आम्ही आमची शतपावली अर्धवट सोडून तिथे पोहोचलो. समोर अंदाज केल्याप्रमाणे श्री देशमुख, त्यांच्याबरोबर श्री पाटील, श्री जोशी व कुलकर्णी बाई आल्या होत्या. ही ती मंडळी होती तर!
“या, या बस सगळे. आत्ता कसे काय आलात? बराच उशीर झाला आहे,” ठाकूर म्हणाले. मी सगळ्यावर एक नजर फिरवली व म्हणालो, “काय देशमुख कसे आहात? ओळखलंत का मला?” “हो, हो सर सकाळीच ओळखले होते परंतु विचार केला कि संध्याकाळी आपल्याला प्रत्यक्ष भेटावे. खूप वर्षांनी आपली भेट होते आहे.” देशमुख म्हणाले. “काही काम काढलेत का? सगळेजण ह्या रात्रीच्या वेळी बरोबर आलात म्हणून विचारत आहे” ठाकूरने एकदमच विषयाला हात घातला. “तसे काम खूप मोठे नाही. परंतू आपल्या कानावर काही गोष्टी घालाव्यात ह्या हेतूने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती आहे”. देशमुख म्हणाले.
“त्याचे काय आहे ना सर, एखाद्या शिक्षकाला डोक्यावर घेण्यापूर्वी त्याच्यातल्या बाकी गुणांकडेही लक्ष देणे जरुरी असते नाही का? नाही तर त्या शिक्षकाच्या वर्तणुकीमुळे शाळेचे नाव खराब होते.” कुलकर्णी बाई उतावळेपणाने बोलून गेल्या. पाटील सरांनी कुलकर्णी बाईंकडे जर रागानेच पहिले. तशा त्या गप्पच बसल्या. मी आणि ठाकूर एकमेकांकडे बघत होतो.
“असे काय घडले आहे? तुम्ही इनामदार सरांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही का? त्यांनी तुमचे म्हणणे ऐकून घेतले असते.” ठाकूर म्हणाले.
“हाच तर problem आहे ना सर, आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले त्यांनी लक्ष दिले नाही. शेवटी लेखी अर्ज केला आहे तरीही काही फरक पडला नाही. म्हणूनच तुमच्याकडे आलो आहोत. म्हंटले अनायासे आपण आलाच आहात तर आपल्या कानावर घालावे.” पाटील म्हणाले.
“इतके सगळे काय झाले? काय प्रकार आहे?” मी सरळ देशमुखलाच विचारले. “सर काय आहे की आपल्याकडे एक ‘सितारा मिर्झा’ नावाची शिक्षिका आहे. ती सकाळी मिटिंगमध्ये होती. ती एक कर्तव्यदक्ष व अतिशय हुशार म्हणून ओळखली जाते. तिची अशी कल्पना आहे की तिच्याएवढे चांगले कोणी शिकवीत नाही. ती वरच्या वर्गांना गणित व विज्ञान शिकविते. त्या मुलांना ती शाळा सुटल्यानंतर थांबवते. काही मुलांना ती शाळा सुरु होण्यापूर्वी बोलाविते आणि त्यांचे extra classes घेते. आणि हे सगळे classes शाळेच्या corridorमध्ये घेत असते, हि पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, कित्येक पालक तिच्या विरुद्ध तक्रार करतात की, हि आमच्या मुलांना जबरदस्तीने थांबवते. त्यामुळे मुले थकून जातात. आणि सर, तिसरी गोष्ट अशी की, ही सगळ्यांना सांगते मी मुलांना विनामूल्य शिकवते. ही विनामूल्य शिकवते म्हणून सरांनी आता तर तिला शाळेतला एक वर्ग classes घेण्यासाठी देऊ केला आहे. दोन वर्षे मुलांना चांगले मार्क्स मिळाले तर हिला डोक्यावर बसून ठेवली आहे. शाळेतला वर्ग हिला classes चालवण्यासाठी देणे हे तर गैरच आहे. शिवाय हि मुलांकडून गुपचूप फी घेते. खरे तर ती परधर्मीय आहे म्हणून तिला सगळ्या सवलती दिल्या जात आहेत. हे योग्य नाही.” देशमुखने त्याची बाजू मांडली.
मी विचारले, “तुमचा हा विरोध कशासाठी आहे? ती शिकवीत नाही का? का सरांनी तिला class घेण्यासाठी वर्ग दिला आहे म्हणून? की गुपचूप फी घेते म्हणून? गुपचूप फी हा काय प्रकार आहे? आम्ही उद्या तुमच्या इनामदार सरांशी बोलतो. नंतर बघू या.”
“सर, ही मुलगी चारित्र्याने देखील चांगली नाही. हिचे नाव मिर्झा. पण गेली कित्येक वर्षे ती त्या कोतवालांकडे रहाते आहे. लोक काय बोलायचे ते बोलत असतात. अशा शिक्षिकेकडून मुले काय शिकणार?” कुलकर्णी बाई चिडून बोलल्या. मी आणि ठाकूर जरा विचारात पडलो कारण इनामदार काल सगळं बोलले होते पण ह्या कोतवालांविषयी काहीही बोलले नव्हते. परन्तु आम्ही तसे काहीही भाव चेहऱ्यावर दाखविले नाहीत. आणि एकच पालुपद पकडून बसलो होतो उद्या इनमदारांशी बोलल्यानंतर काय ते बघू.
ठाकूरने शिपायाला कॉफी आणायला सांगितली होती. त्यामुळे ते चौघे बसलेच होते. कॉफी घेताना मनात एक विचार डोकावला कि हा देशमुख तर कसा आहे ते आपल्याला माहिती आहे पण ह्या इतर तीन लोकांचीही पार्श्वभूमी कळून घेणे योग्य ठरेल.
मी पाटील ना विचारले, “ पाटील तुम्ही कुठले आहात? देशमुखांना तर मी ओळखतो. थोडा तुमचा परिचय दिलात तर बरे होईल. तुम्ही ह्या शाळेत किती वर्षापासून शिकवीत आहात?”
पाटील म्हणाले, “ मी डहाणू तालुक्यातला आहे. सुरवातीला कलेक्टर कचेरीत कारकुनाची नौकरी करत होतो. ती दोनच वर्षे केली. फारशी जमली नाही. तसा माझा शैक्षणिक गोष्टींकडे ओढा जास्त होता. म्हणून नौकरी करत असतानाच externally परीक्षा देऊन B.Ed केले. त्यानंतर एका प्रायव्हेट शाळेत नौकरी करत होतो. ती शाळा पण डहाणूलाच होती. तिथे ४-५ वर्षे नौकरी केली. परन्तु प्रायव्हेट शाळेत काय वशीलेबाजी खूप चालते. मला काही ते पटले नाही. तिथल्या management बरोबर माझे बरेच वाद झाले. आणि मी राजीनामा दिला. मग दोन-तीन वर्षे कोचिंग क्लासेस घेत होतो. तेंव्हा लक्षात आले की आपण जर कुठल्या शाळेशी संलग्न नाही राहिलो तर मुले classes ला येत नाहीत म्हणून वापीच्या एका शाळेत नौकरी धरली. तिथे सकाळी नौकरी करायचो व संध्याकाळी classes घेत असे. पण ती धावपळ काही जमली नाही class च्या मुलांना मार्क्स कमी मिळाले म्हणून काही पालकांनी माझ्याबरोबर भांडण केले. मी कंटाळून क्लासेस बंद केले आणि ह्या शाळेत नौकरी पत्करली. मला इथे नऊ वर्षे पूर्ण झाली. परन्तु अलीकडे आपल्या शाळेत हा जो काही प्रकार चालला आहे, म्हणून देशमुख सरांना साथ देण्याचे ठरविले आणि ह्याच्या विरोधात उभा राहिलो आहे. सगळे favors दोन तीन नवीन शिक्षकाना दिले जात आहेत. आम्हाला पण शाळेत एक वर्ग द्या आम्हीही क्लासेस घेतो, आम्हालाही चार पैसे मिळतील. माझ्यावर तशी घरची काहीच जबाबदारी नाही, मी पण मुलांना वेळ देईन”.
“घरची जबाबदारी नाही म्हणजे, तुम्हाला कोणी बायको, मुले आईवडील घरी कोणीच नाही का?” ठाकूर एकदमच मध्ये बोलले. “आईवडील आहेत. पण ते माझ्याजवळ नसतात, ते गावी मोठ्या भावाकडे असतात. तिकडे आमची खूप शेती आहे. आंब्याच्या नारळाच्या बागा आहेत आमच्या. तशी बागाईतदार मंडळी आहोत आम्ही.माझी बायको माझ्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन कधीच माहेरी निघून गेली. माझे तिच्याशी कधी पटलेच नाही. मागच्या वर्षीच मी तिला सोडचिठ्ठी दिली.” पाटील म्हणाले. परत ठाकूरने एकदा माझ्याकडे पहिले, आणि गालातल्या गालात हसले. जोशींकडे पाहून हसलो आणि त्यांना विचारले, “ जोशी, तुम्ही कुठले? तुम्ही आपल्या शाळेत कधीपासुन आहात?”
