अलका लग्न होऊन सासरी आली आणि वीस वर्षां नंतर नरखेडकरांच्या वाड्यात राहत्या स्त्रीचा प्रवेश झाला. उमेशची आई गेल्या वर त्याच्या वडिलांनी – गावांत त्यांना सगळे भैय्याजी म्हणत – परत लग्न केले नाही. उमेश त्यांचे एकुलते एक अपत्य. अभ्यासात हुशार. अभियांत्रिकीची पदवी घेतली असून सुद्धा नोकरी करण्या ऐवजी गांवात येवून आधुनिक शेती करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याची सुरुवात होते न होते, तेवढ्यात अल्पश्या आजाराने भैय्याजी पण गेले.
एकाकी पडलेल्या उमेशने आपले सगळे लक्ष, सर्व ऊर्जा, शेतीत घातली. पाहता पाहता पाच वर्षे निघून गेली. शेती बऱ्या पैकी स्थिरावली, तसे उमेशच्या नातेवाईकांनी त्याच्या मागे “आता लग्न कर बाबा. घरात गृहलक्ष्मी येऊ दे” असा लकडा लावला. शेवटी हो-ना करीत सोयरीक ठरली, लग्न झाले, आणि जांभुळगांवची अलका नरखेड्याला आली.
***
नरखेडकरांचा वाडा चांगला ऐसपैस होता. चिरेबंदी वाडा. चारी बाजूंनी भिंत. मुख्य दरवाजा ओलांडून आत आल्या आल्या मोठे आंगण. डावीकडे व समोर दोन मजली हवेली. वरून पाहिल्यास इंग्रजी L अक्षराच्या आकाराची. उजवी कडे काही गुदामे, त्यात काही शेतीची अवजारे, आणि बरीचशी अडगळ. काही उपयोगाची पण नाही, आणि टाकवत पण नाही, अशी. उजवीकडच्या मागच्या बाजूला कोप-यात विहीर, व त्या पलीकडे एक दार, वाड्याच्या मागे परसबागेत जाण्या करता.
आणि हो, सिद्दाबाबाची खोली॰
नव-वधूला सगळा वाडा हिंडून नीट दाखविताना उमेश समोरच्या हवेलीत तळमजल्या वरच्या उजवीकडच्या खोली समोर आला, आणि जरा थबकला. येथ पर्यंत पाहिलेल्या सर्व दालनांची दारे तशी उघडीच होती. फार फार तर जरा लोटलेली. पण या खोलीचे दार मात्र बंद होते, अगदी कडी-कुलूप लावून बंद.
उमेशने सांगितले कि या खोलीला सिद्दाबाबाची खोली असे म्हणतात, व येथे स्त्रियांनी कधीही प्रवेश करायचा नाही. तसे पण सिद्दाबाबाच्या खोलीत कोणीच जात नाही. फक्त दर अमावस्येला आत धूप लावायचा असतो. एक विशिष्ट उग्र वासांचा धूप. ते करायावयास सुद्धा कोणी आत जात नाही. दार किंचित उघडून मागच्या वेळी ठेवलेली धूपदाणी बाहेर काढायची, व दुसरी धूपदाणी आता सारायची. आणि हे काम फक्त पुरुषांनीच करायचे आहे.
सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते.
***
साधारण तीस वर्षां पूर्वीची गोष्ट. एक दिवस अचानक एक बैरागी गांवात आला व गांवातल्या मंदिराच्या चबुत-यावर त्याने मुक्काम ठोकला. उंच, कमावलेली शरीरयष्टी, भरघोस दाढी-मिश्या, मानेवर रुळणारे केस, रुद्राक्षांची माळ, आणि काळी पायघोळ कफनी.
त्या काळी साधू-बैराग्यांना गांवात मान असे. गांवक-यांनीच आपण होऊन त्याच्या जेवण-खाण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि त्याच्या गरजा काही फारश्या नव्हत्याच. गांवकरी त्याला काही शिधा, अन्न, वगैरे नेऊन देत असत व जे काही मिळेल त्यावर तो भागवत असे. शरीरधर्मा करता जंगलात, व स्नाना करता नदी किनारी जाणे, हे सोडून इतर वेळी तो मंदिराच्या बाहेर चबुत-यावर डोळे मिटून बसलेला असे.
त्याच्या शेजारी एका मातीच्या भांड्यात धूप कायम लावलेला असे. एक विशिष्ट उग्र वासांचा धूप.
त्याला वनौषधींचे ब-या पैकी ज्ञान असावे, कारण त्याने त्याच्या पोतडीतून काढून दिलेल्या औषधांनी एक-दोन गांवक-यांचे दुर्धर आजार बरे झाले. तेव्हां पासून गावक-यांनी त्याचे नामकरण सिद्दाबाबा असे केले.
भैय्याजींना तर साधू-बैराग्यांचे खूपच अप्रूप होते. आणि वाड्यात जागा भरपूर होतीच. तर, भैय्याजींनी सिद्दाबाबाला वाड्यात येवून राहण्याची विनंती केली, व त्याने पण ती मान्य केली. समोरच्या हवेलीत तळमजल्या वरच्या उजवीकडच्या खोलीत त्याची व्यवस्था करण्यात आली.
असेच काही महिने गेले.
एकदा भैय्याजी व मालकीणबाई त्यांच्या सोय-यांकडे आठवड्याभरा करता गेलेले असताना “ती” घटना घडली. दुपारची वेळ होती. गुरवाच्या आईचा दम्याचा त्रास वाढला म्हणून गुरवाने औषध आणण्या करता त्याच्या मुलीला सिद्दाबाबा कडे पाठविले.
बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही, तेव्हां गुरव स्वता: तिला बघायला वाड्यावर आला. मालक व मालकीण दोघेही बाहेरगावी असल्याने वाड्यात तशी सामासूमच होती. सिद्दाबाबाच्या खोलीचे दार आतून बंद होते. बराच वेळ दार वाजवून पण सिद्दाबाबा दार उघडेना, तेव्हां मात्र गुरवाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्याने चार-पाच माणसे जमविली. पुन्हा एकदा सर्वांनी बराच वेळ दार ठोठावले, ओरडा केला. पण सिद्दाबाबा दार उघडेना. माग मात्र मंडळींनी दार फोडण्याची तयारी केली. पण ते जुन्या जमान्याचे शिसवी लाकडाचे भारी भक्कम दार. ते फोडायला बराच वेळ लागला. शेवटी एकदाचे दार उघडले. आणि, . . .
आत सिद्दाबाबा आणि गुरवाची कन्या, दोघेही जमीनी वर पडलेले होते. निष्प्राण. मुलीचे कपडे फाटलेले होते. शरीरावर अनेक ठिकाणी बोचकारल्याच्या, झटापट झाल्याच्या खुणा होत्या. डोळे, जीभ बाहेर आलेली होती. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती.
आणि, सिद्दाबाबा. त्याच्या अंगात अजून धुगधुगी होती. पण तोंडातून फेस आलेला होता, डोळे विस्फारलेले होते. आणि त्याच्या पोतडीतील वनस्पती जमीनीवर विखुरलेल्या होत्या. दारा वर धक्के सुरू झाले तेव्हां बहुतेक त्याने काही तरी विषारी वनस्पती प्राशन केली असावी.
संतापलेल्या लोकांनी त्याला त्या अवस्थेत पण बेदम मारहाण केली, व त्यातच त्याचा अंत झाला. पण गुरवाला मात्र असे वाटले, की शेवटच्या क्षणी त्याच्या चेहे-या वर एक कुत्सित हास्य होते. असो. आता करण्या सारखे काहीच उरले नव्हते. सुन्न गांवक-यांनी त्याच्या पार्थिव देहाला जंगलात नेऊन जाळून टाकले, कोणतेही विधी न करता, केवळ एक कर्तव्य म्हणून.
***
भैय्याजींना ताबडतोब परत या म्हणून निरोप गेला, व या घटनेच्या साधारण चार दिवसा नंतर ते परतले. वाड्या वर आल्या वर त्यांनी सिद्दाबाबाच्या खोलीचे दार उघडले, तशी उपस्थित सर्वांना एक भयानक दुर्गंधी जाणविली. माणूस मेल्या वर त्याचे शरीर सडले, कुजले तर काही दिवसां नंतर येते, तशी. अशी दुर्गंधी येण्याचे काहीही कारण नव्हते. सिद्दाबाबा व गुरवाची कन्या, या दोघांचा अंत याच खोलीत झाला होता. पण दोघांची मृत शरीरे त्या खोलीत तासा भरा पेक्षा जास्त वेळ नव्हती. तरीही ती भयानक दुर्गंधी मात्र होती.
आश्चर्य म्हणजे दुर्गंधी खोलीच्या बाहेर जाणवत नव्हती. फक्त खोलीच्या आतच. हे काय गौडबंगाल आहे, हे कोणालाच कळेना. पुढच्या तीन दिवसांत भैय्याजींनी खोली संपूर्ण धुवून घेतली, दोन वेळा. तरी पण त्या खोलीतला मानवी शरीर कुजल्याचा वास काही केल्या जाईना. सर्वांच्याच लक्षात आले की हा काहीतरी “वेगळाच” प्रकार आहे.
शेवटी गांवातल्या मांत्रिकाला बोलावणे धाडण्यात आले. काय झाले आहे त्याचा मांत्रिकाला अंदाज आला. मांत्रिकाने सांगितले की, “तो” अजून येथून गेलेला नाही. या खोलीतच आहे. पण त्याला बाहेर काढणे माझ्या शक्तीच्या पलीकडचे आहे. मी फक्त येवढेच करू शकतो की “त्या”ला खोलीत बंदिस्त करून तो कोणाला काही अपाय करणार नाही याची व्यवस्था करतो.
मांत्रिकाने काही विधी केले, व दोन नियम सांगितले. पहिला, त्या खोलीत स्त्रीने कधीही आत जायचे नाही. आणि दुसरा, अमावस्येला संध्याकाळी त्या खोलीत धूप लावायचा. मात्र पुरुषानेच. एरवी खोली बंद ठेवायची. तेव्हां पासून हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले आहेत. पण तीस वर्षे झाली तरी त्या खोलीत मानवी शरीर कुजल्याची दुर्गंधी होती तशीच आहे.”
***
आज अमावस्या होती. अलका सासरी आल्या नंतरची पहिली अमावस्या. अंधार पडायला लागला होता. अचानक अलकाला सिद्दाबाबाच्या खोलीतून काही तरी धप्प असा आवाज ऐकू आला. काय आवाज असेल? आत जायचे नाही, पण दाराच्या फटीला डोळा लावून आत बघायला हरकत नसावी असा विचार करून ती दारा जवळ आली.
दाराला कडी कुलूप लावलेले होते. पण एका अज्ञात शक्तीने तिचा ताबा घेतला होता. अलकाने कोनाड्यातली किल्ली घेतली, कुलूप उघडले, कडी काढली, व हलकेच दार उघडले. दिवेलागणी झालेली होते. आणि सिद्दाबाबाच्या खोलीत दिवा नव्हताच. तरी पण अलकाला आत एक मंदसा प्रकाश जाणवला. उंबरठा ओलांडून अलका आत गेली.
पण आत तिला कोणताही घाण वास जाणवला नाही. उलट खोलीत धूपाचाच वास भरलेला होता. उग्र, पण धूपाचा वास. आश्चर्य म्हणजे खोली अगदी स्वच्छ होती, कुठे धुळीचा एक कण नाही. तीस वर्षे कोणी खोलीत साफा-सफाई केली नाही, तरी खोली स्वच्छ कशी ? आणि हे काय ? पलीकडच्या भिंतीत पण एक दार होते. अगदी अलीकडच्या बाजूला होते तसेच.
म्हणजे या खोलीतून थेट मागे परसबागेत जाता येते तर. पण आपण तर अनेकदा परसबागेत गेलो आहोत. आपल्याला बाहेरच्या बाजूने हे दार कसे दिसले नाही? असो. तर आता समोरच्या दारातून बाहेर परसबागेत जाऊया, आणि मागच्या विहीरीकडच्या दारातून परत वाड्यात येऊया, असा विचार करून अलका पलीकडच्या दारा जवळ गेली, व दार उघडून बाहेर पडली.
***
पण समोर परसबाग नव्हती. फक्त एक विस्तीर्ण खडकाळ परिसर होता. आणि जवळच एका शिळेवर तो बसला होता. उंच, कमावलेली शरीरयष्टी, भरघोस दाढी-मिश्या, मानेवर रुळणारे केस, रुद्राक्षांची माळ, आणि काळी पायघोळ कफनी. सिद्दाबाबाच हा. तिने वर्णन ऐकले होते, अगदी तसाच. तसूभर पण फरक नाही. पण हा इथे कसा?
तेवढ्यात सिद्दाबाबाचा आवाज तिच्या कानांवर पडला. “ये. फार वाट पाहायला लावलीस.”
आणि अलकाला एकदम आकलन झाले कि आपण “त्या” खोलीत येवून फार मोठी चूक केली. भयंकर चूक. तातडीने आल्या पावली परत जाण्या करता ती मागे वळली. . . .
पण मागे दार नव्हते, परसबाग नव्हती. वाडा पण नव्हता, गांव पण नव्हते. काहीच नव्हते. चहूंबाजूला क्षितिजा पर्यंत फक्त खडकाळ माळरानच होते.
***
उमेश शेतावरून परत आला, आणि अलकाला शोधून शोधून थकला. कुठे जाऊन बसली आहे ही? आणि हे काय? सिद्दाबाबाच्या खोलीचे दार किंचित उघडे कसे? पण त्याची एकट्याने आत जायची हिम्मत होईना. त्याने दोन-तीन नोकर माणसांना बोलाविले. कोणी तरी टॉर्च आणला, व सर्व जण आत गेले. तब्बल तीस वर्षां नंतर कोणी तरी त्या खोलीत प्रवेश करीत होते.
खोलीत अलका नव्हती. पण जमीनीवर वर्षानुवर्षे साचलेल्या धुळीच्या थरात एका स्त्रीच्या पाऊलांचे ठसे स्पष्ट दिसत होते, पलीकडच्या भिंती पर्यंत. पण परत आल्याचे ठसे मात्र नव्हते.
हे काय भलतेच? अलका चालत पलीकडच्या भिंती पर्यंत गेली, पण पुढे कुठे गेली? खोलीला दार तर एकच होते. हे केवळ आकलनाच्याच नव्हे, तर विचार शक्तीच्या पण पलीकडचे होते. सुन्न अवस्थेत सर्व जण बाहेर आले.
अलका त्या खोलीत गेली, खोली ओलांडून समोरच्या भिंती पर्यंत गेली, पण पुढे कुठे गेली ते कळेना. पण जमीनीवरच्या धुळीतल्या पाउलांच्या एकमार्गी ठश्यां वरून येवढे मात्र अगदी स्पष्ट होते की ती परत माघारी आली नाही.
एक अनामिक भीती मनात कुठे तरी वर येऊ लागली होती. कोणालाच काहीच सुचेना. शेवटी परत एकदा मांत्रिकाला बोलावणे धाडण्यात आले.
मांत्रिक तोच होता, पण आता वयोवृद्ध झाला होता. त्याच बरोबर त्याच्या अनुभवात पण बरीच भर पडली होती. मांत्रिकाची नजर जे काय दृष्य त्याच्या पलिकडे बघणारी होती. क्षणभर तो डोळे मिटून स्वस्थ उभा राहिला, आणि काय घडले त्याला स्पष्ट दिसले. पण प्रश्न हा होता कि ते सांगायचे कसे. शेवटी, त्याने हिम्मत करून विचारले – “मंडळी तुमच्या लक्षात आले आहे का, कि या खोलीत तीस वर्षांपासून असलेला कुजलेल्या मानवी शरीराचा वास गेला आहे?”.
“म्हणजे?”
“होय धाकटे मालक. तो इथेच होता. तीस वर्षे. वाट पहात होता. त्याला जे हवे होते ते आज त्याला मिळाले. आता तो इथे नाही.”
मांत्रिक काय म्हणाला त्याचा अर्थ उमेशला नीट कळला असे नव्हे, पण त्याला साधारण अंदाज आला की काही तरी भयानक, काही तरी अघटित घडले आहे. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. म्हणजे त्याची नवविवाहित पत्नी, त्याची अलका, मेली नव्हती. पण ती जिवंत पण नव्हती. ती सिद्दाबाबाच्या तावडीत . . . आणि तो तिला, . . . तिला, . . आणि . . याला शेवट नाही. अनंत काळा पर्यंत हे असेच . . .
उमेशला दरदरून घाम सुटला. त्याच्या हाता पायातली शक्तीच गेली॰ श्वास कोंडल्या सारखा झाला. त्याला वाटले खच्चून किंचाळावे. पण घशातून आवाजच उमटेना. डोळे विस्फारून तो मांत्रिका कडे पहात राहिला.
अमावस्येच्या रात्री स्मशानात बिनधास हिंडणारा मांत्रिक, पण आज तो सुद्धा हादरला होता. उमेशच्या नजरेला नजर भिडविण्याची त्याची हिम्मत होईना. कसेबसे तो फक्त येवढेच पुटपुटला “मंडळी, आता या खोलीत कोणालाच काहीच धोका नाही. आज पासून इथे धूप लावण्याची पण गरज नाही.”
— चेतन पंडित
It’s not really my cup of tea.