नवीन लेखन...

क्रिकेटप्रेमीचे संग्रहालय

Shyam Bhatia's Cricket museum at Dubai

स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून एखाद्या खेळाची आवड किंबहुना वेड जपणारे दुर्मिळ असतात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड असलेले असेच एक धुरंधर व्यक्तीमत्त्व म्हणजे दुबईचे पोलाद क्षेत्रातले व्यावसायिक श्याम भाटिया.

क्रिकेटछंद जोपासण्यासाठी त्यांनी दुबईत २०१० मध्ये एक क्रिकेट म्युझियम सुरू केले. त्यात जुन्या काळातील क्रिकेटपटूंबरोबरच आताच्या विराट कोहलीपर्यंतच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट, त्यांची संपूर्ण माहिती, क्रिकेटवरील पुस्तके आणि जवळपास ५०० क्रिकेट व्हीडिओंचा संग्रह आहे. या पाच वर्षांत देशविदेशातील क्रिकेटपटू व क्रिकेटचाहत्यांनी या म्युझियमला भेट देऊन त्यांच्या या संग्रहाचे कौतुक केले आहे.

दोन मजल्यांचे असे हे म्युझियम क्रिकेटप्रेमाचा उत्तम नमुना आहे. भाटिया हे जातीने उपस्थित राहून या म्युझियममागील संकल्पना, त्यांच्या संग्रहामागील भूमिका स्पष्ट करतात. आतापर्यतच्या वर्ल्डकप विजेत्या संघांचे कर्णधार, त्या संघांची कामगिरी, प्रत्येक क्रिकेट बोर्डाचा इतिहास, ठराविक कालावधीतील सर्वोत्तम ठरलेले खेळाडू, प्रत्येक क्रिकेट बोर्डाची बोधचिन्हे, बॅटवर नामांकित खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांची कारकीर्द अशी परिपूर्ण माहिती क्रिकेटचाहत्यांना मिळते. या सगळ्या गोष्टींची मांडणी अतिशय सुरेख केलेली असल्यामुळे या म्युझियमबद्दल सर्वांना आकर्षण वाटते.

विविध क्रिकेट बोर्डांनी त्यांना आपले बोधचिन्ह असलेल्या टोप्या, टाय अशा वस्तु भेट दिलेल्या असताना बीसीसीआयकडून मात्र त्यांनी ती भेट मिळाली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. शेवटी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी या वस्तू त्यांना भेट दिल्या. भाटियांनी त्याची नोंद म्युझियममध्ये घेतली आहे.

विविध बोर्डांचे प्रमुख हे म्युझियम पाहण्यासाठी आलेले आहेत पण एका भारतीय व्यक्तीचे म्युझियम पाहायला बीसीसीआयचे अध्यक्ष येऊ शकले नाहीत, ही वेदना ते व्यक्त करतात. दुबईत खेळायला आलेल्या दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी या म्युझियमला आवर्जून भेट दिली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीही येथे येऊन आपल्या छायाचित्रावर स्वाक्षरी करून गेला आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या अविस्मरणीय कामगिरीची ओळख असलेल्या वस्तू भाटिया यांना भेट दिल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकरचे ग्लव्हजही आहेत.

या म्युझियमच्या बांधणीबरोबरच भाटिया हे गरीब क्रिकेटपटूंना मदत करण्याचे कामही करतात. त्यांना आवश्यक असलेले क्रिकेट साहित्य ते मोफत देतात. पूर्व भारतातील मुलांना त्यांनी ही मदत केली आहे. त्यांनी पोर्ट्रेट ऑफ गेम हे पुस्तकही लिहिले आहे. त्यातून त्यांच्या क्रिकेटप्रेमाची प्रचीती येते. त्याचेही क्रिकेटपटूंनी खूप कौतुक केले आहे.

दुबईला भेट देणाऱ्या क्रिकेट चाहत्यांनी या म्युझियमला आवर्जून भेट द्यावी. जगात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाने अशाच एका म्युझियमची उभारणी करावी आणि आपल्या देशातील
क्रिकेटपटूंचा तसेच क्रिकेट गौरव करावा अशी अपेक्षा यानिमित्ताने करता येईल.

— महेश विचारे, दुबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..