नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकर उठलो. सकाळी सकाळी पेपर वाचणे हा माझा छन्द आहे. त्याच त्याच बातम्या शब्द बदलून वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रात वाचण्याची एक वेगळीच गंमत असते. जमिनीवर पडलेले पेपर हातात उचलून घेतले आणि सभोवताली एक नजर फिरवली. डाक बंगल्याच्या एका खोलीत मी होतो, आणि दुसऱ्या खोलीत ठाकूर होते. सकाळी सकाळी आजूबाजूचा परिसर फारच रमणीय दिसत होता. डाक बंगल्याची एक वेगळीच शान असते. हा सुद्धा तसाच होता. सभोवताली भरपूर जागा होती. सुंदर बगीचा होता. सगळ्या खोल्यासमोर छोट्या छोट्या लॉन्स केलेल्या होत्या त्यामध्ये गुजराती style ने झोपाळे लावलेले होते. तसे बलसाड महाराष्ट्रापासून जवळ असल्यामुळे इथे गुजराती संस्कृतीबरोबर मराठी संस्कृतीचीही झलक दिसून येते. आजूबाजूला उंच उंच नारळाची झाडे आणि ती देखील नारळाने भरलेली, डौलाने उभी होती. मधून मधून सुपारीची झाडे डोकावत होती. एखाद्या सुंदर तरुणीने पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आपल्या वेणीत माळावा तसा ह्या सुपारीच्या झाडावरचा पांढरा मोहर लांबच्या लांब लटकत होता. डाक बंगल्याच्या एका भागात चिकूची वाडी होती. केवढीतरी चिकूची झाडे होती. आणि चिकूचा season असल्यामुळे झाडांवर खूप चिकू लागलेले होते. चांगले मोठे मोठे चिकू असल्यामुळे झाडांच्या फांद्यांना त्यांचे वजन पेलवत नव्हते. त्या झुकलेल्या होत्या. तेथील एका कर्मचाऱ्याने भरपूर तांदळाच्या कण्या आणून एका बाजूला लांब हात करून जोरात टाकल्या. त्याच्या सर्रर्रर्रर्रर्रर्र….. अशा मृदू आवाजाने पाच-सहा मोर भराभर उडत आले आणि त्यांनी त्या कण्या टिपायला सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ कबुतरे, पोपट आणि वेगवेगळे छोटे मोठे बरेच पक्षी ते खाण्यासाठी जमा झाले. गंमत म्हणजे ते सगळे एकोप्याने खत होते. त्यांच्यामध्ये बहुतेक जातीयवाद नसावा. ‘मी मोर, उच्चं जातीचा, तो कावळा खालच्या जातीचा’ असे काही आढळले नाही. वरती आकाशात थोडेसे ढग जमा झाले होते. त्यात सूर्यनारायण मधून मधून डोकावत होता. काय सुंदर नजारा होता! पेपर झोपाळ्यावर एका बाजूला ठेऊन दिला आणि ते निसर्ग सौंदर्य, अतिशय लोभनिय दृष्य जितके डोळ्यात साठवुन ठेवणे शक्य होते तवढे ते साठवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात शिपाई चहा घेऊन आला. ठाकूरही उठून बाहेर आले होते. ते ही आजूबाजूचे दृष्य पाहून फारच खुश झाले.
भरपूर चहाचा मसाला घातलेला चहा आम्ही दोघांनी एकत्रीत बसूनच घेतला.”ठाकूर काय वाटते तुम्हाला? तुमचे ह्या काल आलेल्या मंडळीबद्दल काय मन झाले?” मी त्यांना विचारले.
“देशमुखांबद्दल तुमच्या मताशी मी सहमत आहे. पाटील पण फार काही सरळ दिसत नाही. त्यानेही भांडणे करून दोन तीन नोकऱ्या सोडून दिलेल्या आहेत. शिवाय घरातल्या लोकांशीही त्याची भांडणेच असावीत असेच दिसते.थोडक्यात त्याचा स्वभाव विचित्रच असावा. जोशी मात्र चुकीच्या कळपात शिरलेली मेंढी वाटतोय. काही फायदा झाला तर झाला अशाच विचाराने ह्यांना सामील झाला असावा. कुलकर्णी बाई पण फारश्या सरळ वाटल्या नाहीत. जरा जास्त शहाणी बाई आहे आणि अतिशय महत्वाकांक्षी असावी. हे झाले माझे मत. तुम्हाला काय म्हणायचे आहे सर?”ठाकूर बोलले.
“ बहुतेक तुमचे आणि माझे मत सारखेच आहे. परंतु एक गोष्ट मात्र मला खटकली. त्या कुलकर्णी बाई काय म्हणाल्या तुम्हाला आठवतय?ही मिर्झा इतक्या वर्षांपासून कोतवालाकडे रहाते आहे. हे काय प्रकरण असावे?काल इनामदार आपल्याबरोबर बाकी सगळे बोलले परंतु हे काही बोलले नाही.माझा असा विचार आहे आपण प्रथम त्यांच्याकडे ह्याविषयी चौकशी करावी” मी माझे म्हणणे त्यांच्यासमोर ठेवले. ते ह्यावर सहमत झाले.अकरा वाजेपर्यंत शाळेत पोहोचावे असा विचार करून आम्ही आमचे काम आटोपण्यासाठी उठतच होतो तितक्यात “खानसामा” समोर येऊन उभा राहिला. “ब्रेकफास्ट काय आवडेल सर?” अतिशय आदबीने त्याने आम्हाला विचारले
“तुम्ही जे बनवाल ते आवडेल परंतु फक्त फार जास्त मसालेदार नको” ठाकूरांनी सांगितले.“खान सामा” ही डाक बंगल्याची खासियत आहे. तुम्हाला काय आवडेल ह्या प्रश्नाने आपण घरीच आहोत असे एक feeling येते.खानसामा ही ब्रिटिश लोकांची दिलेली ‘देन’ आपण अजून चालू ठेवली आहे त्याने आमच्यासाठी special पुरी-भाजी तयार करून गरमागरम पाठवून दिली.आम्ही दोघांनीही त्याच्यावर ताव मारला.
आम्ही शाळेत जरा उशिराच पोहोचलो.सर्व शिक्षक त्यांच्या त्यांच्या वर्गात निघून गेले होते. आम्ही सरळ इनामदारांच्या ओफिसमध्येच पोहोचलो. इनामदारांना आम्ही काल रात्री घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. आम्हाला भेटायला आलेल्या चौघा जणांची नावे ऐकून ते हसले. त्यांनी शांतपणे त्यांच्या टेबलाचा drawer उघडला. त्यातुन एक पत्र काढले आणि ते आमच्या हातात ठेवले. मिर्झा विरुद्ध केलेल्या तक्रारीचा तो अर्ज होता. त्या अर्जाखाली ओळीने पहिल्या चार सह्या ह्या मंडळींच्या होत्या. आणि त्या खाली आणखीन सहा जणांच्या सह्या होत्या. अर्जात देखील त्यांनी आमच्या समोर मांडले होते तेच मुद्दे लिहलेले होते.
बऱ्याच विचाराअंती आम्ही उरलेल्या सहा जणांना एकानंतर एक असे ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलाविले. त्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांनी देखील जोशींसारखाच विचार केला होता, ‘काही स्वतःचा फायदा झाला तर झाला.’ त्यांची मिर्झा विरुद्ध फार काही तक्रार नव्हती. ती खूप काम करते, मुलांना स्वतःचा भरपूर वेळ देते. त्यांच्यावर ती भरपूर मेहनत घेते ह्यावर त्यांचं सहमत होतं. ‘ती विनामूल्य शिकवते’ हे देखील त्यांना माहित होते. परन्तु ती कोणा कोतवालांकडे रहाते हे त्यांना पटत नव्हते. एका शिक्षीकेचे जीवन असे असावे की त्यावर कोणी आरोप करायला नको. असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते.
ते लोक गेल्यानंतर आम्ही इनामदारांना विचारले, “ हे कोतवाल कोण आहेत?” ते म्हणाले “कोतवाल तिच्या parents सारखेच आहेत. त्यांच्याकडेच ती लहानाची मोठी झाली आहे असे माझ्या ऐकण्यात आले आहे. हे तिचे ‘पर्सनल मॅटर’ आहे. मी कधी तिला याविषयी विचारलेले नाही. आणि या सगळ्याशी आपला काय संबध? तिला एका वर्गाची उपलब्धता करून देण्यामागे मुलांचा फायदा व्हावा, त्यांचे कल्याण व्हावे इतकाच हेतू होता.”
हे सगळे योग्य असले तरी त्या शिक्षकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली होती आणि ते योग्य नव्हते. म्हणून मी आणि ठाकूरने कोतवाल प्रकरणामध्ये खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. आणि हे काम कोणाच्याही नकळत करण्याचे आम्ही ठरविले.
त्या रात्री मी प्रागजिशेठ ना फोन केला आणि दोन दिवसात घडलेल्या सगळ्या घटनांचा तपशील दिला. आणि आता तपास ह्या कोतवालांवर येऊन ठेपला आहे. ह्या तपासात पुढे जाण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. त्यांनी ती ताबडतोब दिली.
Leave a Reply