त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, “ सर मी गेली अठरा वर्षे आपल्याच शाळेत नौकरीला आहे. खरे तर मी खूप मेहनत करतो. माझे जे काही काम आहे ते व्यवस्थित करत असतो. परन्तु मला काही तसा फारसा मोबदला मिळालेला नाही. मी कंटाळून गेलो आहे. कित्येक वेळा हि नौकरी सोडून दुसरी नौकरी धरण्याचा पण प्रयत्न केला. मला नेहमी दुसऱ्या नौकऱ्या बाहेर गावच्याच मिळत गेल्या. माझे काही नाही मी बाहेरगावी जायला पण तयार होतो. परन्तु माझी बायको ह्याला तयार नसते. ती इथे कोर्टात नौकरी करते. तिला पगार तर चांगला मिळतोच आणि वरकामाई ही भरपूर मिळते. त्यामुळे ती हे गाव सोडायला तयार नाही. माझी मुलगी B.A च्या तिसऱ्या वर्षाला आहे. काय करणार जसे आहे तसा राहतो. देशमुख सरांनी आम्हाला पटवून दिले की आमच्यावर अन्याय होत आहे आणि ह्या अन्यायाविरुद्ध सगळ्यांनी एकत्रित लढा दिला तर आमच्या सगळ्यांचाच फायदा होऊ शकतो. म्हणून त्यांना साथ देण्याचे नक्की केले आहे”. इतके बोलून ते हसले.
मी सहज देशमुख कडे बघितले, त्याच्या चेहऱ्यावरून तो जोशींच्या बोलण्यावर थोडासा नाराज झाल्यासारखा वाटला. बहुतेक अशा प्रश्नावलिंना सामोरे जावे लागेल ह्याची त्यांनी कल्पनाही केली नसावी.
शेवटी कुलकर्णी बाईंना विचारले, “मॅडम आपण कुठल्या?” मॅडम जरा अंदाजापेक्षा जास्त हुशार वाटल्या. त्यांना आमची ही प्रश्नावली फारशी पटली नसावी. त्यांच्या हे पूर्ण लक्षात आले होते की आम्ही या चौघांचीच चौकशी करत आहोत आणि या मागे आमचा काहीतरी हेतू असावा. त्यांना थोडासा राग आला होता किंवा हे आवडले नव्हते. तरीही स्वतःवर थोडेसे नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या, “सर, आम्ही काय करतो? आम्ही कुठले? आम्ही किती वर्षपासून इथे नौकरी करत आहोत? अशी सगळी आमची चौकशी करण्यापेक्षा त्या इनामदार सरांना विचारा ना की, ‘तिला तुम्ही एवढे favors का देत आहात ते?” “म्हणजे कुलकर्णी मॅडम तुम्हाला काय म्हणायचे आहे? इनमदारांबद्दल तुम्हाला काही शंका आहे का?” ठाकूर तो शब्द ताबडतोब पकडतात. “नाही, नाही सर मला तसे नाही म्हणायचे. परन्तु हि ‘मिर्झा’ थोडी विचित्र स्वभावाची आहे. आपल्या कुठल्या गोष्टीची तिने सरांवर जादू केली आहे तेच कळत नाही. त्याची चौकशी करा” कुलकर्णी मॅडमनी शब्द बदलले. मी त्यांच्याकडे बघत शांतपणे म्हणालो, “ मॅडम, ते तर आम्ही करूच. त्या विषयी आम्ही इनमदारांशी उद्याच बोलू. परन्तु आम्हाला तुमची देखील माहिती हवी आहे. आणि ती तुमच्यातोंडूनच मिळाली असती तर योग्य झाले असते. परन्तु तुमची तशी इच्छा नसेल तर नका सांगू. अशी काही जबरदस्ती नाही. Inquiry होईल तेंव्हा आम्ही ती मिळवूच.
नाईलाजाने शेवटी त्यांनी थोडी माहिती दिली. त्या देखील ह्या शाळेत गेली दहा वर्षे शिक्षिका आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील माणसांच्या मर्जीविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. परन्तु लग्नानंतर त्यांनी नौकरी करू नये अशी जिद्द त्यांच्या नवऱ्याने धरली होती. त्यांच्या सांगण्यावरून तो संशयी स्वभावाचा होता. त्यामुळे त्या दोघांची सारखी भांडणे होत असत व शेवटी कंटाळून त्या वेगळ्या रहायला लागल्या या शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना मुलेबाळे नाहीत. त्या एकट्याच रहात होत्या. पाटील सरांच्या घराजवळच त्यांचे घर होते. त्यामुळे त्यांची आणि पाटीलांची चांगली मैत्री होती.
बराच वेळ ती सगळी मंडळी बोलत बसली होती. नंतर त्यांनी आमचा निरोप घेतला. घडाळ्यात पहिले, जवळजवळ बारा वाजत आले होते. ठाकूर म्हणाले, “ खूप उशीर झाला आहे. आता झोपू या. सकाळी काय तो विचार करूया. आज दिवसभर तशी धावपळही भरपूर झाली आहे. सर, पण तुमचे एक म्हणणे मात्र खरे दिसत आहे. या सगळ्या बखेड्याचा सूत्रधार देशमुखच दिसतोय,” मी हसलो आणि म्हंटले, “चला आता झोपू, सकाळी काय ते बघू. Good night.”
Leave a Reply