श्रीपाद नेवरेकर यांनी इनायत हुसेनखॉं व खादिम हुसेनखाँ यांच्याकडे अनेक वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म ३ जुलै १९१२ रोजी झाला. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडसांसारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या. त्यांपैकी स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन, सौभद्रातील कृष्ण, एकच प्यालातील रामलाल, मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळमधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.
गंधर्व नाटक मंडळी बंद झाल्यानंतर ठेकेदारांनी आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगात ते त्यांच्या लोकप्रिय भूमिका वारंवार करीत असत; परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते पुढे नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. १९७३ साली गोव्याच्या संगीत अकादमीत सुगम संगीताचे शिक्षण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यामुळे ते पणजी येथे स्थायिक झाले व सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांनी १९७६ सालापर्यंत काम केले. श्रीपाद नेवरेकर यांचे १६ जून १९७७ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply