लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या वेदपाठशाळेत झालं.
दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ख्याती मिळविली. तशी घरीच गरिबीच, थोडीशी शेती अन् आंब्याची चार झाडं. पण मुळातच काटकसर आणि काटेकोर असणा-या माणसाला काहीही कमी पडत नाही हेच खरं. भिक्षुकी या व्यवसायाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपल्या वागण्यातून अन् व्यवसायातल्या निष्ठेतून. पारंपरिक कथांमधून असणारी ‘गरीब, बिचारा ब्राह्मण’ ही विशेषणं त्यांच्या मनाला रुचत नसत. स्वच्छ धोतर, पांढरा अंगरखा, काळी टोपी असा साधा पोशाख.
पण रस्त्याने जात तेव्हा लोक आदराने नम्र होत. अत्यंत मृदुभाषी, मितभाषी. पण त्यांच्या सहवासात यायला, त्यांचा सहवास मिळावा यासाठी माणसं आतुर होत. व्रतस्थपणे साहित्यसेवा करणा-या अण्णांशी ओळख व्हावी, जवळीक असावी असं प्रत्येकाला वाटत असे. भिक्षुकीला जाताना ते नेहमी चालत जात. वाड्यातून देवगड-दाभोळपर्यंत तर गिर्ये विजयदुर्गपर्यंत यजमान्याने सांगितलेल्या वेळेत हजर.
पूजाविधी, मंत्रविधी करताना कोणतीही काटछाट, शॉर्टकट्स त्यांना बिलकुल मान्य नसे. करायचं ते काम नीटनेटकं, मनापासून. भिक्षुकीचा व्यवसाय तरुणांनी करावा, यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत. पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचावं, ही परंपरा टिकून राहावी, तरुणांनी या व्यवसायात यावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरी वाड्याला वेदपाठशाळा सुरू केली.
कुणाकडून एक आणासुद्धा न घेता आपल्याकडचं हे धन मुक्तपणे पुढच्या पिढीच्या हवाली केलं. आज कितीतरी तरुण त्यांची ही परंपरा पुढे चालवत आहेत. ब्राह्मण तरुणांना उदरनिर्वाहाचं एक उत्तम साधन त्यांनी मिळवून दिलं. बरेच लोक त्यांना अण्णा म्हणत. अण्णांना रिकामं बसलेलं कुणी कधीच पाहिलं नसेल. कधी माडाच्या झावळय़ांपासून हीर काढणं, जानवी करण्यासाठी सूत कातणं, जानवी, वाती तयार करणं, द्रोण-पत्रावळी बनवणं, होमासाठीची तयारी समिधा, दर्भ वगैरे जमा करणं, काहीना काही उद्योगात ते असतच असतं. श्रीपाद काळे मानसन्मान, गर्दी, माणसं यांपासून जरा दूरच असत. लेखन साधं,
व्यक्तिमत्त्व साधं म्हणूनच तर अनेक मान्यवर व्यक्ती मुद्दाम त्यांना भेटायला येत असत. दोन दोन दिवस राहत असत. पत्नी इंदिराबाईंची उत्तम साथ, त्याही नीटनेटक्या, चौथीपर्यंत शिकलेल्या. आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करण्याची हौस. यामुळेच अण्णांच्या घरी आलेली माणसं तिथे रमत. श्रीपाद काळेंची ‘रानपाणी’ ही कादंबरी वाचून गो. नि. दांडेकर त्यांच्या घरी आले. चांगले दोन दिवस राहिले. येताना त्यांनी पेरूच्या दोन करंड्या आणल्या होत्या.
अण्णांच्या घराजवळ असलेलं पेरूचं झाड त्या बियांपासून तयार झालंय, असं वामन काळे सांगतात. त्यांचे हे धाकटे बंधू आकाशवाणी सांगली केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत होते. आता सेवेतून निवृत्त झाले आहेत.
थोर साहित्यिक रवींद्र पिंगेंशी तर अण्णांची गाढ मैत्री. या दोघांना एक त्र बघून खूप गंमत वाटे; यासाठी की रवींद्र पिंगे बोलघेवडे अन् श्रीपाद काळे मितभाषी. रवींद्र पिंगेंच्या पुस्तकात श्रीपाद काळेंविषयी लिहिलंय, अगदी तसेच होते ते जगदीश खेबूडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य यांसारख्या थोर व्यक्तींनी या गावात पायधूळ झाडली ती केवळ अण्णांना भेटण्यासाठी.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तर कितीतरी वेळा येत. वाडा या छोटेखानी गावात वाचनालयातर्फे एक साहित्य संमेलन जवळजवळ २५-३० वर्ष भरत आहे. अण्णांनी याची सुरुवात केली. नामवंत व्यक्ती या साहित्य संमेलनाला आवर्जून हजर असतात. रेणू दांडेकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, उषा परब, प्रा. तरुजा भोसले या माहेरच्या ओढीने वाड्याला येत. रेणू दांडेकरांशी तर त्यांचे कौटुंबिक संबंध जुळून आले.
श्रीपाद काळेंच्या कथा काय किंवा कादंब-या काय, विषय अगदी साधे, वाचकाच्या अवतीभवती घडणारे, नित्य अनुभवातले. त्यामुळे समजायला सोपे. गूढ, गर्भीत अर्थाची रचना नाही. शब्दांचा खेळ नाही. साधीसुधी भाषा, अगदी आपल्याशी कुणी बोलतंय. आपल्याला काही सांगतंय अशी. म्हणूनच ती वाचकांना भावली. ब-याचशा कथा कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या, वर्तमान स्थितीतल्या.
स्वातंत्र्यानंतरच्या या मध्य कोकणातल्या कौटुंबिक, सामाजिक स्थितीचा अंदाज आपल्याला देणा-या आहेत. सभोवतालच्या जीवनात जे भलंबुरं दिसत होतं त्यांना त्यांनी कथारूप दिलं. कोकणातल्या दुर्गम भागात जगणारी माणसं, पोटापाण्याची जुळवाजुळव करताना वाट्याला आलेला अपमान, कष्ट सामाजिक संकेतांचं पालन करताना करावी लागणारी धडपड, सामाजिक संकेतांचं दडपण, सुख आणि दु:ख याचा पाठशिवणीचा खेळ, दैवाधिनता हे सर्व डोळसपणानं पाहिलं आणि कथाबीज फुलत गेलं.
‘प्रथा’ या कथेतील गोदाक्कावर गोठय़ाच्या कोप-यावर काही मारायचं या प्रथेचा पगडा असतो. आयुष्यभर ही प्रथा गोदाक्काला छळत राहते आणि प्रथेचं पालन पुढच्या पिढीकडून व्हावं म्हणून घरातल्यांना ती छळत राहते. गोदाक्का ही कोकणच्या संस्कृतीत जगणारी एक प्रातिनिधिक स्त्री.
श्रीपाद काळेंच्या कथेतल्या स्त्रिया कमालीच्या सोशीक आहेत. नव-याने दिलेली अपमानकारक वागणूक, सासरच्या माणसांकडून झालेला छळ त्या सोसतात, मुलांसाठी खस्ता खातात आणि त्यांच्याकडून होणारी प्रतारणा सहन करतात. त्यासाठी प्रारब्धाला दोष देतात, दैवावर हवाला ठेवतात. तुळशीला पाणी घालणं, सांजवात लावणं, अतिथींचं स्वागत करणं, व्रत नेमधर्म पाळणं हे त्यांचे कार्यक्षेत्र. त्या मनापासून सांभाळतात. आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळात हे सर्व कालबाहय़ वाटतं. पण उंब-याची मर्यादा सांभाळणा-या या नायिकांनी घरातल्या प्रसन्नतेला तडा जाऊ दिला नाही.
बंड करण्याची, पेटून उठण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवली. तेच त्यांचं ‘स्वत्त्व’ होतं. ते त्या स्त्रिया जपत राहिल्या. घरासाठी त्याग करणारी, पतीबरोबर फक्त सात पावलंच नव्हे तर अंतापर्यंत चालत राहणारी, संसार होमात आपल्या इच्छा-आकांक्षांना आहुती देणारी स्त्री. खरं तर हा प्रकृतीकडून पुरुषत्वाकडे वाटचाल करण्याचा हा मार्ग. भारतीय अध्यात्मशास्त्राचा भक्कम आधार या विचारात सापडतो.
श्रीपाद काळे यांनी आपल्या कथा-कादंब-यांतून निसर्गाची लोभस वर्णने रेखाटली आहेत. पाऊस लाल लाल पाणी, वहाळ, परे, पाणंद, गारगार वारा, समुद्र, खाड्या, पाखरं, जनावरं, खुरटलेल्या वेली, सूर्याची किरणं, चांदणी रात्र, निळंकाळं आकाश,
बहरलेली शेतं. आंब्या-फणसाची झाडं असे अनेकानेक संदर्भ सहजपणे येतात. ते वगळून कथानक पुढे सरकत नाही. त्या कथाबीजाला पूरक वातावरण हे संदर्भ देत राहतात.
पौषातली अमावास्या होऊन गेली तरी हाती काही लाभलंच नाही – खार मोठय़ा फणसावर जाऊन जिवाच्या आकांतानं चिवचिवत राहिली.
कथा प्रथा, ‘पाणी एकसारखे वाढत होते आणि केसुनानांच्या जिवाचा थरकाप वाढत होता..’ त्या उधाणाला पाण्याबरोबर माडाच्या सावल्या वाहत होत्या. लाकडाचे ओंडके बेगुमानपणे पाणी नेत होते. कथा चुटपूट कोकणच्या जीवनाला हा निसर्गही कधी साथ देतो कधी उग्र रूप धारण करून होत्याचे नव्हते करून टाकतो. कोकणातला सामान्य माणूस निसर्गाच्या या लहरीपणाचा मारा सहन करत ताठ उभं राहतो हे त्यांच्या कथांतून जाणवत राहतं.
भिक्षुकी हा व्यवसाय करत असताना माणसांशी त्यांचा अगदी जवळून संबंध आला. विविध दैविक कृत्य करताना त्यांच्यातला साहित्यिक जागा असायचा. माणसांचे विविध नमुने त्यांना भेटत. ते सांगत ब-याचशा कथा त्यांना तिथेच सुचत. चालत येताना, जाताना मनात त्या विषयाची जुळणी होई. दिवसभराच्या व्यापातून मुक्त झाल्यावर रात्री शांतवेळी त्या कथा कागदावर उतरत असत. वीज आली नव्हतीच, कडू तेलाच्या दिव्याच्या उजेडात, कंदिलाच्या उजेडात त्यांचं लेखनकार्य चालू असायचं हे एक वेगळंच यज्ञकर्म घडत होतं. साध्यासुध्या, प्रासादिक भाषेत श्रीपाद काळेंनी मानवी जीवनातल्या व्यथा, सुखदु:ख, चढउतार टिपले आहेत. लेखनातल्या मार्मिकतेने वाचनीयता वाढवली आहे. सोप्या मारलेल्या अनेक गाठी बघून आपल्याला कोडं पडावं, पण एक सूत ओढताच आपल्याला सगळय़ा गाठींचं रहस्य उमजून यावं, तसं माझं झालं आहे.
वांझोट्या झाडाला अचानक केव्हा तरी फूल दिसावं ना, तसं कैक दिवसांनी त्यांच्या मुद्रेवर हास्य उमललं- सहानुभूती. अशी वाक्यांची सुरेख पखरण त्यांच्या कथांतून आहे. श्रीपाद काळेंच्या कितीतरी कथांचे नुसते प्रारंभ, शेवट पाहिले तरी त्यांच्या प्रतिभाशक्तीचा प्रत्यय येतो. अण्णांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. आपलं शालेय शिक्षण झालं नाही, याची त्यांना खंत वाटत असे, ते ती बोलून दाखवत. पण लेखनसेवेत खंड पडला नव्हता. मानसन्मान यांपासून दूर असणा-या श्रीपाद काळेंकडे मानसन्मान स्वत:हून चालत आले. ‘पिसाट वारा’ या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. गुजराती, कानडी, हिंदी भाषांतून त्यांच्या कादंबरीची भाषांतरे झाली.
कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरीतर्फे त्यांच्या या साहित्यसेवेबद्दल पावस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. १९९६ मध्ये लोकमान्य टिळक स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रीपाद काळे यांचे निधन १८ जून १९९९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / संजीवनी फडके
श्रीपाद काळे यांच्या काही ठळक कादंब–या पिसाटवारा, रानपाणी, एक काळ, एक वेळ,माया, अभुक्त, उमा, काळोखाची वाट, तुटलेले पंख
कथासंग्रह : संकेत, संधीकाळ
Leave a Reply