तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची. यामध्ये सगळंच यायचं. काही संस्कृत स्तोत्रं जिभेवर शुद्ध भाषा, लय, नाद आणि मनावर तत्त्वज्ञानाचे संस्कार होण्यासाठी. गीतेचे अध्याय – पाठांतरासाठी. आणि पुढे तेच जीवनाला स्थिर पाया द्यायचे. जगात कसं वागावं हे शिकवणारे मनाचे श्लोक आणि मग पाढे, इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग असं व्यावहारिक शिक्षणसुद्धा ! आई, आजी, आजोबा कुणीतरी गोष्ट सांगायचे. या गोष्टीही जीवनाला विचार द्यायच्या, भक्कम पाया द्यायच्या.
निसर्गाशी फारसा संबंध येऊ न देणाऱ्या बंद फ्लॅटमध्ये मुलांबरोबर बसून टी. व्ही. वरची आवाजाचं प्रदुषण गढवणारी गाणी पाहताना मी ती जुनी संध्याकाळ विसरूनच गेलेली असते. क्वचित कधीतरी आठवलं, की वाटतं कुठे गेली ती संस्कृती? मुळात संस्कृती म्हणजे काय?
असं म्हणतात, स्वतः खाणं ही प्रकृती. दुसऱ्याला न देता त्याचं हिसकावून खाणं ही विकृती. आणि आपल्यातला घास दुसऱ्याला देणं ही संस्कृती. माणूस पशूसारखंच तर जीवन जगत होता. ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ एवढ्याच त्याच्या जाणिवा होत्या, पण ज्या क्षणी त्यानं दुसऱ्याचा विचार करायला सुरुवात केली, त्या क्षणी मानवी संस्कृती जन्मली. संस्कृतीचा संबंध असा दुसऱ्याचा विचार करण्याशी आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भौतिकदृष्ट्या विकसित पद्धतीनं भागवणं एवढाच संस्कृतीचा अर्थ नाही. जीवनाबद्दलचा विचार हा संस्कृतीचा पाया आहे. आणि भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्रांतात तो समान आहे. म्हणूनच पोशाख, खाण्यापिण्याच्या सवयी, भाषा या भिन्न असल्या तरी भारतीय संस्कृती वेगवेगळ्या प्रांतातही अखंड अभंग आहे. आज मात्र दुर्दैवानं पारंपारिक पोशाख, दागिने, कुठल्याशा लोकगीताची चाल आणि त्या चालीवर नाचणं एवढीच ‘ संस्कृती’ मानली जाते.
खरं तर काळानुसार पोशाख, अन्नपदार्थ, राहणीमान यात बदल होणारच तसा तो झाला, तर संस्कृती लयाला वगैरे जात नाही. पण या बाह्य गोष्टींमागे आधारभूत असणारा विचार लयाला गेला किंवा विसरला गेला तर संस्कृती संपते, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक रीतिरिवाजात सामान्य बाह्य आचरणातही संपूर्ण समाजाचा विचार केलेला आहे. समाज म्हटलं की कुणी श्रीमंत, कुणी गरीब असणारच. पण या संस्कृतीनं अशा वर्गावर्गामध्ये सेतू बांधायला शिकवलं, व्यक्तीचा विकास, कुटुंबाचा विकास, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास या सगळ्या पायऱ्या चढत चढत ही संस्कृती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करण्याइतकी उंची गाठते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ असं मानते.
पण एका व्यक्तीचा संपूर्ण जगाशी संबंध येऊ शकणार नाही, हे तिला माहीत आहे. म्हणून स्वतःचा जेवढ्या व्यक्तींशी संबंध येतो, तेवढ्या व्यक्तींचा विचार करून कसं वागावं हे संस्कृती शिकवते. एकमेकांकरिता त्याग करायला शिकवते.
एखाद्या नदीच्या प्रवाहासारखी संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. एखाद्या संध्याकाळी मला वाटतं आमच्या पिढीपर्यंत हा वसा पोहोचवण्याचं काम आमच्या मागच्या पिढीनं केलं. पण आता हा प्रवाह इथेच गोठणार का?
आपली मुलं सुसंस्कारित आणि सुसंस्कृत व्हावीत असं आज किती पालकांना वाटतं? उलट त्यांच्यावरचा संस्कृतीचा ठसा पुसून टाकणं यालाच आम्ही सुधारणा मानतो. संस्कृत’ ही सगळ्या भाषांची जननी. तिच्या पठणामुळे जिभेला वळण लागतं. उच्चार शुद्ध, स्पष्ट येतात. कुठल्याशा नाट्यवर्गामध्ये शुद्ध उच्चारांकरिता श्रीसूक्त’ शिकवल्याचं ऐकलं होतं. या भाषेत संस्कार करू शकणाऱ्या, विचार देऊ शकणाऱ्या काव्य, साहित्याचा खजिना आहे. आणि ‘मातृभाषा’ म्हणजे तर ‘ आई.’ तिच्या शिक्षणामुळं मुलांची विचारशक्ती विकसित होते. पण आम्हाला मुलांनी फाडफाड इंग्लिश बोलणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि तेही फक्त बोलणंच हं. त्या भाषेचा अभ्यास वगैरे नाही. शेंडीला गाठ मारून ‘रामः रामौ’ करणाऱ्या कालच्या पिढीनं कॉलेजमध्ये जेवढा शेक्सपीयर, मिल्टन वाचलाय तेवढा नर्सरीपासून ए. बी. सी. डी. पाठ करणाऱ्या मुलांनी वाचलेला नसतो. पण हा वरवरचा उथळपणा आम्हाला आमच्या मुलांसाठी आवश्यक वाटतो.
दुर्दैवानं शैक्षणिक गुणवत्ता आणि सुसंस्कार यांची आज फारकत झाली आहे. पेपरमध्ये भरपूर मार्क्स मिळवणारा मुलगा सखोल विचारांचा, समृद्ध भावविश्वाचा असेलच असे नाही. पण आम्हाला मुलांची शैक्षणिक गुणवत्ता फक्त हवी आहे. त्यांच्या भावविश्वाचा आणि वैचारिक विश्वाचा विचार करायची गरज आम्हाला वाटत नाही. कारण शैक्षणिक गुणवत्ता पैसा मिळवून देते आणि पैसा हेच आज सामाजिक स्थान मिळवून देणारं एकमेव साधन आहे. मुलांच्या कर्तृत्वाचं मोजमाप त्यांनी मिळवलेल्या पैशावरूनच होत असतं.
अर्थात्, ‘पैसा’ ही काही वाईट गोष्ट नाही आणि गरिबी काही फार भूषणावह वगैरे नाही. भरपूर पैसा मिळवण्याचं कर्तृत्व हवं आणि तो जपण्याचा चतुरपणाही हवाच. पण त्याचबरोबर मैत्री, प्रेम, वडीलमाणसांविषयी आदर, कृतज्ञता, जीवनातल्या आदर्शावर श्रद्धा हे सारं जपताही यायला हवं. एखाद्या प्रसंगात डोळ्यात खुशाल पाणी यावं इतकं मन संवेदनाक्षम हवं तसं कठीण प्रसंगी कोरड्याठक्क डोळ्यांनी खंबीरपणे आघात साहता यावेत असं स्थितप्रज्ञ, स्थिर मनही हवं. हे सारं संस्कृती देते.
भारतीय संस्कृतीच्या वरवर साध्या दिसणाऱ्या आणि कधीकधी अर्थहीन वाटणाऱ्या रीतिरिवांजातून, साध्या, सोप्या, श्लोकांतून हे सारं मिळत असतं. पण दिवसभर शाळेच्या अभ्यासाखाली दबून जाऊन संध्याकाळी जरा विसावा म्हणून ‘एजी, ओजी’, वर नाचणाऱ्या आमच्या मुलांना संस्कृतीच्या देवघरातली हि इवलीशी पण तेजस्वी ज्योत कशी दिसणार?
आज ना उद्या कुणीतरी, केव्हातरी ही ज्योत उजळायला हवी हे मात्र खरं !
Leave a Reply