सर गारफील्ड सोबर्स म्हणजेच गॅरी सोबर्स. गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान अष्टपैलू म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची कारकिर्द १९५४ ते १९७४ पर्यत राहिली. त्यांचा जन्म २८ जुलै १९३६ बार्बाडोस मधील ब्रिजटाऊन येथे झाला. सोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती.
प्रामुख्याने विकेटजवळ किंवा कुठेही ते चपळाईने क्षेत्ररक्षण करायचे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी केलेली ३६५ धावांची नाबाद खेळी हेच त्यांचे कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक होते. त्या इनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे पहिलेवहिले शतक होते. त्याआधी त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती ८०. दहा तास चौदा मिनिटांच्या खेळीत त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले. २७ फेब्रुवारी १९५८ रोजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ते २० धावांवर नाबाद होते.
तिसऱ्या दिवसअखेर २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी २२८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर १ मार्च रोजी त्यांनी हटनचा उच्चांक मोडल्यानंतर विंडीजचा डाव घोषित करण्यात आला. ३८ चौकारांसह त्यांनी नाबाद ३६५ धावांची खेळी केली. त्यावेळी सोबर्स केवळ २१ वर्षाचे होते. त्यांचा वैयक्तिक धावांचा विक्रम ३६ वर्षे अबाधित राहिला. गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजकडून १९५४ ते १९७४ असे २० वर्षे प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी वेस्ट इंडिजकडून ९३ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ८००० हून अधिक धावा केल्या तर २३५ विकेट घेतल्या.
कसोटीत २६ शतके ठोकताना नाबाद ३६५ अशी त्रिशतकाची खेळीही त्यांनी एकदा केली होती. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांनी ४० हजाराहून अधिक धावा केल्या तर १४०० च्या घरात विकेट घेतल्या. तर ५५० हून अधिक झेल टिपले. त्याच्या काळात वन डे क्रिकेट जन्माला आले नव्हते. ते निवृत्तीच्या उंबरट्यावर असताना वन डे क्रिकेटचा शुभारंभ झाला होता. गॅरी सोबर्स आयुष्यात एकमेव असा वन डे सामना खेळले. मात्र ते शून्यावर बाद झाले. मात्र त्यांनी १ गडी बाद केला होता. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना त्यांनी माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ६ षटकार ठोकून क्रिकेट विश्वात एक विक्रम नोंदवला होता.
सोबर्स यांच्या कारकिर्दीचे आकडे थक्क करणारे आहेत. त्यांच्यावेळी क्रमवारीची पद्धत नव्हती. नंतर विस्डेनने ती लागू केली. त्यावेळी सोबर्स यांना तब्बल आठ वेळा मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. अशा सोबर्स यांच्याच नावाने हा पुरस्कार आज दिला जातो, जो त्यांचा नव्हे तर क्रिकेट खेळाचाच सन्मान होय.‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ (१९६४) तसेच ‘विस्डेन’च्या शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये सोबर्स यांचा समावेश होता. १९७५ मध्ये त्यांना ‘सर’ किताबानेही गौरवण्यात आले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply