लेखक : श्री. अतुल फणसे.
कॉलेज व क्रिकेट जीवनातील अनेक चढउतार सुरू असताना माझ्या एका मित्राने मला एक दिवस विचारले, ‘चल येतोस का अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी ?’
पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ऐकले म्हणून उत्सुकता व माझा एक मावस काका सोलापूर येथे राहात होता, त्याला भेटण्याच्या ओढीने त्याला हो म्हणालो आणि…श्री स्वामी समर्थांच्या प्रथम दर्शनासाठी निघालो, तेंव्हापासून बहुतेक दरवर्षी जायला लागलो.
स्वामींनी मला त्यांच्या अस्तित्वाचे, माझ्याबरोबर, माझ्या पाठीशी असण्याचे अनेक अनुभव दिले आहेत.
सन 2000 मध्ये माझ्या मुलाची मुंज श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने स्वामींच्या मठात करायचे मनात आले आणि ठाणे – मुंबई परिसरातील श्री स्वामी समर्थ मठात चौकशी करत होतो…पण स्वामींच्या मनात मुलाची मुंज अक्कलकोट येथेच करायची होती…मुंज तिथेच झाली.
यादरम्यान ” वंदनीय दादा विवेक जोशी ” यांची ओळख झाली, त्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ मूर्ती आहे आणि दर गुरुवारी आरती व आध्यात्मिक बैठक होत असे स्वामींच्या कृपेने मी तिथे दर गुरुवारी जायला लागलो, तसेच त्यांच्या वासिंद येथे मठात जायला लागलो.
जप…नामस्मरण ही उपासना व स्वामी सेवा नियमितपणे रोज स्वामी कृपेने होत होती. माझ्यातला मी पणा संपून गेला होता…कोणतेही कार्य स्वामी कृपेने होते हीच एक धारणा मनात निर्माण झाली.
मुलगा विदित डॉक्टर physiotherapist झाला…अमेरिकेत जाऊन MS केले व त्यानंतर MBA पण केले. बेळगाव येथे त्याच्या admission साठी गेलो होतो, जेथे दोन वर्षे आधी दीड लाख रुपये कॉलेज देणगी घेत होते… स्वामींना नमस्कार करून मी कसेबसे पैसे जमा करून गेलो होतो… विदित चा interview झाला प्रिन्सिपॉल आणि व्यवस्थापक समितीने no donation admission केली.
अमेरिकेत विदितच्या शिक्षणाचा खर्च साधारणपणे रुपये 32 लाख इतका होणार होता…त्याकरिता अनेक बँकांमध्ये शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केले होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे कर्ज मिळाले नाही, स्वामींना नमस्कार केला त्यांनीच मार्ग दाखवला. जवळचे सर्व पैसे खर्च करून विदितला अमेरिकेला पाठविण्याचे निश्चित केले, पहिल्या (टर्म) अभ्यासक्रमाचे पैसे पूर्ण भरले, नंतर विदितने भरपूर अभ्यास केला आणि पुढील सर्व शिक्षण स्कॉलरशिप मिळाल्याने मोफत झाले. विदितची मेहनत तसेच तोही वेळ मिळत असतो त्यावेळी स्वामींचे नामस्मरण करत असतो म्हणूनच ही स्वामींची कृपा झाली.
स्वामिनी ठाणे अक्कलकोट आणि पुणे अक्कलकोट अशा दोन पदयात्रा करून घेतल्या..पदयात्रेत अखंड नामस्मरण व जप झाला. पुणे अक्कलकोट ही पदयात्रा मी आणि माझी पत्नी श्वेता या दोघांनी स्वामी नामाच्या साथीने केली. या पदयात्राचा चौथा दिवस असेल, विश्रांती साठी योग्य जागा मिळत नव्हती थोडीशी दमछाक झाली होती…तेवढ्यात एक मंदिर दिसले तिथे गेलो तर ते हनुमान मंदिर होते. तिथे बसलो होतो तेव्हढ्यात एक मजबूत अंगयष्टीचे पण थोडेसे म्हातारे गृहस्थ तिथे आले…त्यांनी देवळात नमस्कार केला आम्हाला थोडे पाणी आणि गूळ खोबरे दिले, त्यांनी आमच्याबरोबर गप्पा केल्या आणि त्यांनी त्यांचे नाव हणमंत शिंदे असे सांगितले, त्यांना उभ्या उभ्या नमस्कार केला आणि निघालो. वेशीपर्यंत ते आले आणि आम्ही आमचा मार्ग घेतला…10 ते 15 पावले गेलो मागे वळून बघितले तर ते दिसेनासे झाले. 15 मिनिटे त्यांच्याशी बोलत होतो पण समजले नाही 15 पावलं पुढे गेलो आणि चमत्काराची जाणीव झाली.
आठव्या दिवशी मला थोडा डिहायड्रेशन चा त्रास झाला. संध्याकाळ झाली होती. तीन ते चार किलोमीटर झाल्यावर आम्ही रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबणार होतो हवेत भयानक उकाडा निर्माण झाला होता…आम्ही एका छोट्याश्या हॉटेल मध्ये बसलो होतो आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. थोड्यावेळाने पाऊस थांबल्यावर आम्ही बाहेर आलो…काळोख झाला होता…आणि चिखल झाला होता.
एक रिक्षावाला आला म्हणाला चला पुढे गावांत सोडतो मी तयार नव्हतो पण श्वेता मला म्हणाली अजून पाच दिवस चालायचे आहे, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. .. रिक्षात बसलो त्यांनी गावात सोडले….रिक्षावाला श्री स्वामी समर्थ म्हणून निघून गेला…ज्या हॉटेल मध्ये सोडले तिथेही स्वामींची भव्य तसबीर होती एकंदरीत हाही एक अनुभव घेऊन 12 व्या दिवशी अक्कलकोट मध्ये पोहचलो जोरदार पाऊस सुरू झाला…मंदिरात जाण्याअगोदर स्वामींनी जोरदार स्वागत केले.
श्री स्वामी समर्थ कृपेने गिरनार वारी झाली. प्रत्येक क्षणाला पायऱया चढताना नामस्मरण सुरू होते…आजूबाजूला कमी लोकं होती किंवा कधीतरी आम्ही दोघेच असायचो. त्या प्रत्येक क्षणी कोणीतरी बरोबर आहे पण दिसत नाही असे वाटत होते. थोडे दमल्यावर कोणीतरी अचानक सांगायचे अजून थोडेच अंतर आहे…घाबरू नका, सतत अस्तित्व जाणवत असे.
पृथ्वीवर देवाचे अस्तित्व किती आहे किंवा नाही अशा अनेक चर्चा असतात किंवा आहेत, पण माझे स्वतःचे असे मत आहे देव जरी प्रत्यक्ष पृथ्वीवर नसला तरी सद्गुरुंचे अस्तित्व नक्कीच आहे. म्हणजेच श्री नवनाथ, श्री गुरुदेव दत्त, त्यांचे सर्व अवतार…श्री समर्थ रामदास स्वामी असे अनेक गुरू महात्मे प्रकट झाले किंवा जन्मास आले. त्यांनीच अनेक मार्गांनी किंवा चमत्काराने सामान्य माणसाला त्यांचे खरे अस्तित्व दाखवून मार्गदर्शन केले आहे.
सद्गुरू मार्गावर असणाऱ्या लोकांना काय फायदा होतो असा प्रश्न विचारला जातो…
त्याला माझे उत्तर आहे की एक नक्की फायदा होतो. मनुष्य जन्मात येणारे भोग, यातना सहन करण्याची ताकद येते आणि चांगले मार्गदर्शनही मिळत असते.
असो…नामस्मरण, जप आजही सुरू आहे…स्वामी कृपेने सध्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाचा अभ्यास आणि वाचन सुरू आहे…त्याचबरोबर श्री श्रीपाद वल्लभ महाराजांचे चरित्र पारायण सुरू आहे…श्री राम मारुती महाराज आणि श्री जानकी दुर्गा देवी यांचीही सेवा करत आहे, हे सर्व श्री स्वामी समर्थ कृपेने होत आहे…त्याच बरोबर त्यांच्याच कृपेने संसार आणि आपल्या ज्ञाती परिवारातही सामाजिक कार्य होत आहे.
हीच कृपा कायम असावी ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे.
श्री. अतुल फणसे.
98197 70330
atul.a.phanse@gmail.com
Leave a Reply