सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मुर्तझापूर येथे झाला. वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.
मी काय अनेकांनी त्यांचे हे नाटक लहानपणी कितीतरी वेळा स्टेजवर पाहिले होते परंतु आजच्या पिढीला दुर्दैवाने ते बघायला मिळू नये हे ह्या आणि पुढल्या पिढीचे दुर्देव, हे अक्षम्य पाप ज्यांनी केले त्यांना कुठलीच पिढी क्षमा करणार नाही.
वसंतराव देशपांडे यांना खूप गुरु होते. त्यांची आई चागले गायची . त्यांची आई अमरावती जिल्ह्यात सावळापूरकर गावातली , खरे तर वसंतराव हे सावळापूरकर-देशपांडे म्ह्णून ओळखले जात. त्यांचे वडीलही गाणे गात. वसंतराव सुरवातीला उत्तम तबला वाजवत पण पुढे पुढे तबला मागे पडला आणि गाणे सुरु झाले. ते पहिल्यांदा गाणे शिकले ते शंकरराव सप्रे यांच्याकडे . पुढे ते कोल्हापूरला आले त्यांनी ‘ कालियामर्दन ‘ या हिंदी चित्रपटात कृष्णांची भूमिका केली. त्यांच्या मामानी त्यांना दिनानाथ मंगेशकरांकडे नेले. दिनानाथांनी त्यांना चार गाणी शिकवली. त्याच्यावर दीनानाथ मंगेशकरांचा प्रभाव पडला होता . परंतु ते कधी कुणाशी बांधले गेले नाहीत म्हणजे त्यांच्यावर कुणाची छाप पडली नाही. नावे घ्यायची झाली तर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, किराणा घराण्याचे सुरेशबाबू माने , पटियाला घराण्याचे असद अली खान आणि भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर आणि रामकृष्णबुवा वझे ह्यांचे संस्कार लाभले . त्यांनी भुर्जीखासाहेबांपासून अनेकांचे गाणे आईकले होते.
वसंतराव अठरा वर्षाचे असताना असद अली खासाहेबाचा गंडा बांधायला गेले असताना ते रस्तात एका विहिरीजवळ बसले असताना ते गाऊ लागले तो राग मारवा होता , तेव्हा खांसाहेब तिथे आले त्यांनी ते आइकले , त्यांनी त्यांच्या तो राग शिष्याकडून गाऊन घेतला आणि शेवटी वसंतरावांना गायला सांगितले . त्यांनी तो उत्तमपणे गायला. तेव्हा असद अली खासाहेबांनी त्याना सांगितले तू मारवाच राग शिक कारण ‘ मारवा ‘ या एका रागात अनेक राग येतात हा मंत्र दिला.
त्यांनी कालिया मर्दन , दूधभात आणि अष्टविनायक या चित्रपटातून भूमिका केल्या.
अशा या भारतीय शास्त्रीय संगीताची उपासना करणाऱ्या गायकाचे ३० जुलै १९८३ रोजी पुण्यात निधन झाले. आज त्यांचे नातू राहुल देशपांडे त्यांची गायनाची परंपरा समर्थपणे चालवत आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply