मोहरी…. बोराटा नाळ….. लिंगाणा…. पाणे… रायगड
मोहरीच्या पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.
त्यानंतर ४ वाजता चहा घेऊन आम्ही रायलींगाच्या पठाराच्या दिशेने निघालो. वाट सोपी होती मात्र अनेक छोट्या छोट्या पाऊलवाटा दिसत असल्याने नेमकी वाट शोधणे माहितगारा शिवाय शक्य झाले नसते. मोहरी कॅम्प लीडर्स आमचे बरोबर होते. अंदाजे अर्ध्या तासात आम्ही रायलींगाच्या भव्य पठारावर पोचलो. पठारावर असलेले पिवळे गवत उन्हाने चमकत होते आणि वारयाने डोलत होते. पठारावर पोचल्यावर समोरचे दृश्य पाहुन डोळ्यांचे सार्थक झाले. समोर रौद्र असा लिंगाणा दिमाखात झळकत होता. रायलींगाच्या पठारावरून लिंगाणा पाहणे हा नक्कीच एक उत्कट असा अनुभव आहे. लिंगाण्याचे कठीण पण नेमके लक्षात येते. सह्याद्रीचा हा सुळका बरेच दिवस गिर्या रोहाकाना सर करता येत नव्हता. काही जणांना आपले प्राण पण गमवावे लागले होते.
सर्व प्रथम ‘मुंबई हॉलिडे हायकर्स’ हीरा पंडित यांनी प्रथमच डिसेंबर १९७८ मधे लिंगाणा चढाई पूर्ण केली आणि त्यानंतर अनेक जणांनी लिंगाणा शिखर सर केलाय. मात्र अत्याधुनिक साधने, योग्य अस मार्गदर्शन, धाडसी वृत्ती आणि चिकाटी असल्याशिवाय कोणीही लिंगाण्याच्या वाटेला जाऊ नये. उतावीळ पणे कडा चढण्याचा प्रयत्न करताना काही चूक झाली तर वाचण्याची शक्यताच नाही.
ह्या किल्ल्याचा आकार शिवलिंगाच्या आकारासारखा असल्याने याला लिंगाणा हे नाव पडले आहे.रायगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांच्या मधे हा किल्ला आहे. शिवकाळात ह्या अवघड किल्ल्याचा तुरुंग म्हणुन वापर केला जात असे. शिडी आणि दोराच्या सहाय्याने वरती जायला सोय होती. कैद्यांना ठेवल्यावर शिडी काढुन घेतली जाई. त्यामुळे अवघड सुळका आणि खाली घसरड्या वाटा,त्यामुळे येथे कैद्यांच्या मनावर या अवघड स्थितीमुळे वाईट परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर जीवच गमवावाण्याची वेळ येई. आता त्या गडावर पाहण्यासारखे विशेष काही नाहीये.लिंगाणा शिखर गाठायला मात्र लोक खूप उत्सुक असतात.
आम्हाला काही लिंगाणा शिखर सर करायचे नव्हते की लिंगाणा पाहायचा नव्हता.तर लिंगाणा माचीमधुन पाणे या आमच्या पुढच्या मुक्कामाच्या गावी जायचे होते.
थोड्याच वेळात सूर्यास्त झाला आणि लिंगाणा ज्यास्तच रौद्र भासायला लागला. वातावरण पण थंड झाले. गार वारे बोचायला लागले लिंगाण्याचा निरोप घेऊन आम्ही रात्रीच्या कॅम्प फायरसाठी लाकडे गोळा करीत कॅम्प वर परतलो.
मोहरीच्या पठारावरील तो मुक्काम खूप वेगळा वाटला. कारण आजूबाजूला अगदी जंगल होते. जंगलात मुक्काम करण्याचा वेगळाच आनंद होता. आसपास कुठेही नावाला मनुष्य वस्ती नव्हती. कारण मोहरी हे खेडेगाव पठारा पासून खूप लांब होते. दूरवर कोल्हेकुई ऐकू येत होती. कॅम्प फायर झाल्यावर रात्री १२ च्या सुमाराला आम्ही आमच्या टेंटमधे आलो. जंगलात असल्याने संपूर्ण टेंट व्यवस्थितपणे पैक केला. साप आदी सरपटणारे प्राणी आत येऊ शकणार नाहीत याची काळजी घेऊन मगच अंथरुणावर अंग टाकल.आता दुपारी तापलेली ती जमीन गार पडली होती. दिवसभराच्या चालीने आणि श्रमाने त्या खडबडीत पृष्ठभागावर पण लगेच झोप लागली. डोळ्यासमोर मात्र भयप्रद असे लिंगाणा शिखर दिसत होते.
दुसरे दिवशी सवईप्रमाणे पहाटे पाच वाजता जाग आली. बेड टी मिळाला. नंतर सर्व आवारा आवर झाल्यावर चहा बिस्किटे यांचा नाश्ता झाला. साडेसात वाजता आम्ही मोहरीच्या पठारावरून निघालो. या पुढची वाट थोडी जोखमीची असल्याने आम्ही सिंगल लाईन मधे निघालो. थोड्याच वेळात आम्ही बोराट्याच्या नाळेजवळ पोचलो.ह्या अवघड नाळेतून आम्हाला लिंगाणा माचीकडे जायचे होते. प्रचंड मोठे छोटे खडक असलेली नागमोडी उताराची वाट. पावसाळ्यात नक्की पाण्याने वाहत असणार. या वाटेवर चालताना घ्यायची काळजी म्हणजे पाय टाकलेला दगड निसटणार नाही याची खात्री करून घेऊनच पाय उचलायचा. नाहीतर गडगडत खाली जाणारा दगड कोणाला इजा करण्याचा संभव. या नाळेत सर्वात पुढे मुली आणि त्यांच्या मागून आम्ही सावधपणे नाळ उतरत होतो. वेगाने चालणारे आम्ही इथे मात्र सर्वात मागे होतो. सावधपणे सर्व जण नाळ उतरल्यावर एका अवघड टप्प्यावर येऊन आम्ही ठेपलो. बोराट्याच्या नाळेला उजव्या हाताला एक कातळ उभा कडा होता. त्या कड्यावर अगदी एक पाउल राहील अशी खोबण होती. त्याच्या बाजूला आधारासाठी दोरी बांधलेली होती. त्या कड्याला बिलगून आम्हाला पलीकडे लिंगाणा माचीत जायचे होते. साधारण दहा बारा फुटाचा तो अवघड कडा पार करायचा टप्पा होता. आतापर्यंतच्या वाटेत सर्वात अवघड आणि कसोटी पाहणारी ही वाट होती. मोहरी कॅम्पचे लीडर्स आमच्या बरोबर होते. त्यांनी सहज गत्या तो कडा पार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. अनेकांच्या सैक पलीकडे नेल्या. त्यानंतर सर्व प्रथम मुली त्या वाटेने हळू हळू पलीकडे गेल्या.कड्याला बिलगून डाव्या बाजूच्या खोल दरीकडे न पाहता कड्याच्या खोबणीत पाउल टाकत जीव मुठीत धरूनच सर्व त्या वाटेवरून जात होते. मला सुरवातीला नक्कीच भीती वाटली कारण जर डाव्या बाजूला आपला तोल गेलाच तर खोल दरीत आपली हाड पण सापडणार नाहीत. मी काही पावलं टाकली आणि भीती गेली. सराईतपणे मी तो अवघड टप्पा पार करून लिंगाणा माचीत पोचलो.
आमच्या ट्रेक मधे सर्वात धोकादायक अशीच ही वाट होती. पण आम्ही सर्व जणांनी यशस्वी रित्या हा टप्पा सुखरूपपणे पार केला आणि लिंगाणा माचीत प्रवेश केला. या वाटेपर्यंत आम्हाला सोबत करायला,मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी मोहरी कॅम्पचे कॅम्प लीडर्स आले होते.त्यांचे खरच कौतुक कारण दहा दिवस त्यांना असेच मार्गदर्शन करायचे होते. आम्हाला लिंगाणा माचीत सोडल्यावर ते परत गेले. त्या पुढील वाट तशी सोपी होती. दगडांची उताराची ती वाट आम्ही सहजपणे हसत खेळत पार केली आणि पाणे या गावात प्रवेश केला. गावाच्या सुरवातीलाच एका खळाळून वाहणाऱ्या ओढ्याने आम्हाला खुणावले. पाणे कॅम्पवर पोचताच सैक टेंट मधे टाकून आम्ही पाण्यात डुंबायला ओढ्यात उतरलो. पाणी खुपच स्वच्छ होते,ओढ्याची खोली पण ज्यास्त नव्हती. एवढे दिवस राहिलेल्या आंघोळीची इच्छा त्या ओढ्यात पूर्ण करून घेतली. अगदी मनमुराद डुंबलो. आता सर्वच जण अत्यंत रिलैक्स मूड मधे होते. कारण पुढचा टप्पा शेवटचा होता तो म्हणजे रायगड. रात्री जेवण कॅम्प फायर उरकून अत्यंत समाधानाने झोपयला गेलो.आज ट्रेक मधे काहीतरी अनोखे साहस केल्याचे समाधान वाटत होते.
कालची रात्र पाणे गावात मजेत गेली. ट्रेकचा एक मोठा टप्पा पार केल्यामुळे सर्व जण आता वेगळ्याच मूड मधे होते. रात्री बराच वेळ गप्पा गोष्टी चालू होत्या. या कॅम्पवर थंडीचा जोर तसा कमी जाणवत होता तरी देखील सकाळी नेहेमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. आता बेड टीची सवय लागली होती. तसच सर्व आवरून रेडी होण पण चांगलंच अंगवळणी पडल होत. या ट्रेक मधे खडबडीत जमिनीवर टेंट मधे झोपणे, मिळेल ते जेवण गोड मानून घेणे, कुठल्याही झऱ्याच, ओढ्यातील, नदीतील पाणी विचार न करता पिणे ह्याची सवय झाली होती. थंडी, वारा आणि रणरणत्या उन्हाची पर्वा न करता अवघड वाटेने न दमता मैलोन मैल चालणे याला आमची तयारी झाली होती. ट्रेकच्या आधी मला वाटत होते की रोज एवढी चाल झाल्यावर आपणाला काही बघण्याची एनर्जी राहील का ? पण तशी काही अडचण आली नाही. सर्व ठिकाणी नीट एडजस्ट झालो.
सकाळी नाश्ता चहा घेऊन आम्ही पाणे कॅम्प सोडला. सुरवातीला शेतातून जाणारी सुंदर अशी वाट लागली. वाटेच्या दुतर्फा वाऱ्यांनी डोलणारी ती शेते पाहुन मनाला प्रसन्न वाटत होते. आमच्या पैकी बरेच जण या पूर्वी पण रायगडावर गेले होते. त्यामुळे वाट चुकण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यात यादव यांचे पण मार्गदर्शन होते. आता आम्ही चालत असलेली वाट तशी खूपच सोपी होती.वाटेत एक गाव लागले त्याचे नाव वाघिरे अशी माहिती यादवांनी पुरवली. आम्ही आपले वाट चालत होतो. रायगड किल्ला आता नजरेच्या टप्प्यात आला होता. एवढे दिवस दुरून टोपीसारखा दिसणारा त्याचा आकार आता खूप विशाल भासत होता.एवढेच कशाला टकमक टोकाचा कडा पण दिसु लागला . आता आम्ही चालत असलेली वाट पण फार कठीण नव्हती. गप्पा गोष्टी करत आम्ही रायगड वाडी या गावात कधी पोचलो समजलेच नाही. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही रायगडचा चीत दरवाजा गाठला आणि सगळ्यांनी हर हर महादेव अशा घोषणा दिल्या आणि वातावरण भरून गेले. आम्ही रायगड किल्ल्याला स्पर्श केला होता. आता आम्ही गडाच्या पायऱ्या चढायला सुरवात केली. या वाटेवर देखील आम्हाला सुंदर असे ताक मिळाले. खूप लढा बुरुज मागे टाकत आम्ही रायगडचा विशाल असा महादरवाजा गाठला आणि धन्य झालो. अखेर आमच्या मुक्कामाचं ठिकाण आलं होत. आम्ही रायगडावर आलो होतो. या ठिकाणी पण आमचा दोन दिवस मुक्काम होता त्यामुळे राजगडावर भेटलेल्या दोन्ही तुकड्या यांची पण भेट होणार होती. साधारण १२ वाजेपर्यंत आमची सर्व तुकडी रायगडावर पोचली. आमच्या आधीच्या तुकडीबरोबर मिसळलो. एकत्र जेवणाचा कार्यक्रम झाला. आता पर्यंतच्या किल्ल्यात रायगड हा तसा वावरात असलेला किल्ला.इंग्रजांच्या तोफांचा मारा झेलुनही अजूनही बऱ्याच चांगल्या स्थितीत गडावरच्या वास्तू आहेत. रायगड हे आता एक पर्यटन स्थळ पण झालंय. आता तर रोप वे ची सोय झालीय, राहण्याची चांगली सोय पण आहे. पर्यटकांनी त्या महान राजाची आठवण मनात ठेऊन गडाच पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन दुपारी ४ वाजता चहा पिऊन आमच्या दोन्ही तुकड्या गड पाहायला निघाल्या. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. मात्र जस जस स्वराज्याचा विस्तार होत गेला तसा महाराजांना अधिक विस्तार असणारा बुलंद अशा डोंगरी किल्ल्याची गरज भासू लागली आणि त्यांचं लक्ष असा महाड जवळच्या रायरी वर पडली. “देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही तख्तास जागा हाच गड करावा” असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. त्यामुळे तिथे बुलंद रायगड किल्ला उभा राहिला आणि स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणुन रायगडाची ओळख झाली. महाराजांच्या सुचनेनुसार हिरोजी इंदुलकर याने या गडाची निर्मिती केली. हा किल्ला समुद्र सपाटीपासून २७०० फुट उंचीवर आहे. याचा पसारा खूप मोठा आहे. ताशीव अशा कड्यांच संरक्षण या किल्ल्याला लाभले आहे. किल्ल्यावर अनेक तलाव, इमारती, देवळे आहेत. इतर किल्ल्यांच्या तुलनेत रायगडावर आजही पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या खूपच चांगल्या स्थितीत आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या सारखी अत्यंत महत्वाची घटना याच गडावर घडली. दुर्दैवाने ह्या महान राजाचा मृत्यु पण याच गडाला पाहावा लागला. ह्या ट्रेक मधे राजगड आणि रायगड ह्या शिवाजी महाराजांच्या दोनही राजधान्या पाहण्याची संधी मिळाली म्हणुन नक्कीच मी स्वतःला भाग्यवान समजतो.
सर्व प्रथम आम्ही जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राजसभेला भेट दिली.ह्याची रचना खूपच उत्कृष्ट आहे. राजसभा २२० फुट लांब आणि १२४ फुट रुंद आहे अशी माहिती मिळाली. याच राजसभेत पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे . या राजसभेच वैशिष्ठ्य म्हणजे राजसभेच्या कुठल्याही कोपऱ्यात उभा राहून कुजबुज केली तरी ती राज सिंहासनाकडे ऐकू येते. अशी रचना करणारे त्या काळात कारागीर होते हे पाहुन थक्क व्हायला होते.सिंहासनाच्या बरोबर समोरच एक भव्य द्वार दिसते तो नगारखाना. नगारखान्याच्या पायऱ्या चढुन वर गेलो की आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी असतो.
नगारखान्या कडून डावीकडे होळीचा माळ आहे तिथेच आता महाराजांचा भव्य पुतळा बसवला आहे.हा राजांचा सिंहासनावर आरूढ झालेला पुतळा गडाला जिवंत पणा आणतो. विशेषतः सूर्याची किरणे जेव्हा पुतळ्यावर पडतात तेव्हा अप्रतिम दृश्य दिसते. आम्ही सर्वांनी विनम्रपणे त्या महान राजाला मुजरा केला.
त्यानंतर आम्ही बाजारपेठ पाहायला गेलो. या बाजारपेठेची रचना पाहण्यासारखी आहे. अगदी रेखीव पणे लांबवर एका रेषेत बांधलेली तीन पदरी समांतर अशी बाजार पेठेतील दुकानांची रचनाआहे. सैनिकांना घोड्यावरून खरेदी करता यावी अशा उंचीवर दुकानांची रचना केली आहे. दोन्ही बाजूला दुकाने आणि मधे ४० फुटी रुंद रस्ता.ह्या बाजरपेठेची रचना पाहुन खरच थक्क व्हायला होत. पावसात बाजारपेठेत पाणी साठू नये म्हणुन बंदिस्त खोल भुयारे आहेत. त्यानंतर शिरकाई मंदिर जिला गडाची देवी मानले जाते. त्या नंतर आम्ही जगदीश्वर मंदिरात पोचलो. मंदिरासमोरची नंदीची मूर्ती खूप सुबक आहे.मंदिराचा गाभारा भव्य आहे. मंदिराच्या पायऱ्यांच्या खाली हा किल्ला ज्या हिरोजी इंदुलकर यांनी शिवाजी महाराजांच्या सुचनेनुसार नुसार बांधला त्यांचा नम्र असा उल्लेख आहे. जगदीश्वर मंदिरातील गाभाऱ्यात मनाला एक वेगळीच उर्जा मिळाली.
जगदीश्वर मंदिर पाहून झाल्यावर आम्ही शिवाजी महाराजांच्या समाधी पाहायला गेलो. काळ्या दगडांनी बांधलेले अष्टकोनी जोते आणि वरती फरसबंदी असे समाधीचे स्वरूप आहे. आम्ही सर्वजण समाधी समोर नतमस्तक झालो. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार चालू असतानाच त्यांच्या आवडत्या वाघ्या कुत्र्याने अग्नीत उडी घेतली होती. त्याची देखील समाधी महाराजांच्या समाधी जवळ बांधली आहे. आम्ही समाधी कडे असतानाच सूर्यास्त झाला आणि आम्ही कॅम्प वर परत यायला निघालो. रायगडचा आमचा कॅम्प गंगासागर तलाव परिसरात होता. प्रथमच बंदिस्त अशा जागी आम्ही त्या रात्री झोपलो. त्या आधी कॅम्प फायर आणि गप्पा गोष्टी झाल्या. सगळेच जण आता ट्रेक संपल्याच्या आनंदात होते. रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारत जागत बसलो होतो. एकमेकांचे पत्ते, फोन नंबर घेतले. तो काळ मोबाईलचा नव्हता.
दुसरे दिवशी आम्ही थोडे उशिराच उठलो. आमच्या आधी आलेली तुकडी पुण्यासाठी रवाना झाली होती. आम्ही चहा नाश्ता करून गड फिरायला बाहेर पडलो. प्रथम आम्ही आज टकमक टोकाला भेट दिली. बाजारपेठे पासुन समोरच तिथे जायला रस्ता आहे. टकमक टोकापाशी पोचताच भन्नाट वारा स्वागताला आला.जस जसे आपण टोकाकडे जातो तसा रस्ता अरुंद होत जातो.उजव्या हाताला २६०० फुट तुटलेला कडा आहे. शिवकाळात इथे गुन्हेगाराला मृत्युदंड दिला जात असे. इथून खाली दिसणारे दृश्य भन्नाट आहे.
त्यानंतर आम्ही हिरकणी बुरुज पाहिला. अनेकदा ऐकलेली हिरकणीची कथा आठवली.इथून पण निसर्ग फार नयनरम्य दिसतो.
कुशावर्त तलाव, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, अष्टप्रधानांच्या वाड्याचे अवशेष, राणी महाल अतिशय सुंदर असे मनोरे, त्यातील नक्षीकाम, आकर्षक कारंजी, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा अशा विविध वास्तू पाहून खूप समाधान वाटले. आज आम्हाला ग्रुप लीडर आणि कॅम्प लीडर्स यांनी पाहिजे तिथे भटकायला परवानगी दिली होती त्यामुळे आम्ही वेग वेगळे ग्रुपने मनमुराद रायगड आम्हाला पाहिजे तसा पहिला.आम्हाला जी ठिकाणे आवडली होती त्या ठिकाणांना परत भेट दिली. भरपूर फोटोग्राफी केली. दिवस तसा भरपूर मनमुराद भटकण्यात गेला. रात्री कॅम्प फायरला अनुभव कथन झाले. आज तसा आमचा ट्रेक पूर्ण पूर्ण झाला होता. आम्ही सिंहगड पाहुन ट्रेक सुरु केला तो रायगड पाहिल्यावर संपला. मधे राजगड तोरणा लिंगाणा आणि सुंदर असा निसर्ग अनुभवता आला. या ट्रेकने मला अनुभव संपन्न बनवले नवीन ओळखी झाल्या. आज रात्री मी मोठ्या समाधानात झोपी गेलो.
दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून चहा नाश्ता उरकून रायगड उतरायला सुरवात केली. जाताना बघितलेली ठिकाणे परत पाहायला मिळत होती. आज आमचा ट्रेक संपत होता म्हणुन आम्ही थोडेसे भावनावश झालो होतो. पाचाडला पोचल्या नंतर शासनाची बस आली. रायगडचा निरोप घेऊनच आम्ही बस मधे चढलो आणि दुपारी १२ च्या सुमारास पुण्यात बेस कॅम्पला परत आलो. दुपारी जेवण अनुभव कथन झाले. संपूर्ण ट्रेक च युथ होस्टेलने केलेल्या आयोजनाची सगळ्यांनीच तारीफ केली. खरोखरच युथ होस्टेलने संपूर्ण ट्रेकची केलेली आखणी, मुक्कामाच्या ठिकाणी नेमलेले कॅम्प लीडर्स, ग्रुप लीडर्स यांनी मी तरी अगदी भारावून गेलो.
आदरणीय श्री. बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमासाठी आले होते त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यांच्या हस्ते आम्हाला अगदी शिवकालीन भाषेत छापलेलं ट्रेक पूर्ण केल्याच प्रमाण पत्र मिळालं. त्यानंतर तुकडीतील सगळ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन आणि ट्रेकच्या अतिशय सुंदर अशा आठवणी सोबत घेऊनच मी कल्याणला जाणारी बस पकडली……
विलास गोरे
९८५०९८६९३४
Leave a Reply