‘भेटी लागी जीवा…’ सारख्या आर्त अभंगापासून ‘कळीदार कपुरी पान…’ सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती…’ सारख्या चिमखड्या बालगीतापासून ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचे कोंदण देणारे श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांना अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडूनही संगीताची तालीम मिळाली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून त्यांनी नोकरी धरली पण त्यांचे आणि संगीताचेही भाग्य मुंबईत होते.
शांताराम रांगणेकर या बालपणीच्या मित्राच्या मदतीने मा.श्रीनिवास खळे मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संगीतक्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी धडपड सुरू झाली; रांगणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. नवलकर चाळीत राहणाऱ्या रांगणेकर यांच्या कुटुंबात सतरा जणांचा समावेश होता; त्यात खळे यांची भर पडली. रांगणेकरांनी खळेंना आपल्या कुटुंबात सामावून घेतले; एवढेच नाही, तर आपल्या खिशातील आठ आण्यांतील सहा आणे ते खळे यांना जेवणाचा डबा आणि रेल्वेच्या पासासाठी देत असत. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात खळे तेव्हाचे विख्यात संगीतकार डी. पी. कोरगावकर म्हणजेच के. दत्ता यांच्याकडे सहायक म्हणून काम करू लागले. स्वरांच्या सान्निध्यातच जीवनाचा आनंद घेण्याची आंतरिक इच्छा आणि स्वप्न पूर्तीसाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्यातून त्यांना “लक्ष्मीपूजन’ या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी बोलावण्यात आले. त्या चित्रपटातील गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. पण मुंबईत आल्यानंतर खळे यांनी केलेली पहिली स्वररचना गुजराती गाण्यासाठी होती; या गीताला स्वर दिला होता तलत मेहमूद यांनी.
खळे यांनी “लक्ष्मीपूजन’ या चित्रपटानंतर “यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटाला संगीत दिले. त्यातील “गोरी गोरी पान’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यानंतर “जिव्हाळा’, “बोलकी बाहुली’, “पळसाला पाने तीन’, “सोबती’ या चित्रपटांना खळे यांचे संगीत लाभले. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकीच राहिली. पण आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. “निळा सावळा नाथ’, “कळीदार कपुरी पान’, “सहज सख्या एकटाच’ ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि “शुक्रतारा मंदवारा’ या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचे स्वर लाभलेले हे गाणे पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीच्या “भावसरगम’ कार्यक्रमातून रसिकांपुढे आले. या भावगीतानेच अरुण दाते या सुरेल गायकाची ओळख मराठी श्रोत्यांना झाली. मा.पु. ल. देशपांडे, केशवराव भोळे, मंगेश पाडगावकर, वा. रा. कांत, यशवंत देव असे दिग्गज आकाशवाणीत श्रीनिवास खळे यांचे सहकारी होते.
आकाशवाणीत असताना त्यांनी “विदूषक’, “पाणिग्रहण’ आणि “देवाचे पाय’ या नाटकांना संगीत दिले. ते १९६८ मध्ये “एच.एम.व्ही.’च्या (हिज मास्टर्स व्हॉईस) मराठी विभागाचे संचालक झाले. त्यांच्या चाली अवघड असतात असे म्हटले जाते; परंतु त्यावर खळे यांचे उत्तर असे असायचे, “”माझ्या चाली गायला अवघड असल्याची तक्रार मला मान्य आहे. पण माझी प्रत्येक चाल ही सर्वस्वी माझीच असली पाहिजे. माझ्यानंतर किमान १०० वर्षे तरी या चाली रसिकाला आवडल्या पाहिजेत, यासाठी माझा प्रयत्न असतो.” “एचएमव्ही’मध्ये असताना त्यांनी विविध प्रकारच्या कॅसेट काढल्या. “अभंग तुकयाचे’, “राम शाम गुण गान’, “अभंगवाणी’ असे त्यांचे “अल्बम’ अत्यंत लोकप्रिय ठरले. भेटी लागी जीवा…’ सारख्या आर्त अभंगापासून ‘कळीदार कपुरी पान…’ सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती…’ सारख्या चिमखड्या बालगीतापासून ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ सारख्या रांगड्या शब्दांना त्यांच्या अतिशय चपखल चालीचे कोंदण लाभले होते.
खळे यांच्या संगीत रचनांना अनेक गायकांनी स्वर दिला आहे. मा.खळे यांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिले, त्याचे कारण म्हणजे स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत. यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. खळे यांनी अनेक वर्षांनंतर “कळी’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले होते. खळे यांना आपल्या प्रदीर्घ, स्वरमय कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान लाभले होते. श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. श्रीनिवास खळे यांचे २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीनिवास खळे नक्षत्राचे देणे.
https://www.youtube.com/watch?v=nY3_LvxHtKQ&list=PLB81B18245264CEF7&index=12
Leave a Reply