(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ मंजिरी दांडेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)
ही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील २१ सिद्धीविनायक यात्रेला जाण्याचा योग आला. औरंगाबादहून नागपूरच्या रस्त्याला लागलो. मध्ये यवतमाळच्या अलीकडे जानक एक आठ- नऊ वर्षांचा मुलगा सारखा आमच्या मागून धावत येत होता. धावताना काही खाणाखुणा करीत होता. शेवटी आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवून विचारले की काय झाले? त्यावर तो उत्तरला, काका, तुमच्या गाडीच्या मागच्या भागात काहीतरी तुटले आहे. मी पाहिले म्हणून तुम्हाला थांबा असे सांगत होतो. ड्रायव्हर खाली उतरला आणि त्याने पाहिले तर काय? गाडीचा पाटा तुटला होता. आम्ही त्या मुलाचे आभार मानण्यासाठी पाहू लागलो तर तो कुठे दिसला नाही. मनोमन गणपतीचे स्मरण केले.
गाडी यवतमाळच्या डेपोत नेली. तेथे दुरूस्त करून पुढे निघालो. नागपूरला पोहोचेपर्यंत दीड-दोन वाजले. आमची उतरण्याची सोय रेशीमबाग येथे केली होती. तिथल्या कार्यकर्त्यांशी सारखा संपर्क होत होता. पण रस्ता समजत नव्हता. जाणा-या अनेक लोकांना विनंती करून झाली. पण कोणी थांबायला तयार नव्हते. शेवटी एक दुचाकीस्वार थांबला. त्याने चौकशी केली. त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, माझ्या मागून या. त्याप्रमाणे त्या कार्यालयाच्यापाशी येताच त्याने मोठे दार उघडून दिले. बस आत गेली. आमचे संयोजक त्या व्यक्तीचे आभार मानण्यासाठी खाली उतरले तर पण ती व्यक्ती काही दिसेना. तिथे चौकशी केली पण त्या व्यक्तीला पाहिल्याचे कोणी सांगेना. परत एकदा गणपतीचे स्मरण केले आणि कार्यालयात गेलो.
सिद्धीविनायक यात्रा करताना प्रवासातील इतरही धार्मिक क्षेत्रे पाहिली. एक प्रसंग असा आहे की आम्ही शेगांव येथे श्री गजानन महाराज संस्थान येथे दर्शनासाठी गेलो. तेथे महाप्रसादाच्यावेळी पाहिले तर खूप गर्दी होती. प्रसाद घेऊन पुढचा पल्ला गाठणे अशक्य असल्यामुळे लगेच निघालो. वाटेत एका धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो. तेथे त्या धाब्यावरच्या एका गृहस्थाने चौकशी केली. शेगांवला प्रसाद घेतला का असा प्रश्न विचारला. आम्ही नाही म्हणताच तो म्हणाला, मग आता पुढे जाऊ नका. कारण प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आता एक करा इथेच पुढे एरंडोल येथे गणपती स्थान आहे. तेथे धर्मशाळेत राहा आणि पुढे जा. त्याचे ऐकून आम्ही त्या देवळात गेलो. बाजूलाच धर्मशाळा होती. बांधकाम चालू होते. दरवाजे, खिडक्यांच्या फक्त चौकटी होत्या. जवळ दिवाळीचे जिन्नस होते तेही संपत आले होते. जेवणाची किमान आमटी भाताची सोय होईल का म्हणून चौकशी केली. तेव्हा तिथे काही स्त्रिया आल्या. त्यांनी पिठले भात करून देतो असे सांगितले आणि कामालाही लागल्या. मग आम्ही आजूबाजूच्या झाडांची मोठी पाने काढून पत्रावळी केल्या. जेवणाची तयारी होईपर्यंत आमच्याबरोबरच्या गुरूजींनी १६ संस्कारांबद्दल माहिती दिली. जेवायला बसलो आणि त्या धाब्यावरच्या माणसाचे बोलणे आठवले. शेगावचा प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही ह्या हद्दीच्याबाहेर जाऊ शकत नाही. अगदी तसेच झाले. पिठले भातावर ताव मारला आणि शांतपणे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
– मंजिरी दांडेकर
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply