जन्म. ३० मे १९१५ बांदे सावंतवाडी संस्थान येथे.
अप्पा गोवेकर यांचे शिक्षण बांदा येथेच झाले. १९३० ते मिडल स्कूल, बांदा येथून प्राथमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९२८ साली सावंतवाडी संस्थानच्या आंतरशालेय क्रीडास्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पाच मैल धावस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पटकावले. १९३० साली या गटात सर्वोच्च बहुमान प्राप्त केला.
त्यांचे वडील नारायणराव गोवेकर हे बांदा मिडल स्कूलचे मुख्याध्यापक होते.त्यांचे १नोव्हेबर १९२८ रोजी आकस्मिक निधन झाले आणि गोवेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. पण मोठ्या जिद्दीने हे कुटुंब सावरले.
१९३० ते १९३३ या काळात ओटवणे, सातोसे, होडावडे या ठिकाणच्या प्राथमिक शाळात रजेवरील शिक्षकांचे जागी अंश- कालिक’ शिक्षक म्हणून अप्पा काम करू लागले.
याच काळात पत्रादेवी येथील दारूदुकानांवरील यशस्वी आंदोलन, त्याचप्रमाणे प्रभातफेऱ्या, हरिजन शिक्षण यामध्ये प्रामुख्याने भाग ते घेऊ लागले. १९३४ मध्ये सावंतवाडी मोती तलावात झालेल्या पहिल्याच पोहोण्याच्या शर्यतीत पहिला नंबर मिळवून त्यांनी विक्रम केला. त्यापूर्वी १९३३ मध्ये शिक्षक म्हणून बांदा येथील मिडल स्कूलमध्ये नेमणूकही झाली होती. त्यानंतर १९३५ ते १९४३ या कालखंडात डेगवे, निगुडे, उगाडे, कोनाळ व आरोस या गांवी खात्यातर्फे बदल्या झाल्या, पण अप्पानी शिक्षक म्हणून आपली भूमिका उत्तम प्रकारे निभावली.
१९४० साली एक पोस्टकार्डवर एका बाजूने ६००० शब्द लिहून केलेला सूक्ष्म हस्ताक्षराचा जागतिक विक्रम त्यांनी केला होता.’ सुंदर हस्ताक्षर कसे बनवाल ?’
यावर ते अधिक विचार करू लागले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु लागले. एक माहिती पत्रक त्यांनी तयार केले होते आपले व्याख्यान संपले की ते विद्यार्थ्यांना वाटत असत.
हस्ताक्षरमहर्षी अप्पानी पाठवलेली सुंदर सूक्ष्म हस्ताक्षरांतील सुमारे २० पोस्टकार्डे लळीत यांच्या कडे आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक पोस्ट खात्याला ‘चकवा’ देऊन छापील समजून ‘नाॕटपेड ‘झाले. तेव्हा अप्पानी त्यांना सांगितले होते. ‘अरे पत्र आले तर दंड भरून लगेचच घे.’
१९४३ साली उजळ माथ्याने सामाजिक व राजकीय आंदोलनांत भाग घेता यावा हेतूने शिक्षण खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन सावंतवाडीला आले. काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पोकळे-विडी कारखान्यात मुनीम म्हणून नोकरी ते करु लागले.१९४५ मध्ये सावंतवाडी शहरातील मलेरियाच्या उपसर्गाने सेवानिवृत्ती स्वीकारून स्वग्रामी बांदे येथे पुन्हा गेले. बांदा येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून १९४७ पर्यंत स्वार यांचेकडे मुनीम म्हणून नोकरी सुरू केली.
१९४७ च्या ऑक्टोबरच्या सुमारास आबासाहेब वालावलकर यांच्या निमंत्रणावरून पुन्हा सावंतवाडी येथे ते आले व सावंतवाडी ‘प्रजा परिषदे’चे चिटणीस म्हणून सुमारे ६ महिने सवेतन सेवा केली. फेब्रुवारी १९४८ सावंतवाडी संस्थान-विलीनीकरण आंदोलनात सहभागी झाले.
अप्पानी एक निवडणूकही लढवली कारण ती बिनविरोध होणार होती. अर्थात ते निवडणूक हरले, पण त्यांनी सायकलवर फिरून प्रचार केला..’लोकशाही जीवंत ठेवली’ म्हणून बॕ. नाथ पै म्हणाले,’पराभवाला प्रतिष्ठा मिळवून दिलीत अप्पा .!
अप्पानी १९४८ ते १९५३ या काळात सुमारे सहा वर्षे साप्ताहिक वैनतेय’ कचेरीत व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. या काळातच व पुढे १९७८ पर्यंत दै.लोकसत्ता, लोकमान्य, सकाळ अशा दैनिक वृत्तपत्रांसाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. मध्यंतरी सुमारे २॥ वर्षे सावंतवाडी येथील खादी भांडाराचे कार्यवाह म्हणून विनावेतन सेवा त्यांनी केली.
सा. ‘वैनतेय कचेरीतून सेवानिवृत्तीनंतर कुटुंब निर्वाहाचे दृष्टीने वार्ताहर, विविध प्रकारचे लिहिण्याचे काम, रबरीशिक्के, छपाईकामे यांची ते करु लागले.
१९३५ ते १९५१ या काळातच दोन नाटके, १५-२० कथा. ५०-६० शिशुगीते यांची निर्मिती. हौशी कलावंतांच्या सहाय्याने बांदा व सावंतवाडी येथे नाट्यप्रयोगात २५-३० भूमिका व काही प्रयोगांचे दिग्दर्शन, ‘मदिरा’ या विमल घैसास लिखित नाटकाचे प्रयोग केले.’दारूबंदी प्रचारकार्य ‘म्हणून दोडामार्ग ते कणकवलीपर्यंत अनेक प्रयोग त्यांनी सादर केले.
१९७५ मध्ये दापोली कॉलेजचे प्राचार्य माननीय चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून’ हस्ताक्षर महर्षी’ हा बहुमान त्यांना देण्यात आला. १९७२ मध्ये मुंबई येथे हस्ताक्षर सुधार मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. जी आजही चालू आहे.
१९९०-९१ पर्यत मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली, बेळगांव या शहरांतून, त्याच प्रमाणे गोमंतक ते रत्नागिरीपर्यंत अनेक माध्यमिक विद्यालये व अध्यापक महाविद्यालये यामधून ७००च्या वर हस्ताक्षर सुधार मोहिमेची व्याख्याने त्यांनी दिली.
१९७८ मध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सत्कार काही तात्त्विक कारणांमुळे स्वीकारला नाही.
अप्पासाहेब गोवेकर यांनी लिहिलेल्या कथा.. कविता व अन्य लेखन यावर डाॕ. जी. ए. बुबा यांनी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. चिऊमाऊ, जादुची पेटी-रेडियो अशी गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या अनेक गीतांचे संकलन झालेले नाही. बालसन्मित्र,आदर्श ,वैनतेय,किरात अशा अनेक साप्ताहिकांतून त्यांच्या पंधराच्या वर कथा प्रकाशित झाल्या आहेत. म्हटले तर सहज उपलब्ध होतील. त्यांचा कथासंग्रह प्रकाशित व्हायला हवा. ‘बंड्याचे लग्न ‘ही त्यांची कथा वाचली की आजही ताजेतवाने वाटते. ‘आसुरी आकांक्षा ‘ या त्यांच्या नाटकाची संहिता प्रकाशित केली तर कोकणातील हौशी नाट्य मंडळे त्याचे आजही प्रयोग करतील. त्यांचे साहित्य संकलन होऊन प्रसिद्ध व्हायला हवे अशी इच्छा जी.ए. बुवा सरांसारखे साक्षेपी समीक्षक व्यक्त करतात; त्या अर्थी ते लेखन नक्कीच लक्षवेधी असणार यात मला तरी शंका वाटत नाही.
‘ मनस्वी’ व अक्षरप्रपंच’ ही पुस्तके विकास गोवेकर यांनी प्रकाशित केली.
अप्पासाहेब गोवेकर यांचे २३ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले. अप्पांनी सुरू केलेली ‘हस्ताक्षर सुधार मोहिम’ आजही सुरु आहे. त्यांचे चिरंजीव विकास गोवेकर ती चालवतात व दरवर्षी अप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा व अन्य उपक्रम करतात त्यात प्रकाश,उल्हास व अन्य नातेवाईक (बिले, भिसे ,टोपले,पावसकर इ.) सहभागी होतात.
— डॉ.बाळकृष्ण लळीत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply