नवीन लेखन...

‘श्वास-एक ‘दृष्टी’-कोन’

‘मग ऑपरेशन करायचा निर्णय नक्की आहे ना?’
डॉक्टर साने त्या वृद्ध आजोबांना विचारतात.

‘हो अगदी..’ आजोबा ठामपणे म्हणतात.. पण त्यांच्या मनात अजून कुठेतरी एक शेवटची आशा असते म्हणून ते विचारतात ‘दुसरा काही पर्याय नाही ना?’

त्या एका प्रश्नातून त्या आजोबांचा आशावाद आणि त्यांची अगतिकता दोन्ही आपल्या मनाला भिडतात.

आपण माणसं निसर्गतः decision makers आहोत. आपण तसे आहोत म्हणूनच मनुष्य जातीने इतकी अफाट प्रगती केली. कारण प्रत्येक टप्प्यावर मनुष्य काही निर्णय घेत आलाय..वेगळा पर्याय निवडत आलाय..मग भले तो सुरवातीला चुकीचा वाटला तरी. त्यामुळेच आगीचा, हत्यारांचा शोध लावत तो शेतीची तंत्रे, दळणवळणाची साधणे, संदेश यंत्रणा यांचा शोधत लावत गेला व प्रगती करीत गेला. तो निर्णय घेण्याची, तो पर्याय स्विकारण्याची एक अफाट शक्तीच माणूस जातीला वरचढ ठरवत आली आहे…त्याच्या प्रगतीची दारे उघडत आली आहे.

पण हाच निर्णय जेंव्हा त्याच्या प्रिय व्यक्तीच्या जीवणमरणाचा प्रश्न होउन उभा ठाकतो तेंव्हा..? निश्चीतच तो निर्णय त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय असतो..जो निर्णायक तसाच अनिवार्य असतो.

मित्रहो, ‘श्वास’ हा चित्रपट अशाच एक निर्णयाची कथा आहे. निर्णय एका निष्णात डॉक्टरचा व ज्या मुलावर त्यांना शस्त्रक्रिया करायची आहे त्या मुलाच्या आजोबांचा..

विचारे नावाचे आजोबा कोकणातील एका छोट्या खेड्यातून आपल्या ७ वर्षाच्या नातवाला,परशुरामला, घेउन आलेत. परशुरामला डोळ्यांचा काही विकार आहे त्यासाठी ते पुण्यात आय सर्जन असलेल्या डॉक्टर सानेंकडे त्याला घेउन येतात. डॉक्टर साने आजोबांना जेंव्हा सांगतात की परशाला एक अतिशय दुर्धर आजार रेटिनोब्लास्टोमा, किंवा डोळ्याच्या पडद्याला, रेटीनाला झालेला कॅन्सर आहे, तेंव्हा विचारे आजोबा हबकून जातात. डॉक्टर साने त्यांच्या देश परदेशातील सिनीअर डॉक्टरांशी परशाच्या या केस बद्दल बोलून नाइलाजाने आजोबांना सांगतात की परशाच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर त्याचा कॅन्सर इतरत्र पसरुन त्याच्या जीवाला धोका आहे.

पण…ते पुढे सांगतात..जर डोळ्यांचं ऑपरेशन केलं तर परशाच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाईल व तो अंध होइल. आता मात्र विचारे आजोबांचे हातपायच गळून जातात. पूर्णपणे गोंधळून गेलेल्या आजोबांसमोर असतात दोन पर्याय, ऑपरेट करणे व परशाचे डोळे गमावणे किंवा ऑपरेशन करुन परशाच्या जीवावरचं संकट दूर करणे. पर्याय दोन व घ्यायचा असतो एक निर्णय…

अर्थात पोराचा जीव महत्वाचा म्हणून विचारे आजोबा ऑपरेशन करण्याचा कटू निर्णय घेतात. ह्या निर्णयावर येण्यासाठी त्यांना मदत करते सोशल वर्कर, आसावरी. ती आजोबांना पटवून देते की हेच परशासाठी योग्य आहे. पण खरं संकट अजून पुढे असतं. परशाला हे सांगायचं कसं व कुणी? खरं तर ही आसावरीचीच जबाबदारी असते पण परशात तिची झालेली भावनीक गुंतवणूक तिला ते करु देत नाही. त्यामुळे ती ही जबाबदारी डॉक्टर सानेंवर सोपवू इच्छिते. आता डॉक्टर सानेंसमोर दोन पर्याय असतात..हे माझे काम नाही म्हणून जबाबादारी झटकणे किंवा परशाला सत्य सांगून ऑपरेशनसाठी मनाने तयार करणे. भावनीक कल्लोळ त्यांच्याही तर मनात झालेला असतो..हे ऑपरेशन मोफत करण्याचे त्यांनी स्वतःच ठरवले असले तरी देखील..परशाला सत्य तर सांगायलाच हवं.

ऑपरेशनचा दिवस ठरतो, उगवतो. परशाला आदल्या दिवशी ॲ‍डमिट केलेले असते. पण शेवटच्या क्षणी काही तातडीचे दुसरे ऑपरेशन आल्याने डॉक्टर साने ते ऑपरेशन फक्त एक दिवस पुढे ढकलतात. सत्य कळालेला परशा त्या परिस्थितीत खूप चिडचीड, आदळआपट करत असतो. हॉस्पिटलच्या वातावरणात त्याची घुसमट होत असते. विचारे आजोबांचा संयमही आता संपलेला असतो. परशाने अशा परिस्थितीत एक पूर्ण दिवस पुन्हा कुढत काढणं त्यांना मान्य नसतं. पुन्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात. काहीतरी विचार करुन ते एक धाडशी निर्णय घेतात.

एका ॲ‍क्सिडेंट केसमुळे हॉस्पिटलमधे झालेल्या गर्दीचा उपयोग करुन आजोबा परशाला घेउन हॉस्पिटलमधून अचानक गायब होतात. आसावरी व आजोबांबरोबर आलेला परशाचा मामा, हॉस्पिटलच्या स्टाफसह त्यांचा सगळीकडे शोध घेत राहतात. पण ते सापडत नाहीत. पोलीस, पत्रकारांपर्यंत प्रकरण जातं की पेशंटच गायब झाला. डॉ.सानेंची त्या दिवसाची दोन ऑपरेशन्स या गडबडीत पुढे ढकलावी लागतात. त्या दोघांना काही अपघात किंवा आजोबांनी स्वतःच व परशाचं काही बरंवाईट केलं नसेल ना ही शंका आसावरी व डॉक्टरांना येउ लागते. डॉक्टर तिथून जायला निघणार इतक्यात त्यांना ते दोघे परत येताना दिसतात…डोक्यावर क्लाउन कॅप घालून व हसत उड्या मारत तोंडाने पिपाणी वाजवत येणारा परशा व त्याचा हात धरुन शांतपणे छत्री टेकत येणारे विचारे आजोबा.

आजोबांचा निर्णय काय असतो?

परशाला त्या दिवशी त्याने आजवर जे पाहिले व अनुभवले नाही ते सर्व आजोबा त्याला दाखवतात. एक पाच मिनीटांच्या सीनमधे आपल्यासमोर आजोबा व परशाने ती दुपार व संध्याकाळ कशी घालवली याचं एक सुरेख कॅलिडोस्कोपच मांडला जातो.
घोड्यावर, उंटावर व टांग्यात आजोबांबरोबर बसलेला परशा, रेल्वे म्युझियम पाहताना फुलून गेलेला परशा, फुगे आकाशात सोडून ते वरती जाताना हरकलेला परशा, फुटपाथवर कॅरिकेचर काढून घेणारा, माॕल मधल्या सरकत्या जिन्यावर अपूर्वाईने आजूबाजूला पाहणारा, मैदानावर चाललेला फुटबाॕलचा खेळ पाहणारा व आजोबांनी इशारा करताच जाउन त्यात सामील होणारा परशा व शेवटी अंधशाळेत आजोबा त्याला घेउन जातात तेंव्हा त्यांना खेळताना, बागडताना व कौशल्य कामे करताना पाहून एक वेगळीच जाणीव झालेला परशा. एक अविस्मरणिय संध्याकाळ त्याने अनुभवलेली असते.

न सांगता हॉस्पिटलमधून पराशाला घेउन निघून गेल्याबद्दल डॉक्टर साने आजोबांना खडे बोल सुनावतात तेंव्हा ते डॉक्टरांना उत्तर देतात..
‘उद्या सकाळी परशा अंधारात जाइल तेंव्हा काय आठवणी सोबत घेउन जाणार होता..? तो तुमचा हॉस्पिटलचा घाणेरडा वास, वॉर्डमधले पेशंटांच विव्हळणं, रबरी नळ्या, टोचलेल्या सुया..हेच सर्व ?’ त्या प्रश्नाने आपल्याही अंगावर सरसरुन काटा येतो.

म्हणूनच अंधारात जाण्या आधी परशाला ते सर्व दाखवायची त्यांची धडपड परशाला एक अविस्मरणीय दिवस देउन जाते. ते सात वर्षाचं बापडं पोर खूष होउन जातं. डॉक्टर सानेही शेवटी माणूसच हो..आजोबांनी केलं ते त्यांना पटतं व आजोबांची माफी मागून तेही एक वेगळा पर्याय निवडतात व परशाचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी सकाळऐवजी त्याच रात्री करायचा निर्णय घेतात.
ते आजोबांना सांगतात,
‘जे चित्र तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर उभं केलय तेच चित्र घेउन त्याला अंधारात जाउ दे..’

परशाचं ऑपरेशन त्याच रात्री होतं व यशस्वी होतं.

शेवटी परशा आपल्या गावी होडीतून परततानाचा एक लाँग शाॕट आहे.त्याचे आई वाडील, गावकरी व बालमित्र किनाऱ्यावर त्याची वाट पहात उभे असतात. त्याच्या डोळ्यावर काळा गाॕगल आहे. गाव जवळ येताच त्याला त्याच्या आवडत्या पक्षाचा आवाज येतो आणि परशा हसत टाळ्या वाजवतो. सिनेमा संपतो.
खरंतर हा पूर्ण सिनेमा व त्यातल्या प्रत्येक ‘सिन’बद्दल काही लिहावं असं आहे. त्यासाठी एक लेख पुरणार नाहीच. पण हा दोन पर्याय व एक निर्णय असा उन सावल्यांचा खेळ चित्रपटभर आपल्याला दिसत राहतो. माणूस म्हणून आपल्याला अजूनच प्रगल्भ बनवतो.

आता क्रेडीट्स..

सर्वात आधी ही कथा लिहीणा-या माधुरी घारपुरे यांना सलाम. कथेचे बीज इतके मजबूत आहे की त्याने पूर्ण सिनेमा पेलला आहे.

संदिप सावंत यांची पटकथा व दिग्दर्शन अफलातून आहे. हा पूर्ण चित्रपट आधी दिग्दर्शकाच्या मनात आणि मग कॅमे-यावर चित्रीत झाला असणार इतका जबरदस्त जिवंत अनुभव हा सिनेमा देतो.

अरुण नलावडे हा बाप माणूस आहे..त्यांना खरं तर साष्टांग दंडवतच घालायला हवा. विचारे आजोबा अक्षरशः जगलाय हा माणूस. त्यांनी आयुष्यात एवढा एक रोलच केला असता तरी बस्स..आपण त्याला बाप माणूस तरीही मानलं असतंच.

संदीप कुलकर्णी हा कलाकार किती गुणी आहे हे वेगळे सांगणे नलगे. डॉक्टर साने त्यांनी असा उभा केलाय की उद्या पुण्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमधे ते सराइतपणे जाउ फिरु शकतील. कमाल..कमाल..काम आहे त्यांचं.

अश्विन चितळे नावाच्या त्या चिमुरड्याने तर भल्याभल्यांना लाजवणारा अभिनय करुन परशुराम उभा केला होता. तो आता मोठा झाला असेल व एक चांगला कलाकार होईल यात शंका नाही.

आसावरीच्या भुमीकेत अमृता सुभाष सहजपणे वावरलीय. तिची खासियत आहेच..कुठल्याही भुमीकेत ‘जिसमे मिलाओ वैसा’ पाण्यासारखी पूर्ण मिसळून जाते.

भास्कर चदावरकरांचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे..विशेषतः परशा व आजोबांच्या औटींगचे सिन्स दाखवताना ते चार पाच मिनीटे पियानो व ह्वायलीन व नंतर सतारीचा वापर करीत त्यांनी जी सुरावट (symphony) उभी केलीय ती ‘जानलेवा’ आहे..इतकी की तो पूर्ण प्रसंग त्या सिनेमाचा हायलाईट होतो. (पहा खाली दिलेली यू ट्यूब लिंक). शेवटी काही म्हणा, दिग्गज ते दिग्गजच हो.

संजय मनाने यांचे छायाचित्रण व निरज व्होरालिया यांच संकलन इतक दर्जेदार की कुठेही एक फ्रेम इकडची तिकडे वा अनावश्यक वाटत नाही. अरे हे लोक तर बाॕलीवूड काय हॉलीवूडच्या तोडीचे आहेत. फक्त संधी व सुविधा मिळायल्या हव्या.

एखादा चित्रपट एखाद्या फिल्म इंडस्ट्रिचा चेहरा कसा बदलू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे श्वास.

श्वासने काय साध्य केले…तर खूप काही, असंच म्हणाव लागेल.. पन्नासएक लाखाच्या बजेटमधे बनून अडीच कोटीचा व्यवसाय २००४ मधे करणारा… शामची आई नंतर पुन्हा मराठीला सर्वोत्तम चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक व सुवर्णकमळ मिळवून देणारा.. अश्विनलाही उत्कृष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देणारा.. आणि मराठी चित्रपट क्लासेस व मासेस दोन्हीला आवडू शकतो हे दाखवून देत मराठी चित्रपटांसाठी व्यवसायीक यशाची मुहुर्तमेढ रोवणारा.. कारण हा होता..मराठी चित्रपटसृष्टीने परशाबरोबर एक मस्त शिळ घालत घेतलेला ‘एक मोकळा श्वास’..

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..