महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र, गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केले होते. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती यासारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले. दूरदर्शन तसेच आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. १९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात करुन याचे यशस्वी संपादन केले. त्यांनी सांगली जिल्हातील माडगूळे या खेडयात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन ग.दि.माडगूळकर हायस्कूल सुरु केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या विविध चळवळीत सहभाग घेतला. १९७८ साली पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
श्रीधर माडगूळकर यांचे निधन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply