गायिका, निवेदिका, निर्मात्या नीला रविंद्र यांचा जन्म १७ जूनला मुंबईत झाला.
नीला रविंद्र भिडे हे त्यांचे पूर्ण नाव. आपल्याला त्या नीला रविंद्र म्हणूनच माहीत आहेत. माहेरच्या त्या नीला जोशी. उत्तम निवेदिका आणि आयोजिका म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच गायनातही त्यांनीआपला स्वतःचा ठसा उमटला आहे.
पार्ल्यातील महात्मा गांधी रोडवरील ज्या भिडे कुटुंबियांच्या वास्तूत सुरवातीच्या काळात नुकतीच शंभरी पूर्ण केलेल्या पार्ले टिळक विद्यालयाचे काही वर्ग भरत असत त्या भास्कर गणेश भिड्यांच्या नातसून नीला रविंद्र आहेत.नीला रविंद्र यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे झाले, त्यांनी पार्ले कॉलेज मधून एम ए (फिलोसॉफी) केले आहे. आपल्या महाविद्यालयीन कारकीर्दीत त्यांना मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु गजेंद्र गडकर यांच्या हस्ते ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इअर’ ने सन्मानित केले गेले होते तसेच त्यांना १९६९ मध्ये रोटरी क्लबतर्फे विशेष पुरस्कार मिळाला होता. नीला रविंद्र यांनी आपले संगीताचे शिक्षण पंडित शंकर अभ्यंकर यांच्या कडे झाले. ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी हे त्यांचे मामा होत.
गायिका म्हणून १९६९ मध्ये संगीतकार वसंत देसाई यांनी नीला रविंद्र यांना ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकासाठी पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. पुढे त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट व नाटकांसाठी पार्श्वगायन केले, गाण्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिका व जर्मनीचे दौरे, नीला रवींद्र या ऑडिओ कॅसेट व जिंगल्सच्या क्षेत्रातील पहिल्या स्त्री निर्मात्या आहेत. त्यांनी ३५० हून जाहिरातींसाठी (जिंगल्स) केल्या असून, ९ भाषांमधून पार्श्वगायन केले आहे. लंडन येथील ज्वेलर्स- ‘भांजी गोकलदास ॲन्ड सन्स’ यांच्यासाठी जिंगल्सची निर्मिती त्यांनी केली होती. नीला रविंद्र यांनी महाराष्ट्र राज्य सरकार प्रकाशित मराठी विश्वकोश (बोलका विश्वकोश) १७ वा खंड सी.डी. साठी शीर्षक गीताची प्रस्तुती केली आहे. परदेशात त्यांनी Indian Society सिनसिनाटी (अमेरिका), Indian Society फ्रँकफर्ट (जर्मनी) मधील चॅरिटी शो मधून गायिका आणि निवेदिका म्हणून सहभाग घेतला होता. जर्मनीतील एका रेकॉर्डिंग कंपनीच्या फ्यूजनसाठी , स्नॅप ॲटॅक या अल्बम मधील ‘Reme’ Asian Top Twenty मध्ये M.T.V.आणि चॅनेल V.साठी नीला रविंद्र यांचे व्हॉईस रेकॉर्डिंग झाले होते.
नीला रविंद्र यांनी काही काळ मुंबई आकाशवाणी वर काम केले आहे. या सोबतच त्यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दिवाळी अंक व मासिक अंकासाठी लेखन केले आहे. RAPA (Radio and TV Advertising Association of India Ltd) ॲवॉर्डस साठी त्या ३ वर्षे परीक्षक मंडळावर कार्यरत होत्या. नीला रविंद्र यांनी आपले पती रवीन्द्र भिडे व आविनाश प्रभावळकर या तिघांनी मिळून पार्ल्यात १९८२ मध्ये “प्रथमेश” या नावाने एक सांस्कृतिक चळवळ चालू केली. नीला व रवीन्द्र भिडे यांनी मनोरंजनातून शिक्षण व संस्कार या एक संकल्पनेतून प्रथमेश ऑडिओ कॅसेटच्या निर्मितीला सुरुवात केली. मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने प्रथमेशची घोडदौड सुरू झाली. पुढे १९८५ मधे आविनाश प्रभावळकर या समविचारी कलावंत मित्राच्या सक्रीय सहकार्यामुळे “प्रथमेशचे” “प्रथमेश कला केन्द्रात” रूपांतर झाले. संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य आणि समाज कार्य अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिना एकाच वेळी, एकाच रंगमंचावर आणण्याची किमया प्रथमेश कला केन्द्राने करुन दाखविली. अतिशय भव्य, दिमाखदार, श्रवणीय, प्रेक्षणीय आणि दर्जेदार मैफिलाची मांदियाळी पार्ल्यात आयोजित करण्याचे प्रथम श्रेय नीला रवीन्द्र रवीन्द्र भिडे अविनाश प्रभावळकर यांच्या कडे जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बरोबरीने समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना मदत करणे ही प्रथमेशची परंपरा आहे. नीला रविंद्र या प्रथमेश ऑडिओ कॅसेटच्या संस्थापिका व संचालिका आहेत.
सामजिक कामात नीला रविंद्र यांनी सिरूर बालकाश्रम, लोकमान्य सेवा संघ, सावरकर केंद्र, ग्राम मंगल वैद्यकीय सेवा यांच्या साठी काम केले आहे. त्यांनी तीन वर्षे स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम केले आहे. I Clean Mumbai या संस्थेच्या ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केले आहे.
नीला रविंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply