शृंगार वेलीवर एक वेल बहरावी
हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी
तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता
चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा
मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले
साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले
वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता
पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता
केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले
हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले
धुंद वेळ ती गंधित फुलला मोगरा तेव्हा
ओल्या सांजवेळी केसात तिच्या रमला केवडा
नजरेचे बहाणे नजरेच्या चालल्या खुणा
रातराणीत गंधाळला तिच्या चुंबनाचा लाल विडा
मलमली भाव मखमली पहाट ती जवळ येता
चंद्र पाहतो प्रिये तुज लाजू नकोस तू आता
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply