गिटारवादक, अभिनेता आणि ‘किंग ऑफ द रॉक अँड रोल’ एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला.
कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून ‘ऑडिशन’ दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती.
दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. ‘आर्थर कृडूप’चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा ‘रेडिओ’वर वाजवलं जाताच लोकांनी ‘रेडिओ स्टेशन’वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र ‘ब्लूज-गोस्पेल’ ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना.
रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे ‘रॉक एन रोल’ अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता ‘द किंग’ या नावाने नंतर ओळखला गेलेला ‘एल्व्हिस प्रेस्ले’ आणि ते गाणं होतं “That’s All Right, Mama”. १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी ‘एल्व्हीस’चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता.
आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट ‘प्रिसिला बिलिव’शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला.
‘एल्व्हिस’ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या ‘रॉक एण्ड रोल’ संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे ‘एल्व्हिस’ स्टाईलचंच आहे. मूळ ‘जॉर्ज वाईस’, ‘ह्युगो पेरेत्ती’ आणि ‘लुइगी क्रियेटर’ यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली ‘एल्विस’ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला ‘एल्विस’चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा.
‘एल्विस’ यांचे एक गाणं आहे, “Jailhouse Rock”. ‘जेरी लिबर’ आणि ‘माईक स्टोलर’ यांनी लिहिलेलं हे परफेक्ट ‘रॉक एन रोल’ गाणं ‘एल्विस’ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. ‘लष्करी सेवेनंतर ‘एल्व्हिस’ यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं.
संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘द किंग’ एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
Leave a Reply