्छता बैठक व्यवस्था, पूजेची तयारी स्वयंसिद्धी ही सारी कामे आवकाची. श्री समर्थ सद्गुरुंवर नितांत श्रद्धा व भक्ती समर्थांना केव्हा काय लागते हे माहित झाले होते. सेवेत कुठेही उणे पडू नये म्हणून दक्ष असत. श्री समर्थ आज्ञेने आवकांचे वडिल हयात होते तोपर्यंत दोन दिवस अधूनमधून त्यांच्याकडे जाऊन रहात असत. वडिलांच्या निधनानंतर छोटेसे दोन खणी घर थोडी शेती समर्थ आज्ञेने सत्पात्र ब्राह्मणाला देऊन समर्थ चरणी पुन्हा एका वस्त्रानीशी सेवेत रूजू झाल्या. आता मागे पाश उपाधी काही नाही. पूर्ण चित्ताने रामरायापायी उपासना नामाचे अनुसंधान, हाती काम, अंतरी राम हे सूत्र ठेवून दिनक्रम सुरु झाला. सर्व शिष्यांचे दुखणे खुपणे मातेच्या ममतेने पाहात. इतुकी माया कोठेची नाही. मातेवेगळी किंवा माता वाटून कृपाळू झाला. जगदीश जगाला रक्षितसे या समर्थांच्या दासबोधातील वचनाप्रमाणे त्यांचे वागणे बोलणे होते. त्यांच्या र्वनातील चोखळपणा, कामातील त्यांच्या वर्तनातील समुदायाला एकत्रित ठेवण्याची कृती, सोदार्हता, यांचा अनुभव समर्थांसह सर्वजण घेत होतेच. समर्थांनी अवकांची खूपदा परिक्षा घेतली. समयसूचकता कामसुवृत्ती कामांतील संयम, शिस्त, सहनशीलता, सौदार्हता, निरिक्षण शक्ती दांडगी होती. कामांतील व्यवस्थापन उत्तम होत. हे सार पाराखल्यानंतरच चाफळच्या मठाची सारी व्यवस्था त्यांच्या हाती सोपवली. मठमहंती म्हणजे सुळावरील पोळी, एकास्त्रीकडे महंती सोपवली. ह्यातून समर्थांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन केवढा विशाल व्यापक प्रगत पुरोगामी होता ह्याची साक्ष पटते. स्त्री ही परमार्थ मार्गातील अडचण असे त्यांना कधीही वाटले नाही. स्त्रीयाही समाजात संस्कार करून समाजाची सुरचना करुन स्वास्थ राखू शकतात. हे समर्थांनी जाणले होते. समर्थांनी दाखवलेला विश्वास किती सार्थ होता हेच आवकांनी केलेल्या दीर्घ कार्यातून समजते.

रामायण, पांडवप्रताप, एकनाथी भागवत, या ग्रंथाच्या सहवासात काळ घालवीत असत. अक्कास्वामींचे वेणस्वामींना मार्गदर्शन मिळे. मठाच्या अंगणत तुळशवृंदावनाजवळ दोघीही अध्यात्मचर्चेत रंगून जात. चाकणच्या मठात समर्थ निवांत असले तर दोघींना समोर बसवून परमार्थातील काही महत्वाची शिल्पे सजावून देत. देहास मृत्यू होतो पण आतील आत्मा अजर अमर आहे. तो मरत नाही. एकदा आत्मदर्शन झालं की तोच अतरात्मा सर्वत्र भरुन राहिला आहे. हे जाणवणं हीच सुक्ष दृष्टी इ. प्रश्नांची उत्तरे समर्थ देत असत. श्री समर्थांच्या मागे चाफळचा मठ सज्ज्नगढावरील व्यवस्था आक्कांनी चोख सांभाळली. भोवताली यवनांचा धुमाकुळ मंदिर मठ मुर्तीची तोड फोड इ. विधवंसक कृत्ते आरंभिली होती. आक्कांच्या हे कानावर आल्यामुळे चाफळच्या मुर्ती वाघापूरच्या गडावर सुखरूप ठेवण्याची त्यांनी व्यवस्था केली. गडावरील रामपंचायतन घेऊन बराच काळ भूमीगत राहिल्या. त्या वासोट्यास राहायला आहेत याचा कुणालाही पत्ता लागला नाही. त्या काळात त्यांचे खूप हाल झाले. अन्न पाणी पहायला नव्हते. खाणे पिणे तर लांबच. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत एका महिला महंताने दिलेला तो एकाकी लढा होता.

श्री सद्गुरु वरील निष्ठा, श्री रामावरील अढळ श्रद्धा यांच्या जोरावर त्या तेथे तगून राहिल्या. जरा स्थिर झालयावर पुन्हा दोन्ही मुर्ती पूर्ववत स्थानापन्न केल्या. विनम्र जीवनाचरण करण्याऱ्या अक्कांनी हे कुणाला सांगितले नाही की केठे लिहिले नाही. त्यांना ८६ वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. अनेक प्रसंगाच्या साक्षी अंतरंग शिष्यामध्ये अग्रेसर पण आत्मप्रौढी मिरवली नाही. माऊली होऊन समर्पित जिवन जगल्या. इ. स. १९२१ दिवाळीतला पाडवा या शुभदिनी सज्जनगड येथे जिवनयात्रा संपवली. समाजातील क्षुद्र उपेक्षीत घटकाविषयी सुद्धा सहानभुतीने विचार केला. समर्थांची स्त्रीजीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. स्त्री पुरुषांमधील समानता त्यांनी पुढील प्रमाणे सुचित केली आहे. पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परे वासनेस। बांधोन टाकेल (१७/२/२९) सासरी दुःख सहन करणाऱ्या स्त्रीयांवीषयी समर्थांच्या मनात दया आहे. तर मातेबद्दलचा आदर आहे. त्यांच्या वाड:मयात दिसून येतो. सासरी जिवनातील पत्नीच्या नात्याला त्यांनी आदराचे स्थान दिले आहे. वेणाबाई, अक्काबाई, बयाबाई, प्रेमाबाई या स्त्रीयांना रामदासांनी स्वातंत्रकाक्षेने भरलेल्या शिवकालात कशी प्रेरणा दिली असेल ते यावरून ध्यानी येते.

भारतातील स्त्रीयांची परिस्थिती अत्यंत मागासवर्गीय व फारच मागासलेली आहे. असे म्हणणाऱ्या पाक्षात्य तत्वज्ञानांनी ४५० वर्षे मागे जावून थोडी दृष्टी टाकलीतर असे म्हणण्याचे ते धाडस करणार नाही हे निश्चीत.

समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्च महिन्यातील अंकासाठी बरेचसे लेख आले आहेत, जागे अभावी या अंकात घेण्यात आले नाही, तरी पुढील अंकात समाविष्ट करण्यात येतील.

संपादक

सौ. प्रीती संपगांवकर

–साभार: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ११ वा (अंक २३)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..