जयपुर-अतरौली घराण्याच्या गायिका नंदिनी बेडेकर यांचा जन्म १४ नोव्हेंबर रोजी झाला.
नंदिनी बेडेकर या विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. त्यामुळे दुर्गेचेच एक रूप असलेल्या सरस्वतीचा स्पर्श त्यांच्या कलेला लाभला आहे.
नंदिनी बेडेकर या माहेरच्या नंदिनी पणशीकर. नंदिनी यांना लहानपणापासूनच रेडिओवर गाणी ऐकायची आणि त्याचं अनुकरण करत गुणगुणायची आवड होती. ही आवड त्यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक दाजी पणशीकर यांनी हेरली आणि वयाच्या १६ व्या वर्षांपासूनच गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे त्यांना शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. गुरुपरंपरेनुसार किशोरी आमोणकर यांच्या घरी राहून नंदिनी यांची गायनाचे धडे गिरवायला सुरुवात झाली. सकाळी उठल्यानंतर साधारण ११-१२ वाजेपर्यंत रियाझ त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ५ वाजता अन्य शिष्यमंडळीबरोबर रियाज आणि मग रात्री १२ वाजल्यापासून पहाटे साधारण ३ वाजेपर्यंत किशिरीताईंच्या अभ्यासाचा विषय असलेल्या रससिद्धांताचा अभ्यास; असा काहीसा त्यांचा दिनक्रम असायचा. जोपर्यंत एक तुकडा गळ्यात येत नाही तोपर्यंत पुढे गायचंच नाही हे किशोरीताईंचं तत्व होतं. त्या एकेक स्वर पक्का करून घेत. १९९३ ला त्यांचा विवाह झाल्यानंतरही त्या त्यांच्या घरी जाऊन संगीत शिकत होते ती अखेरपर्यंत.
गुरु बिन कौन बाट बतायें। गुरु बिन कौन चाल सिखाये। या शास्त्रीय संगीतातील एका चीजेच्या शब्दानुसार गुरु हाच आपल्याला योग्य वाट दाखवतो आणि आपल्या स्वरांना वळण लावण्यास मदत करतो. याचे कारण हे देखील आहे की,शास्त्रीय संगीत ही गुरुमुखी विद्या असल्यामुळे चांगला गुरु मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
गुरु कष्ट घ्यायला तयार असेल आणि शिष्याने सुद्धा कष्ट घेण्याची तयारी दाखवली तरच शास्त्रीय संगीत गायनाला महत्व आहे. गाणं शिकत असताना इतका चांगला गुरु लाभला हे माझं भाग्यच. गुरूचा सूर आणि शिष्याचा सूर जेव्हा एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात होते तेव्हाच खरं गाणं खुलत जातं असं नंदिनी ताई म्हणतात.
मुळात शास्त्रीय संगीताचं ध्येय हेच आहे की, ते ऐकताना मनाला शांती मिळायला हवी. त्यामुळे गाण्याचा दृष्टिकोन हा बरोबर असला तरच ही मनःशांती गायकाला आणि श्रोत्यांना देखील मिळू शकेल. आणि गाण्याचा हा दृष्टिकोन गुरूच देऊ शकतो, गुरु तुम्हाला भरकण्यापासून वाचवतो. शिष्याला जर कलेचा अहंकार असेल तर तो काढायला गुरु मदत करतो. त्याप्रमाणे आता जे काही आहे ते किशोरी ताईंनी माझ्यावर घेतलेल्या मेहेनतीचा परिणाम आहे, आयुष्यातला प्रत्येक क्षण किशोरीताईंनी सत्कारणी लावला असं त्या सांगतात.
नंदिनी बेडेकर या सध्या ठाण्यात आपल्या संगीतातील ठेवीचा त्यांच्या शिष्यांनाही आपली कला जोपासण्यासाठी मदत व्हावी यासाठी त्यांना संगीताचे धडे देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत मुंबई, पुणे, जयपूर, गोवा अशा अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे. ज्यामध्ये संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत स्मृती समारोह, रझा फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या किशोरीताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रम,त्यांनी आपल्या गुरूंना स्वरांच्या रूपाने मानवंदना दिली आहे.
शेवटी संगीत हे मृगजळ आहे. म्हणूनच संगीताच्या या अथांग सागरात डुबकी मारून कोणकोणती रत्नं हाताला लागतील काहीच सांगू शकत नाही. मग काही वेळा या प्रवासात गटांगळ्या सुद्धा खाव्या लागतील मात्र डगमगून नं जाता एकेका स्वराचा आधार घेऊन ही नाव तरून न्यावीच लागते. तेव्हा आणि तेव्हाच हे मृगजळ पार करणं शक्य आहे हे नंदिनी बेडेकर यांच्या या सांगीतिक प्रवासातून दिसून येईल.
— सायली करमरकर.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply