भिकारी म्हटल्यावर एक चिंध्या नेसलेली, अंगीवर मळाची पुटं चढलेली, अंगाला वास मारणारी, अपंगत्व असेल तर ते मिरवणारी, राठ वाढलेल्या केसांच्या जटा मिरवणारी, ओंगळवाणी अशा व्यक्ती चटकन नजरेसमोर उभी राहाते आणि मग आपल्याही नकळत अंग चोरले जाते. ‘भिकारी’ हा शब्द कुणीही उच्चारला, तरी बऱ्याचदा आपली प्रतिक्षिप्त क्रिया अशीच असते. हल्ली या भिकाऱ्यांत आणखी एक गोष्ट ठळकपणे दिसून येते, ती म्हणजे त्यांच्या कडेवर त्यांच्यासारखंच एखादं कळकट, परंतू कुतुहलानं भरलेल्या, हसऱ्या-खेळत्या डोळ्यांचं लहान मुल..! अर्थात पूर्वीसारखं भिक मागणं ही मजबूरी उरलेली नसून आता तो त्यातील काहीजणांचा व्यवसायही झालेला आहे. आणि कोणताही व्यवसाय म्हटला, की भांडवल हे आलंच. भिक मागायच्या व्यवसायात, कडेवर बागडतं लहान मुल असण्यासारखं अन्य ‘खेळतं’ भांडवल कोणतं हो असणार..!!
खरं तर मला भिक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतू ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भिकच असली तरी, प्रसंगानुरून वेगवेगळी भारदस्त नांवंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भिक’ आणि ‘भिक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे. कारण मला जे सांगावसं वाटतंय, ते कोणत्याही गोड शब्दाच्या कोटींगचा आश्रय न घेता सरळ सरळ भिकच मागणाऱ्या, परंतू भिकाऱ्याविषयीच्या आपल्या पारंपारीक कल्पनांना उभा छेद देणाऱ्या भिकारी व्यक्तीविषयी आहे.
आमच्या बोरीवली स्थानकाच्या पश्चिम दिशेच्या विरार एन्डला जी तिकिट खिडकी आहे ना, तिच्या बाहेरच्या बाजुला एक बाई, तिला कुणी काही भिक देतंय का, याची वाट पाहात पाहात बसलेली असते. तिथून नेहेमी येणारा-जाणारांनी तिला पाहिलंही असेल. आता तुम्ही म्हणाल, की त्यात काय नविन सांगताय, असे कितीतरी लोक, मुंबैतच कशाला, तर देशभरच्या सर्वच रेल्वे किंवा बस स्थानकांच्या बाहेर लोकांकडून पैसे मागत असताना ढिगाने दिसतात. पण नाही, ही बाई, जरी भिक मागत बसलेली असली तरी, त्या अर्थाने ती मला भिकारी वाटतच नाही. मी त्या बाईला गेली पाच-सहा वर्ष तरी त्याच जागेवर बघतोय. नुसता जाता-येता पाहात नाही, तर नीट निरखून पाहातो. पण ती कोणत्याही ॲंगलने भिकारी वाटत नाही. बरं ही बाई नुसती भिकारी नाही, तर कुष्ठरोगाने ग्रासलेली आहे. हातापायाची बोटं, नाक बरचसं झडून गेलंय. पाचेक वर्षांपूर्वी पाहिलेली तिची शारिरीक परिस्थिती आणि आताची तिची शारिरिक परिस्थिती आणखी बिघडलीय. तिच्या हातापाची बोटं आणि नाक जरा जास्तच झडलंय.
तिने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मला तिच्यावर लिहावसं वाटलं, ते यामुळे की भिक मागणारांच्या अंगा-चेहेऱ्यावर जो एक अंगभूत ओंगळपणा असतो, तो या बाईच्यात शोधुनही सापडत नाही. कुष्ठरोगी असुनही, चेहेरा, हातपाय विद्रुप झालेले असुनही ती त्याचं कधीही भांडवल करताना दिसत नाही. चेहेऱ्यावर लाचारी नाही, की लाचारीने कुणाकडून काही मागणं नाही. तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इतक्या परिस्थितही ती असते मात्र अत्यंत निटनेटकी. नेसुची साडी जुनेऱ्यापैकीच, परंतू ती ही अत्यंत टापटीपीने नेसलेली. पदर व्यवस्थित खोचलेला. कपाळावर कुंकवाच्या जागी गोंदल्याची हिरवट खुण. पूर्वी हातात काकणंही दिसायची, परंतू आता चुड्यांचा धनी सोडाच, कासारही बांगड्या भरण्यास धजत नसावा म्हणून कदाचित भुंडा हात. भिक मागण्यासाठी पसरलेलं वर्तमानपत्रही निटनेटकं अर्धी घडी घातलेलं. सोबत एक मोठी, स्वच्छ पिशवी. ही पिशवी म्हणजे कदाचित तिचा अख्खा संसारच असावा बहुतेक. भिक मागण्याची पाळी तिच्यावर यावी याचं दु:ख कदाचित तिला होत असेलही, परंतू चेहेऱ्यावर ते मला कधी दिसलेलं नाही. जे नशिबी आलंय, ते स्विकारल्याची भावना तिच्या विद्रुप चेहेऱ्यावर मला नेहेमी दिसत आलीय. तिच्या मनात दु:ख असणं सहाजिकच आहे मात्र तिचा चेहेरा दु:खी-कष्टी मात्र कधीही दिसलेला नाही. म्हणूनच कदाचित तिच्या विद्रुप चेहेऱ्याने माझं लक्ष वेधून घेतलं असावं आणि म्हणून मला तिच्यावर लिहावसं वाटलं असावं की काय कोण जाणे..! तिच्याशी बोलावसं वाटत असुनही मी अद्याप तिच्याशी बोलायचं धाडस केलेलं नाही.
बाई बऱ्या घरची असावी, परंतू कुष्ठरोग झाल्यामुळे घरच्यांनी तिला बाहेर काढलं, असंही घडलं असावं. परंतू मला मात्र तिच्याकडून बरच काही शिकावंस वाटलं. इतक्या विपरित परिस्थितीत, भविष्य केवळ आणि केवळ आणखी जास्त अंध:कारमय होत जाणार हे माहित असूनही प्रसन्न राहाणं मला नेहेमी अचंबित करतं. असं जगण्यासाठी तिला अशी कोणती सिद्धी प्राप्त झालीय
कुणास ठाऊक..!
आणि आपण मात्र परिस्थितीत थोडा उतार-चढाव आला की कोण घाबरून जातो. आपलं सर्व सेट झालेलं शेड्युल पार विस्कटून जातं. त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावरही होतो. साफ गळून जातो आपण. आपल्या परिस्थितीत पडलेला फरक तात्पुरता आहे, आपली माणसं साथीला आहेत आणि भविष्यात चांगलं होईल हे माहित असुनही आपण त्यावेळेला मात्र ‘आता सर्व संपलं’ अशा भावनेने लांब चेहेरा करून वावरत असतो..
मला वाटतं, प्राप्त परिस्थिती स्विकारून त्याप्रमाणे वागावं, मग त्रास होत नाही आणि मग मनात त्रागा होत असला तरी चेहेरा हसरा ठेऊन परिस्थितीषी सामना करता येतो. हेच ती बाई तिच्या नकळत सांगत असावी. त्या बाईची परिस्थिती आणखीनच बिघडणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तिच्या आयुष्यात नेहेमीच शिशिर असणार आहे, परंतू आपल्या आयुष्यात कधीतरी नक्की बहर येणार आहे हे माहित असलेल्या आपल्याला, परिस्थितीशी दोन हात करताना, दु:ख मनात ठेवून आणि हास्य चेहेऱ्यावर ठेवून आपल्या वाटेला आलेला मोसमी शिशिर साजरा करायला काय हरकत आहे..
तिला ‘जगावं कसं’ या मंत्राची हिच सिद्धी प्राप्त झाली असावी, जी आपल्यालाही सहज प्राप्य आहे..
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply