नवीन लेखन...

।। श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर ||

गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे.

श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके १७७७ म्हणजे दि. ३/९/१८५५ रोजी रोहिणी या नक्षत्रावर, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी गावी झाला. हा गाव घटप्रभा नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मधे वसलेला असून दत्ता पंतांच्या आयुष्याचा बराच काळ या गावांशी निगडीत आहे. दत्तांपंतांचे वडिल हे बेळगावनजीक बाळेकुंद्री या गावच्या कुलकर्णी घराण्यापैकी होत. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बेळगाला झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांना आपले शिक्षण पूर्ण केले.

श्री महाराजांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म-विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच होते. त्यांना महाराजांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधन मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत. महाराज्यांच्या मातोश्रींचे आजोबा अंबाजीपंत हे एक महान गृहस्थाश्रमी सत्पुरुष होऊन गेले. श्रीनृसिंहवाडीत अनुष्ठानरस बसणाऱ्या मंडळींना दड्डीस जाऊन अंबाजीपंताचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे काम होईल. असा दृष्टांत होत असे. त्यांचे चिरंजीव नरसिंहपंत हे ही सात्त्विक आचारसंपन्न पण अत्यंत व्यवहारदक्ष व करारी होते. ते अंबाजी पंतांच्या हयातीतच वारल्यामुळे त्यांच्या तीन मुली व मुलगा श्रीपाद यांचा भार त्यांचेवरच पडला पण श्रीपादपंत दहा वर्षाचे असतानाच अंबाजीपंतांनी देह ठेवला. त्याचे आतच आपल्या तिन्ही नातींची लग्ने त्यांनी उरकली होती. महराजांचे पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण” असे ठेवले होते. पुढे दृष्टांत होऊन “दत्तात्रय” असे दुसरे नाव ठेवण्यात आले. वडीलमाणसे त्याला प्रेमाने “दत्तू” म्हणून हाक मारीत. घरात प्रथम जन्मास आलेले अपत्य म्हणून दत्तूवर सर्वांचे विशेष प्रेम जडले.

बालपणीच, दड्डीचे जंगल, नदी, डोंगर व निसर्गाशोभा यांचा दत्तूचे मनावर फार अनुकूल परिणाम झाला असला पाहिजे, दत्तूचा वर्गात पहिला नंबर असे, कधीही कसलीही चूक न करणारा, खेळकर, मनमिळाऊ व आज्ञाधारक असा त्याचा विद्यार्थीदशेत लौकिक होता. इकडे श्रीपादपंतांनी त्यांचेकडून कर्म व उपासनेचे कडक आवरण करून घ्यावयाचे, अक्षर वळविण्यासाठसुध्दा “विदुरनीती” अशी प्रकरणे शिकवायचे. त्यांच्या फुरसतीच्या वेळी त्याला आपल्या हाताखाली घ्यावयाचे, याप्रमाणेच चोख गृहशिक्षणातून पार पडून तो इंग्रजी शिक्षणासाठी बेळगावास इ. स. १८७२ साली जाऊन राहिला. क्रमाने एकेक बंधू आपले प्राथमिक शिक्षण दड्डीस संपताच बेळगावास दत्तूच्या बिऱ्हाडी जाऊन राहू लागले. बेळगावास इंग्रजी शिक्षण चालू असताना पंताचा मावसभाऊ गणू मारीहाळास आपल्या गावी रहात होता. हे गाव बाळेकुंद्रीच्या पूर्वेस ४/५ मैलांवर आहे. तेथून एक मैल पूर्वेस कर्डेगुद्दी हे गाव आहे. त्या ठिकाणी श्रीबालमुकुंदाची स्वारी पार्शवाडहून येऊन राहिली होती. त्यांचे मूळचे नाव बाळाजी अनंत कुलकर्णी असे होते. ते परमार्थातील असामान्य योग्यातेचे तपस्वी व महायोगी असून परमहंस पदवीस पोचलेले होते. त्यांचा अनुग्रह पंताचे मावस भाऊ गणपतराव यांजवर होऊन त्यांनी दत्तूस त्यांचे दर्शनास येण्याबद्दल पत्र धाडले. त्यास दत्तूने उत्तर पाठविले ते असे की, “बाह्मणांना गायत्रीमंत्र व उपदेश याविना अन्य मंत्राची अगर गुरुची आवश्यकता काय? तू आपला उद्योग सोडून कोण भोंदू, बैराग्याचे नादी लागला आहेस. ताबडतोब शध्दीवर ये व आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे हे दत्तूचे उत्तर बाळाप्पास समजताच त्यांनी ” हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ” असे उद्गार गणू व इतर शिष्यमंडळींपुढे काढले. ते ऐकून गणू रडू लागल्याचे पाहून बाळप्पा हसून म्हणाले की “तो इकडे येईलच. त्यानंतर पुढे काय होत ते पहा.” त्यावेळी दत्तू दड्डीस होता. त्याला एकाएकी विषमज्वर येऊ लागला व त्यातच सान्निपात झाला. त्या भ्रमात “बाळप्पा, बाळप्पा” असे तो बडबडु लागला.

घरची सर्व मंडळी घाबरली व त्यांनी देवास नवस मागितला की, दत्तू बरा होताच त्याला बाळप्पांकडे पाठवून देऊ. या दुखण्यातून कृपा करून त्याला बरा कर. दत्तूस लवकरच आराम पडला व त्यानंतर त्याची व बाळप्पांची गाठ पडून त्यांची त्याजवर पूर्ण कृपा झाली.

श्रीबालमुकुंदाचा अनुग्रह होताच दत्तूचा पुनर्जन्म होऊन तो श्रीपंत बनला, त्यांचा सहवास पंतांना फार तर दोन-तीन वर्षे लाभला असेल पण तेवढ्या अवधीत इंग्रजी शाळेतील अभ्यास चोख करून बेळगाव येथील आपल्या प्रपंच खर्चासाठी मदत म्हणून काही शिकवाण्या धरून व बालमुकुंदाच्या कृपाछत्राखाली गुरुगृहीचे खेळ खेळताच त्यांनी सर्व प्रकारची योगसिध्दी मिळविली ही अत्यंत नवलाची गोष्ट होय. कर्डेगुद्दीपासून ४/५ मैल पूर्वेस देसनूर येथे श्रीबालमुकुंदाचे वास्तव्य काही काल असताना येथील एका देवालयात ते योगाभ्यासा साठी बसत असत. ती जागा अद्याप दाखविली जाते. कर्डेगुद्दीच्या डोंगरावर अय्यन फडी या देवस्थानासन्निधही त्यांचेकडून बाळप्पांनी तप करविले. एकदा तीन दिवस अहोरात्र अखंड गुरुध्यान करीत बसण्याची व बिलकूल निद्रावश न होण्याची श्रीबालमुकुंदांनी आपल्या शिष्यमंडळींना आज्ञा केली. त्यात कोणी जेवताना झोपले तर कोणी स्नान करताना गुंगी येऊन खाली पडले. एकटे पंत तेवढे अखेरपर्यंत टिकून राहिले इ. स. १८५५ ते १८७७ अखेर, एवढाच काल काय तो बाळप्पांचा सहवास मिळाला. शके १७९९ च्या कार्तिक महिन्यात बाळप्पांचा श्रीशैल्ययात्रेस जाण्याचा निश्चय ठरला. त्यांचे अगोदर थोडे दिवस त्यांनी पंतांना गुरुमार्ग चालविण्याची आज्ञा केली होती. महाराजांनी त्याबाबत पुष्कळ आढेवेढे घेतले. पण बाप्पांनी निक्षून सांगितले की, “हे काम तुला केलेच पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. अपात्रता वगैरे तुझी काही सबब चालणर नाही. तुला माझे पूर्ण वरदान आहे!” महाराजांनी ती आज्ञा स्वीकारणे भाग पडले. व श्रीबालमुकुंद ठरल्याप्रमाणे श्रीशैल्याकडे निघून गेले. ते पुन्हा काही परत आले नाहीत. यावेळी पंत मॅट्रीकची परीक्षा पास झाले नव्हते. परंतु अशा सर्व प्रकारे अडचणीत असताना त्यांचेवर गुरुमार्ग चालविण्याचा भार पडला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२/२३ वर्षाचे असेल. बाळप्पाच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सहजमार्गदर्शन करणे व गुरुमार्ग चालविणे हेच तेव्हापासून त्यांचे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसले.

सन १८८० च्या नोव्हेंबरमध्ये पंत मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील वर्षीच आपला बंधू गोपाळ व मामेबुधू नाना यांना इंग्रजी शिकवण्याकरिता बेळगावास आणून ठेविले व आपण शाळामास्तरची नोकरी पत्करली आणि कसाबसा बेळगाव येथील संसार चालवू लागले. त्या स्वरूपात त्यांचेकडून अखंड सद्गुरुसेवाच घडली. प्रत्येक बाबतीत इतरांना आदर्शभूत असा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरून दाखविला. क्रमाने एकेक बंधु व आप्तेष्टांची मुले व गरीब विद्यार्थी त्यांचेकडे शिक्षणासाठी येऊन राहू लागले. त्या सर्वांवर कडक नजर ठेवून, त्यांचेकडून उत्तम अभ्यास व नीतिनियमांचे परिपालन कटाक्षाने करविले. अखेरपर्यंत त्यांनी उत्तम शिक्षक असे नाव मिळविले. संसार व परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना अनेक बाबतीत साहय्य दिले. इतके असून कधीही ते द्रव्यास शिवले नाहीत. पगार हाती येताच ते आपल्या बंधूपैकी जो व्यवस्थापक असेल त्याचे हवाली करणे, हा त्यांचा प्रघात असे. शाळेतून येताच ते आपल्या कोचावर बसून, वेदांचे ग्रंथाचे वाचन, चर्चा व मुमुक्षूजनांचे समाधान करणे यात निमग्न असत. सकाळ संध्याकाळा नियमाने भजनपूजन व येणाऱ्या जाणाऱ्याचे अतिथ्य घडत असे.

सन १८९७ ते १९०३ पर्यंत दरसाल बेळगावात प्लेगने कहर करून सोडायचा. प्रेत टाकून लोक पळून जात होते. अशा वेळी पंतबंधूनी प्रेतवाहकाचे कामी पुढाकार घ्यावयाचा. सुट्टीत परगावी उड्डीकडे वगैरे गेल्यावेळी पाणी वाहून आणण्याचे काम अनायासे होईल म्हणून लग्नकार्य करण्याच्या लोकांनी यांच्या येण्याची वाट पाहत बसण्याचे कारण यांचेबरोबर भक्तमेळा असावयाचा व तो केव्हाही परोपकारी असणारच, असा अनुभव असे पंतांचे बंधू, कोणी वकील, कोणी मन्सफ, कोणी चिटणीस, कोणी प्रांतसाहेब वगैरे हुद्यापर्यंत चढले तरी त्यांनी आपापल्या परी सदाचार व परोपकाराचा लौकिक वाढविला.

मार्गदर्शन: – भक्तियोग, राजयोग व ज्ञानयोग हे त्यांच्या नखशिखांत भरले असून तदनुसार आचरण त्यांनी आपल्या भक्तांकडून घडविण्याचा सतत प्रयत्न केला. योगसाधना व मुद्रा लावणे हे ज्यांना करावेसे वाटे त्यांचेकडून करवीत असत. वेदांतचर्चा व इतरांचे शंकासमाधान ते निरलसपणे करीत. तथापि त्यांचा कटाक्ष भक्तियुक्त कर्ममार्गावरच असे. वर्षातून त्यांच्या दड्डीतेक तीन खेपा व्हावयाच्या. त्या त्या वेळी दड्डीच्या जंगलात नदीकाठी व गावातील दत्तमंदिरात त्यांचे भजन टिपऱ्या खेळणे वगैरे पारमार्थिक खेळ अव्याहत चालत. तयांतही मंडळी धन्य होतच पण प्रेक्षकजनही देहभान विसरून भक्तिप्रेमाने अत्यंत सुखवत. सन १८८३ पासून वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तिकडे वळली. मन भजनात रंगू लागले. सहज काव्य-स्फुर्ति होऊ लागली. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनानी ओथंबलेले आणि त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. सन १८८३ पासून १८८५ चा काल संचार, प्रबोधन वसंप्रदाय प्रचार यात महाराजांनी घालविला व शिष्यशाखा जोडली. भजन-पुजन, अध्यात्म चर्चा व हसत-खेळत उपदेश हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम यात बालमुकुंदाचे स्मरण व पुनर्भेटीची तळमळ ही सतत अनुस्यूत होती.

सन १८८५ अखेर अंतर्मुख अवस्थेत त्यांना बाळप्पांचे निर्माण झाल्याचे कळून आले व जबाबदारीची जाणीव तीव्र झाली. त्यांनी बालमुकुंदांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यांसारखे उत्सव चालू केले. सन १८८९ पर्यंतच्या काळात अशा रीतीने पंथ-प्रचारकार्याला चालना दिली. त्या वर्षाअखेर एक दत्तमंदिर बांधण्याचे कार्य त्यांनी पुर्ण केले.

पुष्कळ वेळा तिसऱ्या घातीत भजन करीत असताना त्यांचे देहभान नष्ट होऊन
त्यांच्या सवंगड्याची पंचाईत होई. ज्यांनी त्यात भाग घेऊन नाचत असत व तीच
अवस्था त्यांच्या सवंगडयंची होई. ज्यांनी त्यात भाग घेतला असेल अगर नुसते पाहिले असेल, ते धन्य होत.

सन १९०६ पासून श्रीक्षेत्र बाळेगुंद्री येथे दरसाल जे पूर्णपणे वाणलेली असत. अहंकारावर त्यांचा प्रहार झाला नाही असे एकही पद आढळावयाचे नाही व तो शिष्यांचे ठायी निर्मूलन करणारा पंतांसारखाच समर्थ सद्गुरु प्राप्त होणे कठीण आहे. हे स्वानुभवाने व कृतकृत्येने मला म्हणावेसे वाटते. सद्गुरु कसा असावा.
सद्गुरु तोचि करावा । वेदोदित अनुभवी असावा ।। धृ ॥
शिष्याची जो न घे सेवा । उपदेशिता मानी देवा ।। १ ।।
गुरुत्वाचा अभिमान नाही । बोधी धरी नम्रभावा ।। २ ।।
साधन शीण न लावी दासा । अभयवचने पंतबंधु कै. गोपाळरावजी हे हुक्केरीस मामलेदार असताना फिरतीवर एका तल्लख घोड्यावर बसून गेले असता, घोड्यावरून खाली पडता पडता साहजिकपणे “दत्ता, दत्ता” असे त्यांचे तोंडून शब्द बाहेर पडले. तोच इकडे पंतांना ती तार पोचली व त्यांचे दर्शन गोपाळरावांस होऊन आलेले संकट निभावले. विद्यार्थी दशेत अनेक चमत्कार घडलेले पाहिले आहेत. पण आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत अशी भावना शिष्यांच्या ठिकाणी ते वसू देत नसत. आम्हा सुशिक्षित म्हणविणाऱ्या मंडळींना ते सांगत की, निसर्गात अनैसर्गिक काही असणेच शक्य नाही. त्याचे समोर कोणीही आला तरी त्याचे विचार त्यांना अवगत होऊन भाषणाचे ओघात, त्याच्या शंकांचे निरसन होऊन जाई हा तर रोजचाच अनुभव असे.

त्यांचे खेळ मुख्यत्वे शिष्यांच्या अंतःकरणातील द्वैतबुध्दी व तज्जनित भीती घालविण्याकरता व त्यांना यथेच्छ प्रेमसुख मिळावे म्हणून खेळले जात शिष्य होणारा इसम कोणत्याही जातीचा, धर्माचा पावून धन्य झलेले आहेत. शिष्यांकडून त्यांनी प्रेमाशिवाय अन्य कशचीही इच्छा केली नाही. त्यांना त्यांची आज्ञा फक्त “सद्गुरुभक्ती, बंधूप्रीती व अखंड शांती” ही ठेवण्याबद्दल असे. कुळधर्म, कुलाचार व सद्वर्तन न पाळणाऱ्यांची त्यांनी कधीही गय केली नाही.

श्रीपंतांच्या सद्गुरुभक्तीचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. असा प्रेमळ गुरुभक्त सहसा पाहावयास मिळत नाही. श्रीदत्त प्रेमलहरी कोणतेही पद उघडावे, त्यांत गुरुभक्तीचा गौरव झाला नाही असे व्हावयाचे नाही.

हृत्कमलकर्णिकेमाजर | सद्गुरु बैसविला || पेमानंदे तो पुजिला || धृ ।।
अहपणचे अर्घ्य देतां । अधिष्ठानी शोभला । भावातीत गुरु लाभला ।। १ ।।
प्रेमामृतस्नान घालिता। आंत बाहेर भिजला ।।भक्तभजनी पेमे सजाला ।। २ ।।
आत्मार्पण नैवेद्याने। दत्त तृप्त जाहला । नित्य भजनी डुलू लागला ।। ३ ।।

श्रीपंत अत्यंत प्रेमळ म्हणून काही त्यांनी गुरुआज्ञा भंग करणाऱ्यांची किंवा नीतिबाह्य वर्तन करणाऱ्यांची कधीही गय केली नाही. स्वकर्तव्यात कोणी चुकले असे पाहताच ते लगेच “हुशार!” म्हणून गंभीर सावधगिरी देत. गुरुआज्ञेविरुध्द वागणाऱ्यास ते सहसा क्षमा करीत नसत. ते देवासमोर आसनावर बसत तेव्हा किंवा उत्सवासाठी खोलीतून बाहेर पडत तेव्हा ते माझे आप्त किंवा स्वकीय नव्हेत तर साक्षात श्रीदत्तमूर्ती आहेत असा सर्वांना बरेच वेळा भास होई नामांकित शास्त्री किंवा पंडित त्यांच्याशी वेदान्त चर्चा करण्याकरिता, केव्हा केव्हा येत असत. त्यांच्या शंका किंवा भिन्न मते, पंत आसनस्थ असताना त्यांना पाहताक्षणीच नाहीशा होत ते पंतांची क्षमा मागत. याप्रमाणे ते “मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास! कठीण वज्रास भेदु ऐसे।” या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे अक्षरशः होते.

पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच आध्यात्म – विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीसच स्वतःचे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व गुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत.

इ. स. १९०३ पासून पंतांची प्रकृती ठीक राहिनाशी झाली. त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन, अखंड अवधूत चरण सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन प्रवचनात रंगून राहू लागले. गुरुबद्दल नितांत प्रेम हे त्यांचे एकमेव सुत्र. गुरु भक्तीने ते बेभान होत असत. पंतांची भक्ती प्रमस्वरूप व स्वरूपानुसंधान करणारी होती. त्यांनी ज्ञानभक्तीचे महत्त्व गायिले आहे.

ती. सौ. यमनाक्का दि. ८ मार्च १९०४ रोजी निवर्तली! त्यानंतर दीड वर्षानी श्रीपंतांनी इहलोकीची आपलीही यात्रा संपविली. आपले अवतारकार्य संपले, आता आपण लवकरच जाणार असे ते आप्त स्वकियांजवळ, यमनाक्काचे निधनानंतर १-२ वेळा म्हणाले होते. मुलगी अंबी, फार लहान होती म्हणून तिचेकरिता वर्ष दीड वर्ष राहिले असावेत. आपल्या प्रिय पत्नीस त्यांनी जो बालमुकुंदाचा सुंदर थाटविला होता त्याची निरवानिरव जणूचालली होती. अनेक ठिकाणचे अनेक भक्त येऊन गेले. आता वेदांतचर्चा ओसरून तिची जागा मधून मधून होणाऱ्या “शिवाय नम ॐ शिवाय नम:” या घोषाने घेतली जात होती. नित्याप्रमाणे घरी सर्व व्यवहार व नियमित भजनपूजन ही सर्व चालत पण पंतांची एकांतप्रियता वाढत जाऊन त्यांनी आतील आपली खोलीच धरली. रोज भजनाचे वेळी आपल्या बाहेरील कोचावर येऊन बसत.

बाळाप्पांना पंतांच्या रुपाने आपला अवधूत संप्रदाय चालविणारा अधिकारी मिळाला. त्यांनी पंतांच्याकडून योगाभ्यास योगाभ्यास करवून योजनेप्रमाणे ज्ञानदान केले. पंतांचा संपूर्ण निवृत्तीकडे कल दिसून येताच बाबहप्पांनी त्यांना परोपरीने उपदेश करून प्रवृत्तीचा व निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन, त्या सांप्रदायिक भूमिकेवर पंतांना स्थिर केले. बाळप्पांना, पंत “बालमुकुंद” किंवा “बालावधूत” असे आपल्या साहित्यात संबोधितात.

पंतांचे निर्याण: – अश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत ॐ नमः शिवाय चा गजर करीत त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी “बाळेकुंद्री” येथे आहे. या स्थानाला आता क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता पत-बाळेकुंद्री म्हणून ओळखला जातो. पंतांच्या पुण्यातिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपूर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती – निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.

पंतांचे वाडमय बरेच आहे. ते पद्यमय व गद्यमयही असून “श्रीदत्तपेमलहरी” या पुष्प- मालेतून प्रसिध्द झाले आहे. त्यात मानवी जवीनाचे ध्येय, तत्प्रीत्यर्थ साधना, भोगावा व त्यागाचा समनवय, अशा बोधप्रद विषयांचे सुगम विवरण वाचावयास मिळते. त्यांचे पद्य-वाडमय म्हणजे भक्तिरसाची प्रेमगंगा! त्यातील नादमाधुर्य अवर्णनीय आहे, अशा रीतीने का फेडित पापताप ! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ।। पंतांनी आपली जीवनगंगा सद्गुरूंच्या विशाल प्रेमोदधीत विलीन केली. पंत महाराज म्हणत, “भक्तांचे दुःखच माझे दुःख ः भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिले ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला ओह. परमर्थसिध्दर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष – पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती वैभव पुरवून देतो.”

श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम: –

१) सामाजिक नीतिविरुध्द आचार कदापि करू नये.

२) देशाचार, कुळाचार, वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे.
३) कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये.

४) भक्तीची कास सोडू नये.

५) सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी.

६) मनाविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावी.

७) केव्हाहि स्वानुभवसिध्द गोष्टींवर विशेष लक्ष असावे.

८) कोणाचीही भक्ती खंडू नये.

९) निर्गुण-सगुण-ऐक्य-भावाने भजनक्रम चालवावा.

१०) सावधगिरीने समर्थ-वाचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्ताने समर्थचरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे.

-– श्री संतोष शामराव जोशी

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ६ वा, (अंक ३०)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..